सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ‘अच्युताष्टकम्’वर नृत्य सादर करणार्‍या कु. वैष्णवी गुरव यांनी अनुभवला भावभक्तीचा वर्षाव !

नृत्यसेवेच्या माध्यमातून अनुभवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीमन्नारायणस्वरूप !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नृत्याचा सराव करतांना

अ. ‘नृत्याचा सराव करतांना सर्वांकडून नृत्यातील रचना एकसारखी येण्यासाठी आम्ही पुनःपुन्हा सराव करत होतो. तेव्हा सर्वांची ती रचना एकसारखी आल्यावर आम्हाला अकस्मात् जणू चंदनाचा धूप लावल्याप्रमाणे सुगंध येत होता. तेव्हा ‘परिपूर्णतेत भगवंत आहे’, याची प्रचीती देवाने आम्हाला दिली.

आ. नृत्याचा सराव करतांना मला पुष्कळ हलके वाटायचे. सराव करतांना प्रत्येक वेळी देव आम्हाला आनंदाची अनुभूती देत होता.

कु. वैष्णवी गुरव

इ. सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय) यांनी नृत्यातील सुधारणा सांगतांना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे रचना करून ‘त्यांतील कोणत्या रचनांमध्येे भाव आणि आनंद यांची अनुभूती येते ?’, याचा अभ्यास करायला सांगितला. त्यामुळे आम्हाला नृत्यातील बारकावे शिकायला मिळाले.

ई. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी आम्हाला गोपीभावाचे ध्येय ठेवायला सांगितले. त्यानंतर ‘सराव करतांना आम्ही श्रीकृष्णाविषयी कधी बोलायला लागलो आणि त्यात कधी रममाण झालो ?’, हे आमचे आम्हाला कळलेच नाही.

उ. १.५.२०२३ या दिवशी मला पुढील स्वप्न पडले, ‘आम्ही एका डोंगरावर आहोत. तिथे लाल पडद्यांचा मोठा दरबार आहे आणि आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वाट बघत आहोत.’ त्या वेळी ‘ब्रह्मोत्सव’ पटांगणावर होणार आहे’, हे मला ठाऊक नव्हते. देवाने मला ते आधीच स्वप्नातून दाखवले.

ऊ. ज्या दिवशी नृत्याची रंगीत तालीम होती, त्या दिवशी नृत्य करतांना मला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले.

ए. एकदा नृत्याचा सराव करतांना सर्व संत उपस्थित होते. त्या वेळी मला पुष्कळ भाव आणि आनंद यांची स्पंदने जाणवत होती. नृत्य करतांना माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.

२. ‘ब्रह्मोत्सवा’च्या दिवशी नृत्य करतांना

नृत्यामध्ये श्रीकृष्णाची एक मुद्रा साकारतांना कु. वैष्णवी गुरव

अ. ११.५.२०२३ या दिवशी सकाळी मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

आ. मी नृत्यासाठी स्वतःची सिद्धता करत असतांना माझ्या मनात ‘आम्ही गोपींची सिद्धता करत आहोत’, असा विचार येऊन मला पुष्कळ चांगले वाटत होते.

इ. परम पूज्यांच्या समोर नृत्य करतांना वातावरण पुष्कळ हलके वाटत होते.

ई. ‘नृत्याचे व्यासपीठ आकाशामध्ये आहे’, असे मला जाणवत होते.

उ. ‘नृत्य करणार्‍या आम्ही १२ जणी एकच झाल्या आहोत’, असेच मला वाटत होते. नृत्य करतांना मला पुष्कळ आनंद होत होता.

ऊ. गोपी कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन होऊन रासलीला करत होत्या. त्याचप्रमाणे आम्ही सर्व जणी कृष्णाच्या स्तुतीपर गीतात तल्लीन झालो होतो.

ए. नृत्याचा सराव करतांना मला माझे अस्तित्व जाणवत होते; पण ‘ब्रह्मोत्सवा’च्या दिवशी माझा देह पूर्ण हलका होऊन तिथे मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते आणि ‘हे नृत्य कुठल्यातरी लोकात होत आहे’, असे मला वाटले.

‘हे श्रीकृष्णा, ‘तुझ्या कृपेमुळे मला ही नृत्यसेवेची संधी मिळाली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

(क्रमशः)

– कु. वैष्णवी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक