‘चंद्रयान-३’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या दिशेने आध्यात्मिक वाटचाल !
भारताची चंद्रमोहीम यशस्वी होणे, यामध्ये जाणवलेल्या सूक्ष्म घडामोडी !
- ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्रो’ने) ‘चंद्रयान-३’ अंतराळात सोडून चंद्रावर यान उतरवण्याची मोहीम यशस्वी करून दाखवली आणि सर्व जगाची शाबासकी मिळवली. ‘चंद्रयान-३’पासून अलग झालेले ‘विक्रम लँडर’ २३.८.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.०४ वाजता चंद्रावर अलगद उतरले आणि त्या वेळी सर्व भारतियांनी रोखून धरलेला श्वास सोडून आनंद व्यक्त केला. मीही ते पहात होतो. त्यामुळे मलाही पुष्कळ आनंद झाला आणि ‘इस्रो’मधील सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक वाटले.
१. ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वी उतरण्याविषयी जाणवलेल्या सूक्ष्मातील गोष्टी
१ अ. ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरण्यासाठी २३ आणि २७ ऑगस्ट २०२३ या दिनांकांपैकी २३ ऑगस्ट हा दिनांकच स्पंदनांवरून योग्य असल्याचे जाणवणे आणि शास्त्रज्ञांनीही तोच दिनांक निवडणे : २३.८.२०२३ या दिवशी सकाळी ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ ठरवणार होते की, आज (२३.८.२०२३ या दिवशी) ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरवायचे कि २७.८.२०२३ या दिवशी उतरवायचे; पण त्यांनी २३.८.२०२३ हा दिनांकच निश्चित केला. त्या दोन्ही दिनांकांच्या स्पंदनांचा अभ्यास केल्यावर मला २३ ऑगस्ट हा दिनांकच योग्य असल्याचे जाणवले आणि शास्त्रज्ञांनीही तोच दिनांक निवडला.
१ आ. २३.८.२०२३ या दिवशी आतून निश्चित वाटत होते, ‘विक्रम लँडर’ सहजतेने चंद्रावर उतरेल’ आणि तसेच झाले.
१ इ. ‘विक्रम लँडर’ चंद्राजवळ येण्याच्या आणि चंद्रावर उतरण्याच्या प्रवासात सूक्ष्मातून कुठलाच अडथळा न जाणवणे आणि त्याचे चंद्रावर उतरणे सहजतेने व्हावे, यासाठी श्रीकृष्णाचा नामजप करणे : ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरण्याच्या ७ मिनिटे आधीपासून मी त्याचा चंद्राच्या जवळ येत असतांनाचा प्रवास पहात होतो. त्या वेळी मी ‘त्याच्या प्रवासात काही अडथळा आहे का ?’, हे सूक्ष्मातून पाहिले; पण मला कोणताच अडथळा जाणवला नाही. त्यामुळे मी निश्चिंत झालो आणि मी ‘विक्रम लँडर’चा प्रवास असाच सहजतेने होऊन तो सुखरूप चंद्रावर उतरावा’, यासाठी श्रीकृष्णाचा नामजप करू लागलो. खरोखरच ‘विक्रम लँडर’ अगदी अलगदपणे चंद्रावर उतरला. यामुळे मी श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
२. भारताने यान चंद्रावर उतरवण्यात यश संपादन करणे, याचा जाणवलेला भावार्थ
‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे’, असे अनेकांनी भाकीत केले आहे आणि ती वेळ काही वर्षेच दूर आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे ‘सात्त्विक असे ईश्वरी राज्य (आदर्श असे रामराज्य) स्थापन होणार आहे.’ ही एकप्रकारे भारताची आध्यात्मिक उन्नतीच आहे. एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती साध्य करायची असते, तेव्हा तिला प्रथम मन शुद्ध करून आणि मनावर विजय प्राप्त करून (स्वेच्छा त्यागून) ‘मनोलय’ करावा लागतो. त्यानंतर बुद्धीला सात्त्विक करून ‘बुद्धीलय’ करावा लागतो आणि त्यानंतर सूक्ष्म अहं दूर करून ‘अहंलय’ करावा लागतो. त्यानंतर ती व्यक्ती ईश्वराशी एकरूप होण्यास पात्र होते. चंद्र हा मनावर परिणाम करणारा (मनाचा कारक) आहे. भारताने चंद्रावर यान उतरवून यश संपादन केले, म्हणजे एकप्रकारे चंद्राला जिंकले आहे. याचा अर्थ भारताने मनोलयाकडे वाटचाल केली आहे. अशा प्रकारे भारताने ईश्वरी राज्य आणण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचा हा संकेत आहे. वर्ष २०२४ मध्ये त्याने चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल टाकण्याचाही निर्धार केला आहे. तसेच तो सूर्य आणि सूर्याभोवतीचे वातावरण यांचा अभ्यास करण्यासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये ‘आदित्य एल् १’ हे यान पाठवणार आहे. सूर्य हा बुद्धीचा प्रेरक आहे. त्यामुळे भारताची बुद्धीलयाकडेही वाटचाल होत आहे. ‘सूर्याचा अभ्यास करून त्याला जाणून घेतले की, भारताची बुद्धी सात्त्विक होण्यास साहाय्य होईल’, असे वाटले. हे एकप्रकारे त्याचा आशीर्वाद घेण्यासारखेच आहे.
गुरुकृपेनेच ही सेवा घडली, यासाठी मी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.८.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |