‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून देण्‍यात आलेल्‍या राख्‍या सैनिकांचे मानसिक बळ वाढवतील ! – बंडू कात्रे, सुभेदार मेजर

‘देश रक्षाबंधन’ उपक्रमाच्‍या प्रसंगी सैनिक आणि विविध मान्‍यवर

कोल्‍हापूर – केवळ युद्धाच्‍या वेळी नव्‍हे, तर अहोरात्र देश संरक्षणासाठी कार्यरत  असणार्‍या सैनिकांचे स्‍मरण ठेवून माता-भगिनींनी ‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून पाठवलेल्‍या राख्‍यांमुळे सैनिकांचे मनोधैर्य नक्‍कीच वाढणार आहे, असे मनोगत सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी व्‍यक्‍त केले. ‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून गेली २४ वर्षे सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी ‘एक राखी’ (देश रक्षाबंधन) हा उपक्रम राबवण्‍यात येत आहे. या अंतर्गत जिल्‍ह्यातील १२ तालुक्‍यांमधून १०८ शाळा-महाविद्यालये, बचतगट यांच्‍या माध्‍यमातून संकलित करण्‍यात आलेल्‍या ७५ सहस्र राख्‍या टी.ए. बटालियन येथील महादेव मंदिराच्‍या परिसरात सैनिकांना प्रदान करण्‍यात आल्‍या. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी अध्‍यक्ष श्री. किशोर घाटगे म्‍हणाले, ‘‘देश रक्षाबंधन’ हा आता एक मूल्‍यशिक्षणाचा भाग बनत आहे. ट्रस्‍टच्‍या वतीने करण्‍यात आलेली ‘महाराणी ताराराणी लष्‍करी विद्यालय’ ही मागणी राज्‍य सरकारने मान्‍य केली आहे.’’ सचिव श्री. राजेंद्र मकोटे म्‍हणाले, ‘‘आगामी वर्षात या उपक्रमास २५ वर्षे पूर्ण होत असून त्‍या निमित्ताने भव्‍य कार्यक्रम घेण्‍याचे नियोजन आतापासून चालू आहे. हा उपक्रम आता लोक चळवळ बनत आहे.’’ या वेळी सौ. यशश्री घाटगे, सर्वश्री महेश कामत, कमलाकर किलकिले, अशोक लोहार, मालोजी केरकर, प्रकाश खोजगे यांच्‍यासह विविध मान्‍यवर उपस्‍थित होते.