वर्तमान शालेय आणि अध्यात्म शिक्षण यांतील भेद !
‘शिक्षकाने नकाशात दाखवलेल्या अमेरिकेला सत्य मानून अभ्यास करणारे; मात्र संतांनी दाखवलेल्या देवतेच्या चित्रावर श्रद्धा ठेवून अध्यात्माचा अभ्यास न करणारे बुद्धीवादी नव्हे, तर अध्यात्मविरोधी आहेत, असे म्हणता येईल. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
१. ‘देव दाखव’, असे म्हणणार्या शिक्षकांनी अध्यात्मातील विद्यार्थी होण्याचे मान्य करणे
मी साधनेत आल्यानंतर एकदा गावी गेलो होतो. तेथे मला माझे परिचित असलेले भूगोल विषयाचे शिक्षक भेटले. ते म्हणाले, ‘‘पिंगळे, तुम्ही एक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ असून अध्यात्माकडे वळला. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय शिक्षणाची एक जागा व्यर्थ केली, असे तुम्हाला वाटत नाही का ?’’ त्यावर मी म्हटले, ‘‘नाही सर, मला तसे वाटत नाही; कारण आता मी केवळ वैद्यकीय विज्ञानच नव्हे, तर अन्य विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म विज्ञानाचे अध्ययन करत आहे. त्यामुळे काही व्यर्थ झाले आहे, असे मला वाटत नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तू अध्यात्म विज्ञानाचा अभ्यास करतो, तर देव पाहिला आहे का ? देव दाखव अन्यथा लिहून दे की, देव नाही म्हणून !’’ त्यावर मी खिशातून एक भगवान श्रीकृष्णाचे चित्र काढले आणि त्यांना सांगितले, ‘‘हा पहा देव. मी हा देव पाहिला आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हे तर चित्र आहे, देव कुठे आहे ?’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘सर, तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना भूगोल शिकवला. तुम्ही जगाचा नकाशा आणून भिंतीवर टांगून आम्हाला शिकवले. तुम्ही सांगत असे की, नकाशावरील हे क्षेत्र अमेरिका देश आहे. मला कळत होते की, ही अमेरिका नसून तुम्ही कागदाच्या नकाशावर ती प्रातिनिधिक दाखवत आहात. तरीही शिक्षण घेतांना शिक्षकांवर श्रद्धा ठेवून ‘तुम्ही सांगता ते खरे आहे’, ही श्रद्धा ठेवून आम्ही विद्यार्थी मान्य करत होतो की, ती अमेरिका आहे. तसेच माझ्या गुरूंनी देवतांची चित्रे दाखवून ‘देव असे असतात’, असे सांगितले आणि ‘या देवाच्या प्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगून मार्गही दाखवला. मी त्यांनी सांगितल्यानुसार साधना केली आणि मार्गदर्शन घेतले; म्हणून मला देवाचे दर्शन झाले. त्यामुळे मी देव पाहिला आहे आणि तो या चित्राप्रमाणे आहे, असे तुम्हाला सांगितले.’’
पुढे मी म्हटले, ‘‘सर, आम्ही विद्यार्थीही शाळेत तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की, एवढ्या छोट्या नकाशात एवढी अवाढव्य अमेरिका कशी असू शकते ? अमेरिका आताच्या आता आम्हाला दाखवा नाही, तर अमेरिका नाही, असे लिहून द्या; पण शिकणार्या विद्यार्थ्यांचा हा आततायीपणा ठरू शकतो. तसेच तुमचे ‘देव दाखवा नाही, तर देव नाही, म्हणून लिहून द्या’, असे म्हणणे म्हणजे आततायीपणा आहे, असे इतरांना वाटू शकते.’’
त्यावर आमचे भूगोलाचे सर म्हणाले, ‘‘अमेरिका अशी तुला दाखवू शकणार नाही. त्यासाठी तुला पुष्कळ पैसे कमवायला लागतील, पारपत्र (पासपोर्ट) काढावा लागेल, तो मिळाल्यावर अमेरिकेचा ‘व्हिसा’ घ्यावा लागेल. मगच तू अमेरिका पाहू शकतो. असे कुणीही उठला आणि अमेरिका पहाण्यास जातो, असे म्हणू शकत नाही.’’ त्यावर मी त्यांना म्हटले, ‘‘देव पहायचा असेल, तर तुम्हाला गुरूंना किंवा संतांना शरण जावे लागेल. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर श्रद्धा ठेवून साधनेचे प्रयत्न करावे लागतील. श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घालता आली, तर तुम्हाला देवाचे दर्शन निश्चित होईल. कुणी म्हणेल ‘मला देव दाखवा आणि दाखवता आला नाही, तर देव नाही, असे लिहून द्या’, असे कसे शक्य आहे ? साध्या नकाशात दाखवलेल्या आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकणार्या स्थूल दृश्य अमेरिकेला पहाण्यासाठी एवढी उठाठेव करावी लागते. कुणी साधारण व्यक्ती अमेरिका पहाण्याचा विचारही करू शकत नाही, तर मन आणि बुद्धी यांपलीकडील सूक्ष्मातीसूक्ष्म देवतेचे (ईश्वराचे) दर्शन कुणी म्हटले; म्हणून होणे शक्य तरी आहे का ?’’
भूगोलाचे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ नकाशातील अमेरिका दाखवू शकतात, प्रत्यक्ष नाही. ही त्यांची मर्यादा आहे. तसेच एखादा बुद्धीवादी किंवा नास्तिक यांना वाटते; म्हणून देव दाखवण्यात मर्यादा असू शकतात, असा विचार करावा. श्रद्धाहीन आणि बुद्धीवादी यांनी देव पहाण्याची किंवा देवाला ओळखण्याची त्यांची क्षमता आहे का ? याचा विचार केल्यास ‘देव दाखवा अन्यथा देव नाही, असे लिहून द्या’, असे तर्कहीन बुद्धीहीन प्रश्न पुन्हा कोणत्या संतांना यापुढे ते विचारणार नाहीत, असे निश्चित मला वाटते. सरते शेवटी भूगोलचे सर म्हणाले, ‘‘तू माझा व्यावहारिक शिक्षणाचा विद्यार्थी होतास. आज मी तुझा आध्यात्मिक शिक्षणाचा विद्यार्थी झालो.’’
२. देव पहाण्यासाठीची दृष्टी लाभण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करणे आवश्यक !
त्यानंतर मी त्यांना आधुनिक विज्ञान, म्हणजे वैद्यकीय विज्ञानाविषयी एक उदाहरण सांगितलेे की, मी जेव्हा वैद्यकीय शास्त्र (मेडिकल सायन्स) शिकत होतो, तेव्हा आम्हाला तात्त्विकदृष्टीने सर्व माहिती शिकवली जायची. सूक्ष्मजीवशास्त्राच्या वर्गात आम्हाला मलेरिया पॅरासाईट सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे (‘मायक्रोस्कोप’द्वारे) दाखवणार होते. आम्हाला वाटायचे ‘थेअरी’ (तात्त्विक) माहिती आहे, तर सहज पाहू शकू; परंतु सूक्ष्मदर्शक यंत्रात पाहिले, तर काहीच कळत नव्हते. सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या सरांना आम्हाला १०-१० सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये दाखवावे लागत असत. ते म्हणायचे, ‘‘तू म्हणतो ते नाही, हे बाजूचे मलेरियाचे जंतू आहेत.’’ एका अर्थाने ज्यांना मलेरिया जंतूंची चांगली ओळख होती, त्यांनी मला सूक्ष्मदर्शक यंत्रात दाखवले की, याला मलेरियाचे जंतू म्हणतात.
जोपर्यंत सूक्ष्मजीवशास्त्राच्या थेअरीला प्रत्यक्ष सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दाखवणारे गुरु जीवनात येत नाही, तोपर्यंत ‘मलेरिया पॅरासाईट’ ओळखणेही शिकाऊ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कठीण असते. तसेच ज्यांची श्रद्धा नाही, ज्यांनी अध्यात्माच्या थेअरीचा अभ्यास केला नाही आणि अभ्यास केला, तेही केवळ चुका काढण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी, त्यांना देव दाखवला, तरी ते ओळखणार कसे ? देव पहाण्यासाठीची दृष्टी लाभण्यासाठी गुरु असणे महत्त्वाचे आणि त्यासह साधना करावी लागते. साधना, म्हणजे एक प्रकारची तपस्या करावी लागते. देव पहाण्याची इच्छा असणार्यांमध्ये जिज्ञासा आणि मुमुक्षत्व लागते. असे नसणार्यांनी ‘देव आताच्या आता दाखवा’, असे म्हणून कसे होणार ?
मी पुढे म्हणालो, ‘‘यावरून एक लक्षात येते की, सर, तुमच्यावर जेवढी मी श्रद्धा ठेवली, तेवढीच मी अध्यात्मातील माझे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवली. नकाशातील अमेरिकेला जसे प्रातिनिधिक सत्य मानून मी साधना केली, तसे गुरुदेवांनी दाखवलेल्या देवतांच्या चित्रांवर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेली साधना केली, तसेच आज्ञापालन केले. जसे अमेरिका पहाणे शक्य आहे आणि त्यासाठी काय काय करावे लागते ? हे जाणले, तसेच देवता अन् धर्मशास्त्र सत्य आहे, तसेच त्याची अनुभूती घेण्यासाठी काय काय करायचे ? ते जाणून प्रयत्न केले आहे. जसे आधुनिक विज्ञान जे सतत पालटत असतांना ती परिस्थिती अनुभवता येते, तसेच हे अध्यात्म विज्ञान जे अपरिवर्तनशील आणि शाश्वत आहे, ते गुरूंच्या मार्गदर्शनानुसार अनुभवता येते.’’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (४.८.२०२३)
संपादकीय भुमिकाआधुनिक विज्ञान सतत पालटत असतांना ते अनुभवता येते, तसेच अध्यात्म जे अपरिवर्तनशील आणि शाश्वत आहे, ते अनुभवण्यासाठी गुरूच हवेत ! |