नम्र आणि साधनेला प्राधान्‍य देणारे भांडुप, मुंबई येथील श्री. कुणाल मदन चेऊलकर (वय ४० वर्षे) !

‘श्रावण शुक्‍ल एकादशी (२७.८.२०२३) या दिवशी श्री. कुणाल मदन चेऊलकर यांचा ४० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या पत्नीला लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

श्री. कुणाल चेऊलकर

१. पत्नीवर साधनेचे संस्‍कार करणे

‘माझी श्री. कुणाल यांच्‍याशी ओळख झाल्‍यापासून जेव्‍हा जेव्‍हा आम्‍ही भेटत किंवा बोलत असू, तेव्‍हा कुणाल माझ्‍याशी केवळ ‘साधना’ या विषयावरच बोलत असत. त्‍यांच्‍यामुळेच माझ्‍यावर ‘प्रत्‍येक प्रसंगात साधनेचा दृष्‍टीकोन घेऊन पुढे जायचे. मायेपासून दूर जायचे’, असे संस्‍कार झाले आहेत.

२. पत्नीच्‍या मनावर ‘ईश्‍वरप्राप्‍ती हेच जीवनाचे ध्‍येय आहे’, असे बिंबवणे 

त्‍यांनी हळूहळू मला सेवेला न्‍यायला आरंभ केला. गुरुपौर्णिमेच्‍या वेळी त्‍यांनी माझ्‍या सेवेचे नियोजन केले. त्‍यांच्‍यामुळे माझ्‍या मनावर ‘नोकरी करण्‍यापेक्षा साधना केल्‍यासच माझ्‍या जन्‍माचे सार्थक होणार आहे. ईश्‍वरप्राप्‍ती हेच जीवनाचे ध्‍येय आहे’, हे विचार बिंबले.

३. पत्नीला सेवेला प्राधान्‍य द्यायला सांगणे

लग्‍नाच्‍या आधी मला घरून साधना करायला विरोध होता; परंतु लग्‍न झाल्‍यावर कुणाल यांनी मला साधनेसाठी पाठिंबा दिला. कुठल्‍याही प्रकारची सेवा आली, तरीही कुणाल मला सेवेला प्राधान्‍य द्यायला सांगतात.

४. साधनेचा विचार करून निर्णय घेणे

सौ. काव्‍या चेऊलकर

ते प्रत्‍येक निर्णय साधनेचा विचार करून घेतात. त्‍यांनी घेतलेल्‍या निर्णयाला काही वेळा माझा विरोध असे; मात्र ‘त्‍यांच्‍या निर्णयामुळे मला साधना करता आली’, त्‍याबद्दल मला कृतज्ञता वाटते.

आम्‍ही दोघे नोकरी करत असतांना घरातील साहित्‍य ठेवण्‍यासाठी जागा अपुरी असल्‍यामुळे मोठी खोली घ्‍यावी लागणार होती. त्‍या वेळी कुणाल यांनी सांगितले, ‘‘आपण पनवेल येथील आश्रमाच्‍या बाजूला खोली घेऊया, म्‍हणजे आपल्‍याला उर्वरित वेळेत सेवा करण्‍यासाठी आश्रमात जाता येईल.’’ आरंभी ‘घरापासून एवढे दूर जायला नको’, असे माझे मत होते; मात्र कुणाल यांनी आश्रमाजवळ असलेल्‍या संकुलात भाड्याने घर घेतले. आम्‍ही पनवेल येथे रहायला आलो. त्‍यांच्‍या या निर्णयामुळे नंतर आम्‍हा दोघांना पूर्णवेळ साधना करता आली.

५. कौटुंबिक दायित्‍व निभावणे

आम्‍ही कुटुंबियांपासून दूर रहायला गेलो, तरीही कुणाल नेहमी कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस करतात. माझे आई-वडील आणि सासू-सासरे रुग्‍णाईत असतांना त्‍यांना कुणाल यांनी तत्‍परतेने साहाय्‍य केले. जून २०२३ पासून माझे सासरे कर्करोगाने रुग्‍णाईत असून त्‍यांना पुष्‍कळ त्रास होत आहे. त्‍यांची वेदनांमुळे चिडचिड होते. श्री. कुणाल संयम ठेवून प्रेमाने आणि आपुलकीने त्‍यांची सेवा करतात.

६. काटकसरी

कुठलीही वस्‍तू किंवा कपडे घेण्‍याआधी ‘त्‍याची आपल्‍याला खरंच आवश्‍यकता आहे का ?’, असा विचार करूनच ते वस्‍तू किंवा कपडे खरेदी करतात. मी त्‍यांना काही घ्‍यायला सांगितले, तर ते मलाही हाच दृष्‍टीकोन देतात.

७. निर्मळ मन

त्‍यांच्‍या मनात कधीच कोणत्‍याच व्‍यक्‍तीविषयी वाईट विचार येत नाहीत. कुणी कुणाल यांच्‍याशी वाईट वागले किंवा वाद घातला, तरी ते नेहमीच त्‍या व्‍यक्‍तीशी चांगलेच वागतात.

८. नम्रतेने बोलून परिस्‍थिती सकारात्‍मक करणे

अ. एकदा आम्‍ही माझ्‍या नातेवाइकांसह देवदर्शनासाठी कोकणात गेलो होतो. त्‍या वेळी दुपारची वेळ असल्‍याने माझ्‍या आतेसासूबाईंच्‍या कुलदेवतेच्‍या मंदिराचे दार बंद होते. आम्‍ही दुरून आलो असल्‍याने मंदिराचे दार बंद पाहून कुटुंबियांनी वाद घालण्‍यास आरंभ केला. तेव्‍हा श्री. कुणाल यांनी पुजार्‍याच्‍या घरी जाऊन त्‍यांना नम्रपणे विनंती करून काही वेळासाठी मंदिराचे दार उघडायला सांगितले. पुजार्‍यांनी आम्‍हाला मंदिराचे दार उघडून दिले आणि आम्‍हाला देवदर्शन घडले.

आ. आम्‍ही कोकणातून परत येतांना वाहनचालक आमच्‍याकडून एका दिवसाचे अधिकचे पैसे मिळवण्‍यासाठी गाडी फार हळू चालवत होता. त्‍या वेळी वाहनचालक आणि आमचे कुटुंबीय यांच्‍यात वाद झाला. तेव्‍हा श्री. कुणाल यांनी गाडीच्‍या मालकाला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘चालक असे करत आहे, तर कसे करायचे ?’’ त्‍यावर मालकाने सांगितले, ‘‘चालकाला अधिकचे पैसे देऊ नका.’

९. तत्त्वनिष्‍ठ

अ. आमचे लग्‍न झाल्‍यावर कुणाल यांनी कधीही ‘पत्नी म्‍हणून माझी बाजू घेतली आहे किंवा आई म्‍हणून माझ्‍या सासूबाईंची बाजू घेतली’, असे झाले नाही. ते नेहमी प्रसंगाचा अभ्‍यास करून त्‍या प्रसंगात ज्‍याचे चुकले आहे, त्‍याला तत्त्वनिष्‍ठतेने चूक लक्षात आणून देतात.

आ. माझ्‍या संदर्भात कधी आश्रमात किंवा कौटुंबिक जीवनात एखादा संघर्षाचा प्रसंग घडला आणि मी कुणाल यांना सहजतेने त्‍याविषयी सांगितल्‍यास ते साधनेचे दृष्‍टीकोन देऊन मला त्‍या प्रसंगातून बाहेर काढतात.

इ. त्‍यांनी मला कधीच मानसिक किंवा भावनिक स्‍तरावर सांभाळले नाही. पूर्वी मला या गोष्‍टीचे वाईट वाटायचे; परंतु आता मला वाटते, ‘कुणाल माझ्‍याशी असे वागल्‍यामुळेच मी साधनेच्‍या प्रवासात घडत गेले.’

१०. कृतज्ञता

‘श्री गुरुकृपेने मला श्री. कुणाल पती म्‍हणून लाभले आणि मला साधना करता येत आहे’, त्‍याबद्दल मी गुरुचरणी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी) कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. काव्‍या कुणाल चेऊलकर (श्री. कुणाल यांची पत्नी), भांडुप, मुंबई (१९.८.२०२३)