५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिरूर, जिल्हा पुणे येथील कु. प्रार्थना अंकुश सुपलकार (वय ६ वर्षे) !
‘श्रावण पौर्णिमा (नारळी पौर्णिमा) (३०.८.२०२३) या दिवशी शिरूर, जिल्हा पुणे येथील कु. प्रार्थना अंकुश सुपलकार हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. ग्रीष्मा अंकुश सुपलकार यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. प्रार्थना अंकुश सुपलकार हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणात
१ अ. गर्भारपणात केलेले आध्यात्मिक उपाय : मी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे गर्भाभोवती श्रीकृष्णाच्या नामाचे मानस मंडल घालून आणि नियमित पोटावर हात ठेवून रामरक्षा, मारुतिस्तोत्र, हनुमानचालिसा अन् देवीकवच म्हणत असे. तसेच सनातन संस्थेच्या ‘गरोदरपणातील समस्यांवर उपाय’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना देणेेे आणि गर्भाशी संवाद साधणे’, असे उपाय करत असे. मी खोक्यांचे उपायही नियमित करत असे. (स्वतःभोवती चहूबाजूला उदबत्तीने शुद्धी केलेले रिकामे खोके ठेवून ‘स्वतःभोवती असलेले अनिष्ट शक्तींचे आवरण या खोक्यांमध्ये येऊ दे अन् ते नष्ट होऊ दे’, अशी प्रार्थना करणे)
१ आ. गर्भातील बाळाशी साधलेला संवाद : मी गर्भातील बाळाला पोटावर हात ठेवून सांगायचे, ‘बाळा मी तुझी या जन्मातील आई आहे; परंतु तुझे जन्मोजन्मीचे पालनकर्ते आणि आई-वडील हे श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. तेव्हा तू माझ्यात न अडकता त्यांचे स्मरण कर. बाळा, तुझ्या मागच्या जन्मात तुला ईश्वरप्राप्ती झाली नाही; म्हणून देवाने तुला मनुष्य जन्म देऊन पुन्हा ईश्वरप्राप्ती करण्याची संधी दिली आहे; म्हणून त्यांच्या चरणी तू कृतज्ञता व्यक्त कर आणि जन्म झाल्यानंतर तुला तुझ्या ध्येयाचे स्मरण राहू दे.’
१ इ. बाळाला गर्भात असल्यापासूनच देवाची ओढ असणे
१. नामजप चालू करण्यापूर्वी मी श्रीकृष्णाला प्रार्थना करायचे, ‘हे श्रीकृष्णा, तूच माझ्याकडून आणि गर्भातील बाळाकडून भावपूर्ण नामजप करवून घे.’ त्यानंतर माझा नामजप पुष्कळ एकाग्रतेने व्हायचा. नामजप करतांना बाळ शांत असायचे. ते हालचाल करत नसे. नामजप झाल्यावर ‘गर्भातील बाळाच्या हालचाली वाढल्या आहेत’, असेे मला जाणवत असे.
२. मी, माझे यजमान आणि आई साधना अन् हिंदु धर्म यांविषयी चर्चा करत असतांंना बाळ शांत असायचे; मात्र व्यावहारिक किंवा व्यावसायिक गोष्टींविषयी चर्चा करत असतांना बाळाच्या हालचाली वाढत असत.
३. मी गरोदरपणात आणि बाळाचा जन्म झाल्यानंतरही नियमित सत्संग ऐकत असे. कधी तरी सत्संग चालू होण्याआधी मला झोप यायची; मात्र सत्संग चालू झाला की, पोटातील बाळ हालचाल करत असे. तेव्हा ‘जणूकाही सत्संग ऐकण्यासाठी ते मला उठवत आहे’, असे मला वाटाययचे.
१ ई. गरोदर असतांना मला साधकांशी बोलतांना आनंद वाटत असे.
२. प्रसूतीच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. मला नववा मास चालू असतांना एकदा माझी आई माझ्याजवळ बसली आणि सहज म्हणाली, ‘‘कृष्णा, कधी येतोस रे बाहेर !’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘या खोलीत नामपट्ट्या लावल्या की, कृष्ण येईल.’’ तेव्हा आईने लगेचच खोलीत नामपट्ट्या लावायला घेतल्या आणि मीही तिला साहाय्य केले. दुसर्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता माझ्या पोटात कळा येऊ लागल्या.
आ. आमच्या घरी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घरी होता. तो मी संपूर्णपणे न्याहाळला. त्यानंतर काही वेळातच मला रुग्णालयात भरती केले. त्या वेळी मला आणि आईला आधी वाटणारा ताण अन् अस्थिरता गेली. आम्हाला स्थिर आणि सकारात्मक रहाता आलेे.
इ. प्रसूतीसाठी शस्त्रकर्मकक्षात नेल्यावर मी सतत गुरुचरणांचे स्मरण करत होते. तेव्हा ‘मला गुरुचरण दिसले आणि सर्व देवता गुरुचरणांवर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे दिसत होते. त्या क्षणी माझी प्रसूती सुखरूप झाली. ‘ही केवळ गुरुमाऊलींचीच कृपा आहे’, असे मला वाटले.
३. जन्माच्या वेळी
बाळाचा जन्म झाल्यावर तिने आकाशतत्त्वाची मुद्रा केली होती आणि तिचा चेहरा अत्यंत तेजस्वी अन् आनंदी दिसत होता.
४. जन्म ते १ वर्ष
४ अ. प्रार्थना पुष्कळ शांत, स्थिर आणि आनंदी असायची. तिने माझ्या सेवेमध्ये कधीच अडथळा आणला नाही.
४ आ. माझ्या मनात नकारात्मक विचार असल्यावर प्रार्थनाकडे पाहून मन सकारात्मक व्हायचेे. त्यामुळे आम्हाला प्रार्थनाच्या सहवासात रहायला पुष्कळ आवडायचेे.
४ इ. सात्त्विकतेची ओढ
१. प्रार्थनाला ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) कुठे आहेत ?’, असे विचारले की, ती त्यांच्या छायाचित्राकडे बघून खळखळून हसते.
२. ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ उघडते आणि प्रत्येक पानावरील प.पू. गुरुदेवाच्या छायाचित्रावर डोके टेकवून नमस्कार करते.
३. तिला ‘श्रीकृष्णमामा कुठे आहे ?’, असे विचारले, तर ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे बोट दाखवते आणि हसते. ती सतत श्रीकृष्णाच्या चित्राशी खेळत रहाते.
४. तिला ‘प्रार्थना कर’, असे सांगितले की, ती लगेच हात जोडून शांत बसते.
४ ई. प्रार्थनाला रुग्णालयात लस द्यायला नेल्यावर तिला सांगितले, ‘‘बाळा, प.पू. गुरुदेवांचे स्मरण करून प्रार्थना कर.’’ त्यानंतर तिला ‘इंजेक्शन’ दिले. तेव्हा ती जराही रडली नाही.
४ उ. संतांप्रती भाव : एकदा आम्ही नगर येथे सद़्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या सत्संगाला गेलो. तेव्हा प्रार्थना ७ मासांची होती. तेव्हा तिने सद़्गुरु काकांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. सद़्गुरु काकांनी तिला उचलून घेतल्यावर ती इतर कुणाकडेच जात नव्हती. त्यांनी तिला प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र दाखवले आणि विचारले की, ‘हे कोण आहेत ?’ तेव्हा ती ‘बाबा, बाबा’ असे म्हणून बोट दाखवत होती.
५. वय १ ते ३ वर्ष
५ अ. श्लोक आणि स्तोत्र म्हणणे : प्रार्थनाचे गणपति, श्रीकृष्ण, श्रीगुरु आणि देवी यांचे श्लोक पाठ होते. तसेच तिचे गणपतिस्तोत्र तोंडपाठ झाले होते. ती प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे बसून श्लोक आणि स्तोत्र म्हणत असे.
५ आ. शिकण्याची वृत्ती : प्रार्थना नेहमी शिकण्याच्या स्थितीत असते. एकदा मी माळ घेऊन नामजप करत असतांना प्रार्थनाही छोटी माळ घेऊन आली आणि मला म्हणाली, ‘‘आई मला माळ घेऊन जप कसा करायचा ? ते सांग.’’ तिला त्याविषयी सांगितल्यावर ती माळ घेऊन जप करू लागली
५ इ. ऐकण्याची वृत्ती : प्रार्थनाला एखादी गोष्ट सांगितल्यावर ती लगेच कृतीत आणते. एकदा प्रार्थनाला सांगितले की, प.पू. बाबांचा ग्रंथ हळू हाताळायचा, नाहीतर ग्रंथ फाटतो. तेव्हापासून ती ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हळूवारपणे बघते. तो ग्रंथ तिला फार आवडतो. ग्रंथ बघतांना ती मला सगळ्या संतांची नावे विचारून घेते.
५ ई. संत आणि साधक यांच्याशी जवळीक साधणे : प्रार्थनाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सर्व संत आणि साधक फार आवडतात. प्रार्थनाला साधकांशी बोलायला फार आवडते. एकदा ती कु. प्रतीक्षा कोरगावकर यांच्याशी भ्रमणभाषवर बोलत होती. त्या वेळी त्या दोघींचे बोलणे ऐकून ‘जणू त्या कित्येक वर्षांपासून एकमेकींना ओळखत आहेत’, असे असे वाटत होते.
५ उ. धर्माचरणाची आवड : प्रार्थनाला सात्त्विक कपडे आणि अलंकार घालायला पुष्कळ आवडतात. एकदा तिला मी ‘फ्रॉक’ घातला. तेव्हा ती तो ओढून काढत होती. तिला परकर-पोलका घालायचा होता. तिला कुंकू लावायला आणि हातात बांगड्या घालायला आवडते.
६. वय ३ ते ५ वर्षे
६ अ. सातत्य
१. ती सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ बसून गणपतिस्तोत्र म्हणते. ती नियमित शाळेत जाते आणि प्रतिदिन शाळेमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण करते. ती अभ्यास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करते.
२. प्रार्थना तिच्या प्रत्येक कृतीमध्ये सातत्य ठेवते. ती प्रतिदिन देवाजवळ बसून ‘ॐ गं गणपतये नमः । आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा अर्धा घंटा नामजप करते.
६ आ. सहनशील असणे : एकदा प्रार्थनाला ताप आला असल्याने आम्ही तिला चिकित्सालयात घेऊन गेलो होतो. तिला ताप आलेला असूनही ती आनंदी दिसत होती. तेव्हा तेथील परिचारिका म्हणाल्या, ‘‘तिला इतका ताप असूनही ती किती आनंदी आहे ! तिचा चेहरा किती हसरा आहे !’’
६ इ. आईच्या सेवेत अडथळा न आणता साहाय्य करणे
१. प्रार्थना ४ वर्षांची असतांना मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये शिबिराला जायचे होते. तेव्हा ती ३ दिवस माझ्या आईकडे राहिली. तिने आईला काहीही त्रास दिला नाही.
२. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी मला सूत्रसंचालनाची सेवा करायची होती. मी सूत्रसंचालन करत असतांना प्रार्थना एकदाही माझ्याकडे आली नाही. ती दिवसभर छान खेळत होती.
७. स्वभावदोष
चिडचिड करणे
– सौ. ग्रीष्मा अंकुश सुपलकार, शिरूर, पुणे. (७.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |