सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्सवचिन्हे (बिल्ले) बनवण्याची सेवा करतांना ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव (ब्रह्मोत्सव) झाला. तेव्हा ‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात आपल्यालाही सेवेची संधी मिळावी’, असे मला वाटत होते. त्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने मला ब्रह्मोत्सवासाठी बिल्ले बनवून घेण्याची सेवा मिळाली आणि माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही गुरुदेवांनी ही सेवा माझ्याकडून परिपूर्ण करून घेतली. त्या वेळी आलेल्या अनुभूती मी कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करते.
१. ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी उत्सवचिन्हे (बिल्ले) बनवण्याच्या सेवेविषयी निरोप मिळणे
२८.४.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) अंजली क्षीरसागर यांचा मला ‘व्हॉट्स अॅप’द्वारे लघुसंदेश आला, ‘ताई, ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी उत्सवचिन्हे (बिल्ले) बनवायची आहेत. त्यांच्या खरेदीसाठी तुम्ही उद्या मुंबईला जाऊ शकता का ?’ तिने मला एका कार्यालयाचा पत्ता सांगितला. त्या कार्यालयाकडून आपल्याला ब्रह्मोत्सवासाठी काही सहस्र उत्सवचिन्हे बनवून घ्यायची होती.
२. थकवा असूनही उत्सवचिन्हांच्या सेवेसाठी ४ कि.मी. अंतर चालत जाणे आणि सवलतीच्या दरात उत्सवचिन्हांचा नमुना बनवून मिळणे
मागील काही दिवसांपासून मला थकवा होता. त्या दिवशी माझी शारीरिक स्थिती चांगली नसूनही मी आगगाडीने मस्जिद बंदर रेल्वेस्थानकावर उतरून साधारण ४ कि.मी. अंतर पायी चालत कार्यालयाच्या ठिकाणी गेले. मी अंजलीने सांगितलेल्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे उत्सवचिन्हे बनवण्याविषयी विचारले. त्यांनी सांगितलेल्या दरामध्ये मी सवलतीविषयी विचारले असता त्यांनी सवलतही दिली, तसेच त्यांच्याकडून त्याच दिवशी उत्सवचिन्हांचा नमुना बनवून मिळाला. तो नमुना मान्यतेसाठी अंजलीकडे रामनाथी, गोवा येथे पाठवायचा होता. तेव्हा त्यांनीच ‘आम्ही तो पाठवून देतो’, असे सांगितले.
३. केवळ २ दिवसांत सर्व उत्सवचिन्हेे बनवून रामनाथी आश्रमात पोेचवण्याचे नियोजन होणे
३१.४.२०२३ या दिवशी नमुन्याची उत्सवचिन्हे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात अंजलीकडे पोचली. नमुना अंतिम होऊन ५.५.२०२३ पूर्वी उत्सवचिन्हे बनवून रामनाथीला पोचवण्याचे नियोजन झाले. त्या वेळी एवढ्या तातडीने मोठ्या प्रमाणात उत्सवचिन्हे बनवून मिळाल्यामुळे रामनाथी आश्रमातील साधकांना आश्चर्य वाटले. ‘ही सर्व उत्सवचिन्हे केवळ २ दिवसांत बनवून मिळाली’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४. शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही सेवेसाठी ८ ते १० कि.मी. पायी चालूनही थकवा न जाणवणे किंवा पायही न दुखणे
उत्सवचिन्हे बनवून घेण्यासाठी कार्यालयात जाऊन-येऊन मला ८ ते १० कि.मी. चालावे लागले. त्या वेळी माझी शारीरिक स्थिती ठीक नव्हती; परंतु आश्रमात पोचल्यावरही मला थकवा जाणवला नाही आणि माझे पायही दुखले नाहीत. ‘जणूकाही गुरुदेवांनीच मला अलगद उचलून घेतले होते’, असे मला जाणवले.
५. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या सेवेत सहभागी करून घेतल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. ‘ईश्वर त्याच्या भक्तांची लहानात लहान इच्छाही पूर्ण करतो’, हे मी या प्रसंगातून पुन्हा अनुभवले.
प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक साधकाच्या छातीवरील उत्सवचिन्ह पाहून माझे मन भरून येत होते. त्या उत्सवचिन्हांकडे पाहून साधकांनाही पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. तेव्हा ‘गुरुमाऊलीने त्या कार्यक्रमानिमित्त साधकांना स्थुलातून दिलेली ती लहानशी भेट होती’, हे माझ्या लक्षात आले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.६.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |