‘वर्सोवा-विरार सी-लिंक’, ‘मेट्रो ११’ यांसाठी जपान साहाय्य करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना देवेंद्र फडणवीस

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या उत्कृष्ट संबंधांमुळे जपान भारताला मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे. ‘वर्साेवा-विरार सी-लिंक’, ‘मेट्रो ११’ आणि ‘मुंबई पूर व्यवस्थापन’ यांसाठी जपान साहाय्य करणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

६ दिवसांच्या जपान दौर्‍यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे २६ ऑगस्ट या दिवशी मुंबईत आगमन झाले. या वेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या दौर्‍यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानांचे सल्लागार, विविध आस्थापनांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका झाल्या. विविध प्रांतांच्या राज्यपालांच्या भेटी झाल्या. तेथील गुंतवणूकदारांची शिष्टमंडळे महाराष्ट्रात येणार आहेत. सोनी आस्थापनही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहे. ‘जायका’, ‘जेट्रो’ यांसारख्या आस्थापनांच्या अधिकार्‍यांशीही चर्चा झाली आहे. चीनमधील गुंतवणूक जपानला सुरक्षित वाटत नाही. भारताकडे ते सुरक्षित देश म्हणून पहात आहेत. भारताच्या क्षमतेवर त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला आहे. त्यातील मोठा वाटा महाराष्ट्रात येण्यासाठी आपला प्रयत्न राहील.’’

जपानकडून अशा प्रकारे होणार सहकार्य !

१. वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो ११ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा), मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य

२. मेट्रो स्थानकांनजीकच्या भागाचा विकास

३. महामार्ग आणि स्टील पॅनेल रस्त्यांसाठी बांधकाम अन् व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये सहकार्य

४. पुणे येथे ‘स्टार्ट अप हब’ (नवीन उद्योगांसाठी चालना देणारे केंद्र) विकसित करण्यासाठी सहकार्य

५. सेमीकंडक्टर क्षेत्रातसुद्धा गुंतवणूक

६. जपानमधील वाकायामा येथील गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करणार !

७. पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धनासाठी साहाय्य

८. मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय्.आय्.टी.) संशोधनासाठी सहकार्य