सराला बेटाच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे सप्ताह समितीद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत !
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील सरकार हे सर्वसामान्य आणि कष्टकरी यांचे सरकार आहे, तसेच हे सरकार वारकरी संप्रदायाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेट अर्थात् गोदाधामला जाण्यासाठी पक्के रस्ते अन् अंतर्गत सोयीसुविधांसाठी अनुमाने १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ ऑगस्ट या दिवशी येथे केली.
वैजापूर येथे आयोजित सद़्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास सप्ताहस्थळी आगमन झाले. सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार रमेश बोरनारे, डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, बाबासाहेब जगताप यांच्यासह सप्ताह समितीने त्यांचे स्वागत केले.
या वेळी मठाधिपती महंत रामगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत सराला बेटाचा रस्ता आणि अन्य विकासकामे यांसाठी निधीची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संत आणि महात्मे अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतात. ‘पाऊस चांगला होऊ दे’, असे पांडुरंगाला साकडे घालत आहे. हा श्रावण मास आहे. आपली संतांची भूमी आहे. नम्रपणे कामे करून सर्वसामान्य माणसांच्या दुःखात सहभागी होणे आवश्यक आहे. परमार्थ कसा साधायचा, याचे मार्गदर्शन संत-महात्मे करत असतात. हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून चांगले विचार ऐकण्यासाठी लोक येत असतात. आतापर्यंत १२ जिल्ह्यांत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला आहे.