करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना कधी थांबणार ?
करवीर म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी जागृत शक्तीपीठ म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे स्वरूप विद्रूप झाल्याची वार्ता मार्च २०२३ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये झळकली होती. ‘श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी काय उपाय करू शकतो ?’, या दृष्टीने मी अलीकडेच प्रत्यक्ष कोल्हापूर येथे गेलो होतो. या संदर्भात मंदिरातील मूर्तीची पहाणी करणे, मूर्तीच्या संदर्भातील विविध शासकीय अहवाल आणि न्यायालयीन कागदपत्रे वाचणे इत्यादी कृती करतांना मूर्ती-अभ्यासक, मंदिराचे श्रीपूजक, मंदिराचे उपाध्याय, करवीर क्षेत्राचे महोपाध्याय, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, स्थानिक हिंदु संघटना, मंदिर-रक्षक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याही भेटी घेतल्या. या सर्व प्रक्रियेत लक्षात आलेली सूत्रे आपल्यासमोर मांडत आहे.
१. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची गेल्या १०० वर्षांपासूनची स्थिती !
अ. वर्ष १९२० मध्ये मूर्तीचा डावा हात भग्न झाला. तो हात गेल्या १०३ वर्षांपासून धातूच्या पट्ट्यांचा जोड देऊन मूर्तीला अडकवण्यात आला आहे, असे प्रत्यक्ष मूर्ती पाहिलेल्या काही तज्ञांकडून समजते. आपला हात फ्रॅक्चर (अस्थिभंग) झाल्यानंतर १ मास गळ्याला अडकवलेल्या अवस्थेत ठेवणे किती कठीण असते, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. विचार करा, देवीचा हात गेली १०३ वर्षे अडकवलेल्या अवस्थेत आहे !
आ. वर्ष १९५५ मध्ये मूर्तीची आत्यंतिक झीज पाहून पुरी पिठाचे शंकराचार्य योगेश्वरानंद तीर्थ यांनी पुढाकार घेऊन मूर्तीवर शास्त्रीय वज्रलेपन केले. कुठल्याही मूर्तीवर तिच्या जीवनकाळात १ किंवा २ वेळाच व्रजलेपन केले जाते. एकदा केलेले वज्रलेपन पुढे न्यूनतम १०० वर्षे मूर्तीचे आयुष्य वाढवत असते. गेल्या ६८ वर्षांत मूर्तीवर वारंवार वज्रलेपन किंवा वज्रलेपनाच्या नावाने अशास्त्रीय ‘रासायनिक संवर्धन’ केले जात आहे. रासायनिक संवर्धन, म्हणजे मूर्तीच्या भंगलेल्या स्थानी रसायनांचे लेपन करणे. हिंदु धर्मशास्त्रात परंपरागत पद्धतीने वज्रलेपन करण्याची अनुमती आहे. सध्याचे रासायनिक संवर्धन हे धर्मशास्त्राचा अभ्यास नसलेल्या पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार प्रत्येक ६ मासांनी केले जात आहे. वज्रलेपन करणे, म्हणजे एखाद्या शरिरावर शल्यकर्म करण्यासारखे असते. प्रत्येक ६ मासाने मूर्तीवर शल्यकर्मासम अत्याचार केले जात आहेत.
इ. मूर्तीची वाढती झीज रोखण्यासाठी वर्ष १९९७ मध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मूळ मूर्तीवर स्नान, अभिषेक आणि नित्योपचार थांबवण्यात आले, ते आजतागायत बंदच आहेत. गेली २६ वर्षे मूर्तीचे शास्त्रीय पूजन आणि नित्योपचार केले न जाणे, हे धक्कादायक आहे. मूर्तीचे पूजन, अभिषेक आदींद्वारे मूर्तीतील देवत्व जागृत होत असते. दूर दूरच्या प्रदेशातून देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या भक्तीची ही कुचेष्टा आहे. या संदर्भात आम्ही कोल्हापूरमधील विविध समाजांतील भाविकांना एकत्र केले. ‘देवीभक्त सकल हिंदु समाज’ हे व्यासपीठ निर्माण करून मंदिराचे प्रशासक असलेल्या सध्याच्या जिल्ह्याधिकार्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे मूर्तीवर स्नान, अभिषेक आणि नित्योपचार चालू करण्याची मागणी केली; परंतु जिल्हाधिकार्यांनी ‘मूर्तीची स्थिती एवढी चांगली नाही’, असे सांगून त्याविषयी हतबलता दर्शवली. ‘मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा हा दुष्परिणाम आहे’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ‘आणखी किती काळ श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला स्नान-अभिषेक करण्यावर बंदी असणार आहे ?’, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
२. वर्ष २०१५ मध्ये झालेले रासायनिक संवर्धन आणि त्यामुळे झालेली हानी !
हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही वर्ष २०१५ मध्ये श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आले.
अ. हे रासायनिक संवर्धन करतांना मूर्तीचा मुख्य भाग असलेला डोक्यावरील नाग न घडवता पुरातत्व विभागाने पूर्ण मुकुट घडवला. तसेच अन्य महत्त्वाची प्रतिके न घडवून मूळ मूर्तीचे रूप पालटले. या संदर्भातही ‘करवीर माहात्म्य’ आणि शिलालेखात स्पष्ट उल्लेख असतांनाही मूर्तीवरील प्रतिके पालटण्यात आली.
आ. मूळ मूर्तीत देवीचे वाहन सिंह स्पष्ट दिसते, तर रासायनिक संवर्धन केलेल्या मूर्तीत सिंहरूप स्पष्ट दिसत नाही. मूळ मूर्तीच्या छायाचित्रातील डोळे हे संवर्धन केलेल्या मूर्तीच्या छायाचित्रापेक्षा अधिक तेजस्वी वाटतात, तसेच संवर्धन केलेल्या मूर्तीच्या तुलनेत मूळ मूर्तीवरील दागिने अधिक ठसठशीत दिसतात.
इ. पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वर्ष २०१७ मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्या वेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली.
ई. वर्ष २०२२-२३ पर्यंत त्याचे आणखीन दुष्परिणाम दिसू लागले. मूर्तीच्या ओठांना झालेली दुखापत लपवण्यासाठी गेल्या वर्षी नवरात्रोत्सवापूर्वी संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर देवीच्या चेहर्यावरील भाव पूर्णपणे पालटले आहेत. २६.१.२०२३ या दिवशी मूर्तीच्या डाव्या कानाजवळील कपचा निघाला. या संदर्भात न्यायालयाने १४.२.२०२३ या दिवशी सुनावणी ठेवल्यानंतर प्रशासन, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.
उ. सध्या देवीची मूर्ती अत्यंत नाजूक स्थितीत असून देवीच्या पानपात्राचा जो हात आहे, त्या हाताची दोन बोटे पूर्णपणे झिजली आहेत, तर म्हाळुंग (देवीच्या हातातील एक फळ (सिट्रॉन फ्रुट) घेतलेल्या उजवा हाताच्या बोटाचीही पूर्ण झीज झाली आहे, तसेच पावलांवरील बोटे पूर्णपणे निघून गेली आहेत.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची झाली आहे, तशी स्थिती स्वतःच्या शरिराची झाली असती, तर श्रीपूजक, मंदिर समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी आदींनी किती तरी डॉक्टरांकडे धाव घेतली असती ! स्वतःच्या शारीरिक अडचणींकडे कधीही दुर्लक्ष न करणारे असले हिंदू देवीकडे मात्र दुर्लक्ष करतात, हे लक्षात ठेवा ! श्री महालक्ष्मीदेवीने तरी अशा नाममात्र जन्महिंदूंची काळजी का घ्यावी ?
३. विविध भेटींमधील मान्यवरांचा अनुभव
श्री महालक्ष्मीच्या मूर्तीच्या विटंबनेच्या संदर्भात करवीर शंकराचार्यांचा अपवाद वगळला, तर कोल्हापूरमधील सर्व घटकांमध्ये ‘मूर्ती भंगल्यानंतर काय करावे ?’, याविषयी अपसमज आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते स्वार्थासाठी ‘धर्मशास्त्र काय सांगते’, हेही समजून घेण्याच्या मनःस्थितीतही नाहीत, हे आम्हाला या संदर्भात संपर्क करतांना लक्षात आले.
३ अ. जिल्हाधिकार्यांची तटस्थता : कोल्हापूरचे मंदिर हे महाराष्ट्र शासनाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’कडून नियंत्रित असल्याने जिल्हाधिकारी हेच मंदिराचे प्रशासक आहेत. मंदिर व्यवस्थापनात सरकारी प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींचा भरणा आहे. श्रीपूजक हे ब्राह्मणवर्गातील आहेत. गर्भगृहातील व्यवस्थापन श्रीपूजकांकडे आणि गर्भगृहाबाहेरील व्यवस्थापन ‘मंदिर व्यवस्थापन समिती’कडे अशी अघोषित विभागणी आहे. ‘देवीची मूर्ती ही गर्भगृहातील असल्याने त्याविषयी प्रशासक असलेले जिल्हाधिकारी तटस्थता बाळगतात’, हा हिंदु जनजागृती समितीचा गेल्या ७ – ८ वर्षांतील अनुभव आहे. ‘मंदिरांचे प्रशासक आणि पुजारी सरकारी का असू नयेत ? अन् देवीचे भक्त का असले पाहिजेत ?’, याचे उत्तर या अनुभवात आहे.
४. ‘मूर्ती भंगल्यानंतर काय करावे ?’
याविषयी मतभिन्नता असल्यामुळे ‘देवीच्या मूर्तीच्या संदर्भात काय करावे ?’, याविषयी स्थानिक धर्माधिकारी मंडळी कुठलाही निर्णयापर्यंत पोचू शकलेली नाहीत. शास्त्रानुसार देवळातील मूर्ती दोन प्रकारच्या असतात.
अ. घडवलेली मूर्ती
आ. अनादिसिद्ध (स्वयंभू) मूर्ती
४ अ. देवतेची घडवलेली मूर्ती : या मूर्तीला उत्पत्ती, स्थिती आणि लय लागू होतो. यामुळे मूर्तीची झीज झाल्यास किंवा ती भंगल्यास धर्मशास्त्राप्रमाणे तिचे तत्त्वधारण विधी करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येते.
४ आ. अनादिसिद्ध मूर्ती : या मूर्ती कोणत्या मूर्तीकाराने सिद्ध केलेल्या नसून त्या आपोआप उत्पन्न झालेल्या असतात. उदा. ज्योतिर्लिंगे, शनिशिंगणापूर येथील शनीची मूर्ती इत्यादी. अनादिसिद्ध मूर्ती भंगलेली असेल, तरी ती पूजली जावी, असे शास्त्र सांगते.
देवतांची घडवलेली मूर्ती सिद्धपुरुषांनी स्पर्शिलेली असेल, तर ती भंगली, तरी ती पूजली जाऊ शकते, असेही शास्त्रात म्हटले आहे. कोल्हापूरमधील काही धर्माधिकार्यांचे म्हणणे आहे की, आदिशंकराचार्य, चैतन्य महाप्रभु यांसारख्या सिद्धपुरुषांनी या मूर्तीला स्पर्श केलेला असल्याने ही मूर्ती पालटण्याची आवश्यकता नाही. या सर्वांच्या भिन्न भिन्न भूमिकांमुळे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे.
सध्या प्रबोधनाद्वारे कोल्हापूरमधील अनेक घटकांमधील अपसमज दूर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत; परंंतु अद्यापही नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी भरपूर कार्य करावे लागणार आहे. कोल्हापूरचा माझा अनुभव प्रातिनिधिक आहे. महाराष्ट्रात सरकार-नियंत्रित पंढरपूर, तुळजापूर आदी सर्वच मोठ्या मंदिरांमध्ये अल्पाधिक प्रमाणात असे अनुभव आहेत. लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.
– अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु जनजागृती समिती