रुग्‍णालयात आवश्‍यक सुविधांची वानवा; खराब शवपेट्यांमुळे मृतदेह उघड्यावर !

भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्‍णालयातील अनागोंदी कारभार उघड !

अपक्ष आमदार गीता जैन यांच्‍याकडून रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थेचा आढावा

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्‍णालय, भाईंदर

ठाणे, २९ ऑगस्‍ट (वार्ता.) – भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्‍णालयात अनागोंदी कारभार चालू आहे. गंभीर अवस्‍थेतील, तसेच अनेक दुर्धर आजारांवर तात्‍काळ उपचार न करणे, तज्ञ आधुनिक वैद्य नसणे, शवपेट्या खराब झाल्‍याने मृतदेह बाहेर ठेवण्‍याची वेळ येणे, रुग्‍णांना शासकीय अथवा महानगरपालिका रुग्‍णवाहिका न देता खासगी रुग्‍णवाहिका देणे, आवश्‍यक वैद्यकीय सुविधा नसणे आदी विविध तक्रारी आमदार जैन यांच्‍याकडे करण्‍यात आल्‍या होत्‍या. यामुळे नागरिक संतप्‍त आहेत. अपक्ष आमदार गीता जैन यांनी रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थेचा आढावा घेण्‍यासाठी २८ ऑगस्‍टला ठाणे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कैलास पवार यांना बोलावले होते. (रुग्‍णालयाची अशी दुर्दशा करणार्‍या संबंधितांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

या वेळी रुग्‍णालयातील कर्मचार्‍यांची माहिती घेत सोनोग्राफी यंत्र, सिटी स्‍कॅन, क्ष किरण यंत्र (एक्‍स-रे), ऑक्‍सिजन यंत्रणा, जनरेटर, कृत्रिम श्‍वासोच्‍छ्‌वास यंत्र, (व्‍हेंटिलेटर यंत्र), अतीदक्षता विभाग, रुग्‍णवाहिका, सीसीटीव्‍ही आदी व्‍यवस्‍थेचा आढावा घेण्‍यात आला. जैन यांनी रक्‍त तपासणी आणि मोठ्या शस्‍त्रक्रिया यांच्‍या व्‍यवस्‍थापनाची माहिती घेतली. ‘एन्.आय.सी.यु.’ विभाग कार्यान्‍वित करा. रुग्‍णालय परिसरात पोलीस चौकी उभारा. रुग्‍ण आणि नातेवाईक यांना भेडसावणार्‍या समस्‍यांविषयी प्रत्‍येक विभागाच्‍या मुख्‍य दरवाज्‍यावर तक्रार पेटी आणि तक्रारीसाठी संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी यांची माहिती लावा’, असेही त्‍यांनी सांगितले. (हे आमदारांना का सांगावे लागते ? रुग्‍णालय प्रशासनाच्‍या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)

आमदार गीता जैन

रुग्‍णालयाच्‍या पहाणीत लक्षात आलेली सूत्रे !

१. अनेक रुग्‍णांना न पडताळताच मुंबई येथील शताब्‍दी रुग्‍णालयात पाठवले जाते. (या प्रकरणी आमदार जैन यांनी संताप व्‍यक्‍त केला.)

२. शवपेटीत मृतदेह १ मासापर्यंतच ठेवू शकतो, असे असतांना एक मृतदेह ६ मास ठेवण्‍यात आल्‍याचे उघड झाले. (रुग्‍णालयाचा संवेदनाशून्‍य आणि भोंगळ कारभार ! – संपादक)

३. ३ आधुनिक वैद्य हे कामावर न येताच वेतन घेत असल्‍याचे लक्षात आल्‍यावर बायोमेट्रिक उपस्‍थिती आणि रजिस्‍टरमधील नोंदी यांचे अन्‍वेषण करण्‍यास सांगितले. (असे कामचुकार आधुनिक वैद्य काय कामाचे ? – संपादक) ‘प्रत्‍येक आधुनिक वैद्य, कर्मचारी यांना बायोमेट्रिकची सक्‍ती असायला हवी. येणार्‍या प्रत्‍येक रुग्‍णावर उपचार केले पाहिजेत’, अशा सूचना आमदार जैन यांनी अधिकार्‍यांना दिल्‍या आहेत.