फोंडा, गोवा येथील श्री. प्रकाश नाईक यांचा साधनाप्रवास आणि त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. प्रकाश नाईक, हे गेल्‍या २५ वर्षांहून अधिक काळ सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्‍यांचा साधनाप्रवास आणि त्‍यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी त्‍यांच्‍याच शब्‍दांत जाणून घेऊया.

श्री. प्रकाश नाईक

१. नास्‍तिक विचारसरणी

‘पूर्वी मी नास्‍तिक होतो. देव आणि धर्म यांवर माझा विश्‍वास नव्‍हता. मी ‘दगडात देव असतो का ? पूजा-अर्चा हे सर्व थोतांड आहे’, या विचारांचा होतो.

२. ‘साईबाबांच्‍या कृपेमुळे नोकरी मिळाली’, अशी श्रद्धा दृढ होऊन साईबाबांची अधिकाधिक भक्‍ती करणे

आरंभी मी माझ्‍या मामांकडे रहात होतो. तिथे मला ‘साईबाबांची भक्‍ती केल्‍याने व्‍यावहारिक कामे होतात’, अशा अनुभूती आल्‍यामुळे माझी ‘व्‍यावहारिक कामे होण्‍यासाठीच भक्‍ती करायची असते’, अशी श्रद्धा दृढ होत गेली आणि ते साध्‍य करण्‍यासाठी मी प्रयत्न करू लागलो. मामाकडे राहून माझे विज्ञानातील पदविकेपर्यंतचे (‘बी.एस्.सी.’पर्यंतचे) शिक्षण पूर्ण झाले होते; पण मला नोकरी मिळत नव्‍हती. तेव्‍हा अनेक साईभक्‍त मला सांगत होते, ‘‘शिर्डीला जाऊन ये. तेथे गेल्‍यावर अनेक जणांच्‍या मनोकामना पूर्ण होतात.’’ या संदर्भात ‘मला नोकरी मिळाली, तरच मी साईंची भक्‍ती करणार’, असा दृढ निश्‍चय करून मी शिर्डीला गेलो. तेथून आल्‍यावर थोड्याच दिवसांनी मला एका मोठ्या आस्‍थापनात नोकरी मिळाली. मी स्‍वतःहून काही प्रयत्न न करता मला नोकरी मिळाल्‍यामुळे माझ्‍या मनात ‘ही साईबाबांची कृपा आहे’, अशी दृढ श्रद्धा निर्माण झाली. त्‍यानंतर मी साईबाबांची अधिकाधिक भक्‍ती करू लागलो.

३. सर्वकाही स्‍वतःला अपेक्षित असे होऊ लागल्‍यावर अध्‍यात्‍माविषयी जिज्ञासा वाढणे; मात्र अनेक आध्‍यात्मिक ग्रंथ वाचूनही समाधान न होणे

पुढे साईबाबांची भक्‍ती करतांना माझी व्‍यावहारिक कामे मला अपेक्षित अशी होऊ लागली. त्‍यामुळे माझी अध्‍यात्‍माविषयी जिज्ञासा वाढली. नंतर मी अनेक आध्‍यात्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्‍या ग्रंथांमध्‍ये सांगितल्‍याप्रमाणे कृती करूनही माझे मन एकाग्र होत नव्‍हते; मात्र त्‍यातून ‘देवाच्‍या भक्‍तीत सामर्थ्‍य आहे’, हे माझ्‍या लक्षात आले; परंतु ‘ती साध्‍य कशी करायची ?’, हे मला कळत नव्‍हते. माझी आर्थिक स्‍थिती सुधारत गेली. मी जागा घेऊन घर बांधले; पण माझे मन अस्‍थिर होत गेले. मला रात्र रात्र झोप लागत नव्‍हती. ‘नेमके काय करावे ?’, ते मला कळत नव्‍हते आणि मला योग्‍य दिशा मिळत नव्‍हती.

४. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे मिळालेले मार्गदर्शन !

४ अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्‍या ‘स्‍वभावदोष निर्मूलन आणि अध्‍यात्‍म’ यांवरील मार्गदर्शनाला जाणे, ते आवडणे आणि त्‍यानुसार कृती केल्‍यावर स्‍वतःमध्‍ये पालट जाणवणे : त्‍याच कालावधीत एका वृत्तपत्रात ‘मुंबई येथील संमोहनशास्‍त्रज्ञांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) पूर्ण दिवसाचे व्‍याख्‍यान असून त्‍यामध्‍ये अर्धा दिवस ‘स्‍वभावदोष निर्मूलन’ आणि संध्‍याकाळी अर्धा दिवस ‘अध्‍यात्‍म’ या विषयांवर मार्गदर्शन आहे’, असे माझ्‍या वाचनात आले. मी माझी सगळी कामे बाजूला ठेवून मार्गदर्शन ऐकण्‍यासाठी गेलो. ते मार्गदर्शन मला पुष्‍कळ आवडले. तेव्‍हा आम्‍हाला ‘स्‍वभावदोष निर्मूलनासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, यासंदर्भात माहिती असणारी ४ – ५ पानांची प्रत दिली होती. मी त्‍याचे चिंतन करून ‘माझ्‍यामध्‍ये कुठलेे स्‍वभावदोष प्रबळ आहेत ? त्‍यावर मात करण्‍यासाठी स्‍वयंसूचना सत्रे कशी करायची ?’, हे मी लिहून काढले. त्‍यानुसार प्रयत्न केल्‍यावर मला माझ्‍यात पुष्‍कळ पालट जाणवला.

४ आ. कुलदेवतेचा नामजप करण्‍याचा निश्‍चय करून कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप चालू करणे : संध्‍याकाळच्‍या सत्रात अध्‍यात्‍मावर मार्गदर्शन झाले. त्‍यात ‘कुलदेवता आणि दत्त’ यांच्‍या नामजपाचे महत्त्व सांगण्‍यात आले. मला ते मार्गदर्शन आवडले असूनही माझ्‍याकडून साईबाबांचा नामजप सोडून इतर जप करण्‍याची इच्‍छा किंवा धाडस होत नव्‍हते. मी प्रत्‍येक मासाला होणार्‍या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या अभ्‍यासवर्गाला नियमितपणे जात होतो. तेथे अनेक जणांना वेगवेगळ्‍या अनुभूतीही आल्‍या होत्‍या, उदा. काहीही स्‍थूल कारण नसतांना गोड सुगंध येणे, तर काही जणांना दुर्गंधही जाणवला. पहिल्‍या वर्गाला आलेले जे लोक मोठमोठ्याने बोलत होते, ते शांत आणि हळू आवाजात बोलू लागले होते. त्‍या सर्वांच्‍या अनुभूती ऐकून ‘मला कुलदेवतेच्‍या नामजपाविना पर्याय नाही’, असे वाटले आणि त्‍यानुसार मी ‘कुलदेवी अन् दत्त’ यांचा नामजप चालू केला.

४ आ १. अनुभूती – ‘साईलीला’ या मासिकाचे एक पान मिळणे आणि ते वाचून कुलदेवतेच्‍या नामजपाचे महत्त्व मनात बिंबणे : याच दरम्‍यान मला ‘साईलीला’ मासिकाचे एक पान सापडले. त्‍यात लिहिले होते, ‘जो आपल्‍या आईला (कुलदेवतेला) ओळखत नाही, तो मला काय ओळखणार ?’, ही ओळ वाचून ‘कुलदेवीचा नामजप केलाच पाहिजे’, असे मला वाटले. ‘जणूकाही साईबाबांनी मला वाचण्‍यासाठीच ते पान उपलब्‍ध करून दिले होते.’ साईबाबांनीच मला ही अनुभूती दिली.

५. परात्‍पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गात प्रश्‍न न विचारता सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळणे

त्‍यानंतर प्रत्‍येक अभ्‍यासवर्गाला जातांना मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना विचारण्‍यासाठी अनेक प्रश्‍न घेऊन जात होतो; पण मला एकदाही एकही प्रश्‍न विचारावा लागला नाही. मला माझ्‍या मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे न विचारताच मिळत होती आणि प्रत्‍येक वेळी नवीन शिकायला मिळत होते.

६. परात्‍पर गुरु डॉ. आठवले अभ्‍यासवर्गात साधनेचे सेवा इत्‍यादी पुढचे टप्‍पे सांगत असूनही, ते न पटणे, ‘नामजपच सर्वकाही आहे’, असे वाटणे, साधक सेवा करत असलेल्‍या ठिकाणी सहज पहाण्‍यासाठी गेल्‍यावर सहजतेने सेवा होऊन पुष्‍कळ उत्‍साह जाणवणे

अभ्‍यासवर्गात नामजपाच्‍या पुढचे टप्‍पे, म्‍हणजे ‘सत्‍संग, सत्‍सेेवा, त्‍याग आणि प्रीती’, असे सांगितले होते; पण मला ते पटले नव्‍हते. एकदा साधकांनी एके ठिकाणी प्रवचन ठेवले होते. मला सेवा करण्‍यात विशेष रस नव्‍हता. माझी ‘नामजपच सर्वकाही आहे’, अशी धारणा होती. तरी ‘सेवेच्‍या ठिकाणी जाऊन ‘काय वेगळेपण जाणवते, ते बघूया’, या विचाराने मी तिकडे गेल्‍यावर ‘सेवेत कधी सहभागी झालो ?’, हे माझे मलाच कळले नाही. मला तिकडे वेगळाच उत्‍साह जाणवत होता आणि ‘घरी आल्‍यावर नामजपही अधिक सहजतेने आणि भावपूर्ण होत होता’, असे जाणवले. त्‍यानंतर मला सेवेची संधी मिळेल, तिथे मी सहभागी व्‍हायचो. गावात लहान लहान प्रवचने आयोजित करणे, त्‍यांचा घरोघरी प्रसार करणे आणि मला जमेल ती इतर सेवा मी करायचो.

७. ‘अर्पणातून मिळालेल्‍या वस्‍तूचा योग्‍य वापर केला नाही, तर पाप लागते’, या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांंच्‍या विचाराने प्रभावित होऊन स्‍वतः तशी कृती करणे

एकदा मी मुंबई येथे परात्‍पर गुरु डॉक्‍टर पूर्वी रहात होते, तिथे गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांनी स्‍वतः आम्‍हाला चहा बनवून दिला. चहामध्‍ये दूध घातल्‍यावर दूध संपले. पातेल्‍यात थोडी साय शिल्लक होती, ती परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आमच्‍यासाठी बनवलेल्‍या चहात घातली. त्‍याकडे माझे लक्ष गेल्‍यावर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘हे सर्व अर्पणातून मिळाले आहे. त्‍याचा जर आपण योग्‍य वापर केला नाही, तर आपल्‍याला त्‍याचे पाप लागेल.’’ त्‍यांचा हा विचार माझ्‍या मनाला पुष्‍कळ भावला. आताही घरी प्रत्‍येक वस्‍तू वापरतांना ‘त्‍याचा योग्‍य वापर होतो का ?’, याकडे माझे लक्ष असते.

८. साधनेला आरंभ केल्‍यावर आलेल्‍या अनुभूती !

८ अ. संपामुळे नोकरी करत असलेले आस्‍थापन २ वर्षे बंद असूनही पैशांची कमतरता न भासणे : मी एका औषधाच्‍या आस्‍थापनात कामाला होतो. संपामुळे ते आस्‍थापन जवळजवळ २ वर्षे बंद होते; पण याही स्‍थितीत गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला काहीही न्‍यून पडू दिले नाही किंवा मला दुसर्‍यांकडे हात पसरावा लागला नाही. मला पैशांची न्‍यूनता भासायची, तेव्‍हा देवाच्‍या कृपेने कुठून ना कुठून सोय होऊन ती भरून निघायची. साधनेत आल्‍यानंतर गुरुदेवांनी मला काहीच अल्‍प पडू दिले नाही.

८ आ. विजेचे देयक कुणीतरी भरणे : मी विजेचे देयक ३ मास भरले नव्‍हते. मी ते भरायला गेलो, तेव्‍हा ‘त्‍या देयकाचे पैसे कुणी तरी भरलेे आहेत’, असे मला सांगितले. ‘ते पैसे कुणी भरले ?’, हे मला कळले नाही.

८ इ. धामसे, गोवा येथे भंडार्‍याला जाण्‍यासाठी निघतांना पत्नी आजारी पडणे, भंडार्‍यात सेवा करतांना सर्वकाही विसरून सेवा करणे, घरी परत येतांना ‘पत्नी रुग्‍णाईत आहे’, याची जाणीव होणे; पण घरी परत येईपर्यंत ती पूर्ण बरी झालेली असणे : एकदा गोव्‍यातील धामसे येथे भंडारा होता. तिथे जाण्‍यासाठी मी घरून सकाळी ६ वाजता निघालो; पण त्‍याच वेळी माझी पत्नी (सौ. रोशनी प्रकाश नाईक) आजारी पडली. तिला उठून बसताही येत नव्‍हते. घरी ती एकटीच होती. त्‍याही स्‍थितीत तिने मला भंडार्‍याला जाऊ दिले. मी तिथे दिवसभर सेवेत इतका दंग झालो की, ‘घरी पत्नी आजारी आहे’, हे मी पूर्णपणे विसरून गेलो. संध्‍याकाळी घरी परत आल्‍यावर माझ्‍या लक्षात आले. तेव्‍हा माझी मलाच खंत वाटली; पण त्‍या वेळी पत्नी पूर्णपणे बरी झाली होती.

गुरुदेव आरंभीपासून माझ्‍या समवेत आहेत. त्‍यांनीच मला मायेतून अलगदपणे बाहेर काढून अध्‍यात्‍मातील आनंद अनुभवायला दिला. जसे मांजर आपल्‍या पिल्‍लाला तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते, तसे गुरुदेव साधकांना जपतात. त्‍यांच्‍याप्रती कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी अल्‍पच आहे.

‘वरील सर्व सूत्रे गुरुदेवांनीच लक्षात आणून ती लिहून घेतली. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रती कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रकाश नाईक, फोंडा, गोवा. (२७.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक