सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन
‘आसक्ती’ हा स्वभावदोष असणे
१. आसक्ती
‘परमात्मा सोडून (गुरु, ईश्वर किंवा धर्मशास्त्र इत्यादींना सोडून) स्वतःचे अज्ञान दृढ करणारी कोणतीही इच्छा असेल, कुणामध्ये जीव अडकला असेल किंवा कुणाकडून कशाची तरी आस लागली असेल किंवा अन्य कुणाकडून अपेक्षा असेल, तर ती आमच्यासाठी सुखदायी असो किंवा दुःखकारक असो, ती आसक्तीच आहे.
२. स्वतःच्या दुःखाचे कारण आसक्तीच असणे
स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.
३. व्यक्तीची जी आसक्ती उत्तम समाजव्यवस्थेला बाधक ठरणारी असते, ती अधर्मच असणे
आपली अपेक्षा किंवा इच्छापूर्तीचे प्रयत्न, जे दुसर्यांच्या जीवनात किंवा समाजात अशांती निर्माण करतात, म्हणजे उत्तम समाजव्यवस्था राखण्यात बाधा बनतात आणि जे धर्मसंमत, समाजसंमत किंवा नीतीमूल्यांना संमत नसतील, तर ती आसक्ती ‘अधर्म’ असते.
४. निष्कामपणे, म्हणजे कोणत्याही आसक्तीविना केलेले कर्म हे ‘कर्तव्यधर्म’ असणे
अ. धर्मशास्त्राचे पालन करणे, स्वतःच्या कल्याणाची इच्छा आणि उत्तम समाजव्यवस्था या उद्देशाने वर्तमान नियम अन् कायद्यांचे पालन करणे किंवा त्यांचे पालन करण्याची इतरांकडून अपेक्षा करणे, ही आसक्ती नसून ‘कर्तव्यधर्म’ आहे.
आ. ज्या कर्मात स्वतःचा स्वार्थत्याग असेल, ‘इतरांचा विचार किंवा इतरांचा उत्कर्ष व्हावा’, असा भाव असेल आणि धर्ममार्गावर चालणे किंवा पुरुषार्थ पालन करण्याचा भाव असेल, तर ते ‘धर्मकर्म’ असते. या कोणत्याही प्रतिक्रियेविना आणि फळाची आसक्ती नसलेल्या कर्मामुळे साधकामध्ये निष्कामता येते अन् तो आसक्तीरहित होऊन जातो.
५. केवळ ‘ईश्वरप्राप्ती’ ही एकच आसक्ती साधकाला अन्य सर्व आसक्तींपासून सोडवणारी असते.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१३.१.२०२३)