नर्मदेची पायी परिक्रमा करून मिलिंद चवंडके यांनी शहराच्या नावलौकिकात मानाचा तुराच खोवला ! – संभाजी कदम, शिवसेना
अहिल्यानगर – नर्मदेची पायी परिक्रमा करणारे पत्रकार मिलिंद चवंडके यांनी नगर शहराच्या नावलौकिकात मानाचा तुराच खोवला आहे. गेली अडीच-तीन तपे त्यांनी पत्रकारितेचे व्रत सांभाळतांना धार्मिक कार्याची आवडही जपली, हे विशेष आहे. त्यांच्या लेखणीमधून नर्मदा नदीच्या परिक्रमेचा ग्रंथ सिद्ध झाल्यास तो भाविकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे उद़्गार शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी श्री. मिलिंद चवंडके यांच्याविषयी काढले. सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय गेनाप्पा यांनी पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते.
श्री. संजय गेनाप्पा म्हणाले, ‘‘नर्मदा नदीची परिक्रमा श्रद्धेने आणि निष्ठेने करून चवंडके यांनी जीवनभर विनाखंड केलेल्या धर्मकार्याची आवडच अधोरेखित केली आहे. नवनाथांमधील श्रीकानिफनाथांची पहिली मराठी ओवीबद्ध पोथी त्यांनी लिहीली. या पोथीची श्रावण मासात भाविकांकडून पारायणे चालू आहेत. चवंडके यांनी नर्मदा नदीच्या पायी परिक्रमेवर ग्रंथ निर्मिती करावी. नर्मदा परिक्रमेच्या ग्रंथासाठी साहाय्य केल्यास या ऐतिहासिक पुण्यकार्यास साहाय्य केल्याचे समाधान आपल्या सर्वांनाच मिळेल.’’
नगरसेवक दत्तात्रेय कावरे म्हणाले, ‘‘पायी परिक्रमा करणे ही महाकठीण तपस्या असून ती पूर्ण होण्यासाठी भाग्यच लागते. चवंडके यांनी ही परिक्रमा पूर्ण केली, याचे कौतुक वाटते. परिक्रमा करतांना पत्रकाराच्या दृष्टीतून त्यांनी टिपलेले अनुभव त्यांच्याच कसलेल्या लेखणीमधून वाचण्याचा आनंद घेणे, ही पर्वणीच आहे.’’
या कार्यक्रमास सर्वश्री माजी नगरसेवक दत्तात्रेय भागानगरे, प्रकाश इंदापूरकर, दत्तात्रेय मिसाळ, अभिजित देशमुख, सचिन बोरा, दिलीप पाठक, अप्पू बेद्रे, सुजीत गोंगले, धारू भागानगरे, सागर चवंडके, सचिन खताडे, नंदकुमार भागानगरे, सुरज गेनाप्पा, गणेश घटी, विशाल गेनाप्पा, अर्जुन शहापूरकर, विजय काटकर, सुजय गेनाप्पा, सौ. राणी भागानगरे, सौ. राणी खताडे, सौ. भारती भागानगरे, सौ. छाया इंदापूरकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.