महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासाठी बिल्‍वपत्र बनवणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) !

१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्र झाली. त्‍यानिमित्त कु. श्रिया राजंदेकर (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के) हिने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शिवस्‍वरूपात पाहून त्‍यांच्‍या चरणी बिल्‍वपत्र अर्पण करण्‍याचे ठरवले. ते बनवतांना तिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

१. महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासाठी बिल्‍वपत्र बनवणे

कु. श्रिया राजंदेकर

‘महाशिवरात्रीच्‍या आदल्‍या दिवशी माझ्‍या मनात विचार आला, ‘उद्या महाशिवरात्र आहे. मी गुरुदेवांसाठी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासाठी) काय बनवू शकते ?’ तेव्‍हा गुरुदेवांच्‍याच कृपेमुळे माझ्‍या मनात विचार आला, ‘शिवाला बिल्‍वपत्र प्रिय आहे; म्‍हणून मी गुरुदेव आणि अन्‍य काही संत यांच्‍यासाठी कागदाची बिल्‍वपत्रे बनवू शकते. त्‍यानंतर मी बिल्‍वपत्र बनवण्‍यास आरंभ केला. ‘बिल्‍वपत्र अधिक परिपूर्ण आणि देवाला आवडेल’, असे कसे करू शकते ?’, हे माझ्‍या लक्षात येत नव्‍हते. तेव्‍हा मी माझ्‍या बाबांचे (श्री. अनिरुद्ध राजंदेकर (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के) यांचे) साहाय्‍य घेऊन सर्व बिल्‍वपत्रे बनवली.

२. बिल्‍वपत्रे बनवतांना ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी भाव, भक्‍ती आणि श्रद्धा या ३ पानांचे बिल्‍वपत्र अर्पण करायचे आहे’, असे वाटणे

बिल्‍वपत्रे बनवतांना माझ्‍या मनात विचार आला, ‘मला गुरुदेवांना टवटवीत, म्‍हणजे खरे कोवळ्‍या पानांचे बिल्‍वपत्र अर्पण करायचे आहे. मी स्‍थुलातून कागदाचे बिल्‍वपत्र बनवून अर्पण करू शकते; पण सूक्ष्मातून मला गुरुदेवांच्‍या चरणी भाव, भक्‍ती आणि श्रद्धा या ३ पानांचे बिल्‍वपत्र अर्पण करायचे आहे.’

३. बिल्‍वपत्रे बनवतांना आलेल्‍या अनुभूती

अ. माझे मन एकदम शांत होते.

आ. ‘मी माझ्‍या खोलीत बसलेली नसून कुठेतरी दुसरीकडेच बसले आहे’, असे मला जाणवले.

इ. मला माझ्‍या शरिराभोवती गारवा जाणवत होता. प्रत्‍यक्षात वातावरणात उष्‍णता होती.

४. बिल्‍वपत्रे बनवून झाल्‍यानंतर जाणवलेली सूत्रे

अ. बिल्‍वपत्रे बनवून झाल्‍यावर माझ्‍या मनामध्‍ये विचार आला, ‘प.पू. गुरुदेव साक्षात् शिवस्‍वरूप आहेत. ‘हे बिल्‍वपत्र मी सूक्ष्मातून त्‍यांच्‍या चरणी अर्पण केल्‍यावर त्‍या बिल्‍वपत्राच्‍या माध्‍यमातून प.पू. गुरुदेव मला साधना करण्‍यासाठी अधिकाधिक बळ देणार आहेत.’

आ. हे बिल्‍वपत्र शिवस्‍वरूप गुरुदेवांच्‍या भेटीसाठी आतुर झाले असून ‘त्‍याच्‍यात गुरुदेवांच्‍या चरणी अर्पण होण्‍याची तळमळ निर्माण झाली आहे’, असे मला जाणवत होते.

इ. विशेष म्‍हणजे ‘ते कागदाचे बिल्‍वपत्र आहे, असे न वाटता मला ते खरोखरचे आहे’, असेच वाटत होते.’

– कु. श्रिया राजंदेकर (पू. वामन यांची बहीण, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय १२ वर्षे) (२६.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक