भारताच्‍या ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘कूपर समुहा’च्‍या क्रँकशाफ्‍टचा उपयोग ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

सातारा, २९ ऑगस्‍ट (वार्ता.) – भारताच्‍या ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘कूपर उद्योग समुहा’च्‍या क्रँकशाफ्‍टचा (क्राँप्रेसर यंत्रात वापरले जाणारे उपकरण) उपयोग करण्‍यात आला आहे. यामुळे पुन्‍हा एकदा कूपर समुहाचे देशाच्‍या वाटचालीतील योगदान अधोरेखित झाले आहे. कूपर परिवारामुळे सातारा जिल्‍ह्याचा नावलौकिक पुन्‍हा एकदा देशभरात पसरला आहे, असे गौरवोद़्‍गार भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले. ‘चंद्रयान-३’ मोहिमेतील योगदानाविषयी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कूपर समुहाचे सर्वेसर्वा फरोख कूपर यांचा सपत्नीक सत्‍कार केला.

सत्‍कारानंतर खासदार उदयनराजे म्‍हणाले, ‘‘कूपर उद्योग समूह जगभरामध्‍ये प्रसिद्ध आहे. ‘चंद्रयान-३’ मोहिमेत कूपर आस्‍थापनाने दिलेले योगदान अमूल्‍य आहे. ही गोष्‍ट सातारावासियांसाठी अभिमानाची आहे.’’

सर्व कामगारांचे श्रेय असून तो त्‍यांचा विजय आहे ! – फरोख कपूर

फरोख कूपर म्‍हणाले, ‘‘मोहिमेसाठी लागणार्‍या पार्टची मागणी केल्‍यावर आम्‍ही तो बनवून दिला. मोहीम यशस्‍वी झाल्‍याचा आनंद असून आस्‍थापनातील कर्मचार्‍यांनी यासाठी कष्‍ट घेतले. श्रेय हे सर्व कामगारांचे असून तो त्‍यांचा विजय आहे. सध्‍या आम्‍ही रणगाड्यांच्‍या सुट्ट्या भागांची निर्मिती करत आहोत.’’