मुले संस्कारशील होण्यासाठी जन्मापासून संस्कार करणे आवश्यक !
‘आमचे माजी राष्ट्रपती सन्माननीय दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे, ‘सिंगापूरमध्ये तुम्ही आपल्या सिगारेटचे जळके थोटूक (तुकडा) रस्त्यावर फेकू शकत नाही. सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत जर तुम्ही आथर्ड रस्त्यावर चारचाकी चालवली, तर तुम्हाला आर्थिक दंड भरावा लागतो. तुम्ही सिंगापूरमध्ये जर वाहनतळावर निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ चारचाकी उभी केली असेल, तर तुमच्या नावाचे दंड भरायचे तिकीट काढले जाते; परंतु तुम्ही काहीही म्हणू शकत नाही.’
दुबईमध्ये तुम्ही रमजानच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी काहीही खाण्याचे साहस करू शकत नाही. जेद्दामध्ये डोके (वस्त्राने / टोपीने) न झाकता तुम्ही बाहेर पडू शकत नाही. वॉशिंग्टनमध्ये तुम्ही ५५ कि.मी. प्रतिघंटा यापेक्षा अधिक वेगाने चारचाकी चालवण्याचे धाडस करू शकत नाही आणि पोलीस शिपायाला उलट असे बोलूच शकत नाही, ‘तुला ठाऊक आहे का, मी कोण आहे ते ? अमुक प्रसिद्ध व्यक्ती माझे वडील आहेत.’ ऑस्टे्रलिया आणि न्यूझीलंंड येथील समुद्रकिनार्यावर रिकामा नारळ हवेत उडवून देऊन तेेथे कचरा करू शकत नाही. जपानच्या टोकियोमध्ये तुम्ही रस्त्यावर पान खाऊन कुठेही थुंकू शकत नाही. अमेरिकेतील बोस्टनमध्ये तुम्ही खोटे योग्यता प्रमाणपत्र खरेदी करू शकत नाही.
१. विदेशातील व्यवस्थेचा आदर आणि भारतात तिचा अनादर का ?
तुम्ही दुसर्या देशांच्या व्यवस्थेचा आदर आणि पालन करू शकता; परंतु आपल्या (भारत) देशातील व्यवस्थेचा आदर करू शकत नाही. भारताच्या भूमीवर पाय ठेवताच तुम्ही सिगारेटचे तुकडे इकडे तिकडे फेकता. कागदाचे बोळे करून सर्वत्र उधळता. जर तुम्ही परदेशात प्रशंसनीय नागरिक होऊ शकता, तर भारतात तुम्ही तसे का होऊ शकत नाही ? येथील (भारतातील) श्रीमंत लोक आपल्या कुत्र्यांना रस्त्यावर फिरायला घेऊन जातात आणि सभोवालच्या परिसरात घाण पसरून येतात. नंतर तेच लोक रस्त्यावरील घाणीच्या साम्राज्यासाठी प्रशासनाला दोष देतात. जेव्हा ते घराबाहेर निघतील, तेव्हा एक अधिकारी झाडू घेऊन त्यांच्या मागे मागे चालेल, अशी अवास्तव अपेक्षा ते करतात कि काय ?
२. संस्कार कोण करू शकते ? भारतात व्यक्ती असे चुकीचे वागण्यामागील कारणांचा विचार करता संस्कारांची आवश्यकता लक्षात येईल.
अ. कुटुंब : ही मानवाची पहिली शाळा असते. बालकामध्ये कुटुंबातच दया, ममता, स्नेह, उदारता, क्षमा, प्रेम आणि सेवाभाव यांचे अंकुर फुटतात; म्हणून कुटुंबियांनी नैतिक चरित्राचे पालन करणे आवश्यक आहे. कुटुंबीयच बालकाच्या चरित्राच्या इमारतीच्या पायाचे दगड आहेत, ज्यावर लहान मुलांची भावी इमारत उभी राहून ती स्थिर होते.
आ. शिक्षक : माता-पिता यांच्यानंतर बालक शाळेत गुरुजनांच्या सावलीत बसून सद़्गुण अर्जित करतो; म्हणून शाळेमध्ये पाठ्यक्रम आणि आचरण यांच्या माध्यमातून शिक्षकांनी नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले पाहिजे. शालेय शिक्षणाच्या विविध विषयांच्या माध्यमातून बालकांमध्ये नैतिक गुणांचे संवर्धन होते. शिक्षकाचे दायित्व असते की, ते अशा प्रसंगांच्या शिक्षणमूल्यांचे संवर्धन होण्याच्या दिशेने यशस्वीपणे उपयोग करतील, जेणेकरून ज्ञात-अज्ञात कथा आणि प्रसंग यांच्यामधील पात्रांमुळे बालकाच्या चरित्रावर त्याचा प्रभाव पडेल.
इ. शिक्षण : शिक्षणाच्या उद्देशांमध्ये योग्यता आणि सद़्वृत्ती यांचा विकास विशेष महत्त्वाचे ठरतात. शाळेत शिकवण्यात येणार्या धड्यांमध्ये आणि धडा शिकवल्यानंतर देण्यात येणार्या शिक्षणामध्ये आपोआपच उद्देशनिष्ठ विषय-वस्तूंवर आधारित नैतिक मूल्यांचा समावेश करणे शक्य आहे.
३. चरित्र-निर्मिती किंवा व्यक्तीमत्त्व विकास करण्यासाठी शिक्षणात आमूलाग्र पालट हवा !
शिक्षण आणि चरित्र-निर्मिती यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. जर शिक्षणाची फलनिष्पत्तीतून चरित्र-निर्मिती किंवा व्यक्तीमत्त्व विकास होत नसेल, तर ते शिक्षण योग्य असूच शकत नाही. त्यात कोणती ना कोणती तरी त्रुटी निश्चित असते. विद्यार्थ्यांमध्ये बौद्धीक विकासासह शिस्त, सहिष्णुता, प्रामाणिकपणा, दायित्वाची जाणीव, व्यापक दृष्टीकोन आणि चिंतनाचा विकास हे सर्व अवश्य असलेच पाहिजे. एक चित्रकार किंवा मूर्तीकार जाणत असतो की, त्याला कोणती कलाकृती बनवायची आहे. त्यामुळेच तो आपल्या कार्यात सफल होऊ शकतो. शिक्षक हे राष्ट्र मंदिराचे कुशल शिल्पकार आहेत. झाशीची राणी आणि त्यांच्यासारखे राष्ट्रपुरुष यांचे धडे-त्यांच्या जीवनातील प्रसंगावरून भारतीय महिलांप्रती आदरभाव शिकवणारे शिक्षण पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून विकसित केले जाते.
आमचे ऐतिहासिक पुरुष, महामानव यांची जीवनचरित्रे बालकांना सांगितली गेली पाहिजेत. शैक्षणिक धड्यांमधून शिस्त, शारीरिक श्रम, सहकार्य आणि बंधूभाव या भावनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. संस्कार शिबिरे आणि व्यक्तीमत्त्व विकास करणे यांचे आयोजन करण्यासाठी प्रेरणा देणार्या, सर्वांमध्ये एकसंघाची भावना जोपासणार्या विषयांचे आयोजन अधिकाधिक केले जावे; ज्यामुळे आजचा बालक संस्कारशील नागरिक बनू शकेल आणि नैतिक मूल्यांच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय चरित्राचे उत्थान होऊ शकेल.’
(साभार : मासिक ‘कल्याण’)