निवृत्त सैनिकांना प्रशासकीय अधिकार्यांकडून योग्य मान मिळत नाही !
सैनिकांनी तहसीलदार कार्यालयातील बैठकीत व्यक्त केली खंत !
कुडाळ – ‘आम्ही देशासाठी सेवा केली; मात्र सेवानिवृत्त झाल्यावर प्रशासनाकडून जो मान मिळाला पाहिजे, तो मिळत नाही’, अशी खंत येथे तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत उपस्थित सैनिकांनी व्यक्त केली. या वेळी तहसीलदार अमोल पाठक यांनी, ‘तुम्ही कधी या ! तुमची कामे सांगा ! ती मार्गी लावली जातील. तुमचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि तो मान ठेवला जाईल’, असे सांगून सैनिकांची खंत दूर करण्याचे आश्वासन दिले.
‘अमृत जवान अभियाना’च्या अंतर्गत सेवेत कार्यरत असलेले सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या समवेत तहसीलदार पाठक यांनी तहसील कार्यालयात बैठक घेतली. या वेळी ‘आम्ही देश सेवेसाठी बाहेरगावी असतांना आमच्या गावच्या ठिकाणी ७/१२ मध्ये झालेले पालट रहित करण्यासाठी आम्हाला हेलपाटे मारावे लागतात. शासकीय कर्मचार्यांकडून माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारे मान दिला जात नाही, ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे आमची कामे मार्गी लावा’, असे सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर सावंत यांनी सांगितले. या बैठकीमध्ये अनेक माजी सैनिकांनी गावात तलाठी देत असलेल्या वागणुकीविषयी अप्रसन्नता व्यक्त केली.
यावर तहसीलदार पाठक यांनी, ‘सैनिक आमच्या देशाचा सन्मान आहे. असे असतांनाही काही अधिकार्यांकडून अशा प्रकारे वागणूक दिली जाते, हे चुकीचे आहे. यापुढे तुमची कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करीन. तुमचा मान राखला गेला पाहिजे’, असे सांगितले. या वेळी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू, पोलीस कर्मचारी, कृषी अधिकारी, साहाय्यक गटविकास अधिकारी, बाळकृष्ण चव्हाण, पद्मनाभ परब, सुभाष शिर्के यांच्यासह सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
संपादकीय भूमिकादेशात सैनिकी शिक्षण अनिवार्य केल्यास निवृत्त सैनिकांना मान देण्याचे महत्त्व आपोआपच लक्षात येईल. |