त्र्यंबकेश्वर येथील विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहितात २ भिन्न विषय !
त्र्यंबकेश्वर येथील शिक्षक केशव गावित यांच्या प्रयत्नांचा परिणाम !
नाशिक – जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील ‘हिवाळी’ या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ५५ विद्यार्थी दोन्ही हातांनी एकाच वेळी २ भिन्न विषय लिहितात. गणिताची २ स्वतंत्र उदाहरणेही सोडवतात. एका हाताने मराठी, तर दुसर्या हाताने इंग्रजीही सहज अन् वेगाने लिहितात. कुणी एका हाताने चित्र काढतो अन् दुसर्या हाताने पाढे किंवा गणिते सोडवतो. त्यांना २ पासून १ सहस्र १४६ पर्यंतचे पाढेही तोंडपाठ आहेत. शिक्षक केशव गावित यांच्या प्रयत्नांमुळेच हे साध्य होत आहे.
सलाम 🔥 pic.twitter.com/OtY2s3EWKz
— Professor दादुस स्पेन वाला 🐋↩️ (@dreamz_unite) August 21, 2023
१. नाशिकपासून ७५ किलोमीटरवर ३५ कुटुंबे असलेला हा पाडा आहे. येथून ५०० मीटरवरील डोंगरावर एका शेतकर्याने आपल्या घराशेजारील झोपडी शाळेसाठी दिली आहे. झोपडीवर ताडपत्री आच्छादून तेथे शाळा भरवली जाते.
२. इयत्ता ८ वी आणि ९ वीचे विद्यार्थी आसंदीवर बसून बालवाडी ते इयत्ता ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतात.
शाळेला ‘मॉडेल स्कूल’ करणार ! – रमेश अय्यर, अध्यक्ष, ‘गिव्ह’ सामाजिक संस्था
आमची शाळा देशातील एक क्रमाकांची आहे; कारण येथील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ही देशातील इतर कुठल्याही सुसज्ज शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नसेल. एकाच शिक्षकाच्या बळावर सर्व वर्ग भरतात. सोयी-सुविधांची वानवा असूनही येथे गुणवान विद्यार्थी सिद्ध होत आहेत. मला ही शाळा देशातील ‘मॉडेल स्कूल’ बनवायची आहे. केशव गावित यांचे येथून स्थानांतर न झाल्यासच हे शक्य आहे.
मध्यप्रदेशातील एका शाळेचा ‘व्हिडिओ’ पाहून कल्पना सुचली ! – केशव गावित, शिक्षक
मी मध्यप्रदेशातील एका शाळेचा व्हिडिओ पाहिला होता. त्यात विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहित होते. यातून प्रेरणा घेऊन मी तसे चालू केले. ‘गिव्ह’ संस्थेचे अध्यक्ष रमेश अय्यर यांनी वह्या, पुस्तके, गणवेश, जेवण, स्वेटर, तसेच आर्थिक साहाय्य केले. विद्यार्थ्यांना असे सिद्ध करणे आव्हानात्मक होते; पण कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीत मी हे विद्यार्थ्यांकडून करून घेतले. एका हाताने ते लिहितच होते. नंतर दुसर्या हाताचा सराव करून घेतला. आता ते दोन्ही हातांनी २ वेगवेगळे विषय वेगाने लिहू शकतात.
संपादकीय भूमिका :एक शिक्षक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घडवत आहेत, हे लक्षात घेऊन अन्य शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा ! |