भाऊ आणि बहीण यांच्यातील अतूट प्रेमाची साक्ष असलेला ‘रक्षाबंधन’ सण !
१. बहिणीच्या संकल्पाची अद़्भुत शक्ती असलेला राखीचा धागा !
‘रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या रक्षणाचा संकल्प साकार करण्यासाठी बहीण भावाच्या घरी येते. राखीचा धागा छोटासा असतो; परंतु बहिणीचा संकल्प त्यात अद़्भुत शक्ती भरून टाकतो. संकल्प जितके निःस्वार्थ, निर्दोष आणि पवित्र असतात, तितकाच त्यांचा प्रभाव वाढतो.
बहीण भावाला राखी बांधते; कारण ‘माझ्या भावाने वर्षभर येणारी विघ्ने आणि बाधा यांवर विजय मिळवावा’, अशी तिची कामना असते. बहीण भावाच्या कपाळाला टिळा लावते आणि संकल्प करते, ‘माझा भाऊ त्रिलोचन बनावा. तो भोगांच्या दलदलीत पडू नये. भोगाने रोग होतात आणि भय येते. माझा भाऊ भोगी नाही, तर योगी बनावा. माझ्या भावाची दृष्टी मंगलमय व्हावी, त्याचे मंगल व्हावे.’
भाऊसुद्धा या दिवशी बहिणीला ऐहिक वस्तू देऊन संतुष्ट करतो. सोबतच बहिणीच्या जीवनाचे दायित्व, तिच्या जीवनात येणार्या अडचणी आणि समस्या दूर करण्याचे दायित्वसुद्धा आपल्या चित्तात कोरून ठेवतो.
२. भारतीय नर-नारींनो, आपली दृष्टी विशाल बनवा !
भावा-बहिणींकडून अशी अपेक्षा आहेे की, तुम्ही आपल्या घरापर्यंतच सीमित राहू नका. ‘ताई, तू भारताची नारी आहेस.’ बहिणीला वाटते, ‘भाऊ, तू भारताचा नर आहेस.’
नारींनी जर भारतीय संस्कृतीची महानता त्यांच्या हृदयात जोपासली, आपल्या हृदयात दृढ केली, तर पशूतुल्य आचरण करणार्या (मनाच्या पाशवी वृत्तींच्या कह्यात गेलेल्या) पतीला ती पशुपती करण्यात सफल होऊ शकते.
भावांनीही संकीर्ण होऊ नये, केवळ आपल्या एक-दोन बहिणीच नाहीत, तर ‘शेजारची बहीणही आपलीच बहीण आहे’, असे समजले पाहिजे. ‘भावाकडून शेजारच्या बहिणीचेही रक्षण होवो आणि बहिणीकडून शेजारच्या भावाचेही शुभ होवो’, असा सद़्भाव केला जावा. हा परस्पर हिताचा भाव समाजात पसरावा.
३. स्त्रियांमध्ये मातृ आणि आद्य शक्ती दडलेली आहे !
‘नारीला समान अधिकार, समान अधिकार नाही… !’ ईश्वराने नारीला जेे अधिकार आणि क्षमता देऊन ठेवल्या आहेत, त्यांची अन्य कुणाशी तुलना होऊ शकत नाही. माता आणि पित्याचे नाव घ्याल, तर अगोदर मातेचे नाव येते. ‘मातृदेवो भव ।’, मग येते, ‘पितृदेवो भव ।’ देवींनो, तुमच्यात मातृशक्ती, आद्यशक्ती दडलेली आहे.’