हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल !
१. हिंदु धर्मातील सर्व धार्मिक कार्यांमध्ये स्त्रीचे महत्त्व
‘हिंदुत्वाला धरून असलेली भारतीय जीवनपद्धत, संस्कृती आणि परंपरा यांमध्ये स्त्रीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. आपल्याकडे पूजा किंवा यज्ञ स्त्रीविना पूर्ण होत नाही. त्रेतायुगामध्ये प्रभु श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला होता. तेव्हा सीतादेवीच्या अनुपस्थितीत श्रीरामाला तिची सुवर्णमूर्ती ठेवून यज्ञ पूर्ण करावा लागला होता. यावरून स्त्रीची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी किती आवश्यक असते, हे समजते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शिकण्याचा अधिकार नव्हता, असा आरोप केला जातो, जो पूर्ण खोटा आहे. आपल्याकडे महिला वैदिक काळापासून शिक्षण घेत आल्या आहेत. गार्गी, मैत्रेयी या विदुषी (विद्वान स्त्रिया) त्याची उदाहरणे आहेत. त्यांनी रचलेल्या ओव्या किंवा दोहे ज्ञानवर्धक आहेत आणि आपण अद्यापही त्यांचा उल्लेख संस्कृत उच्चारतांना करतो. आपल्या भारतामध्ये केवळ आधुनिक काळातच स्त्रीला मानसन्मान दिला जात नाही, तर प्राचीन काळापासून तिला गौरवाचे स्थान देण्यात आले आहे. वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.
२. स्वातंत्र्यलढ्यात स्त्रीचे योगदान
स्वातंत्र्यलढ्यात आंदोलन करण्यात महिलांचे योगदान पुष्कळ मोठे होते. ‘आझाद हिंद सेने’मध्ये महिला सैनिकांची ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई ’ ही वेगळी तुकडी स्थापन करण्यात आली होती. त्या तुकडीचे नेतृत्वही महिलांकडेच होते. आझाद हिंद सेनेच्या या तुकडीमध्ये बर्याचशा महिला महाराष्ट्रातील होत्या, तर सेनेतील नावाजलेल्या ‘कॅप्टन लक्ष्मी’ या बंगाल राज्यातील होत्या. या महिला तुकडीने आझाद हिंद सेनेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती. मलेशियातील ‘रबरच्या लागवड भागामध्ये काम करणार्या महिलांपैकी जवळजवळ १७० महिला ‘झाशीची राणी’ तुकडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘आझाद हिंद सेने’च्या काळात त्यांना तोफा भरणे, तोफगोळा उडवणे, धनुष्य-बाण चालवणे, बंदूक चालवणे इत्यादी गोष्टी शिकवण्यात आल्या होत्या. त्यांनी पुष्कळ योद्ध्यांसमवेत त्यांची भूमिका पार पाडली होती. भारतीय जीवनपद्धतीत किंवा आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये महिलांच्या प्रथा-परंपरा आणि वेशभूषा या सर्वांमध्ये विविधता असूनही एकता दर्शवते.
३. हिंदवी स्वराज्य स्थापनेत स्त्रीची महत्त्वाची भूमिका
आज स्त्रीमधील आईची भूमिकाही पुष्कळ महत्त्वाची आहे. नेपोलियन बोनापार्ट याने युद्धाच्या वेळी एक वाक्य लोकांना सांगितले, ‘तुम्ही मला एक महान माता द्या, मी तुम्हाला गौरवशाली देश देईन.’ त्याला योद्धा सिद्ध करण्यासाठी आईचे महत्त्व ठाऊक होते. नेपोलियनला सगळे जग ओळखते. त्या काळी त्याला अत्यंत क्रूर समजले जात होते; तरीही त्याला आईचे माहात्म्य ठाऊक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ यांना कुणीही विसरू शकत नाही. मां जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना देवीदेवता आणि शूरवीर यांच्या गोष्टी ऐकवून त्यांच्यावर सुसंस्कार केले. त्यासाठी आपण सर्वांनी जिजाऊंप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे; कारण की, जिजाऊमाता यांनी आम्हाला एक हिंदु साम्राज्य स्थापन करणारा पुत्र दिला.
जिजाऊंनी बालपणापासून चांगले संस्कार केल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. त्या महान मातेचे निधनही हिंदु साम्राज्याचे स्वप्न साकार झाल्यावर अवघ्या १२ दिवसांनंतर झाले. यावरून आपल्या लक्षात येईल की, राजा घडवण्यात एका आईची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असते.
४. संकटकाळात आदर्श पत्नींचे कर्तव्य पार पाडणार्या स्त्रिया
स्त्रियांची आईसमवेत पत्नीची भूमिकाही महत्त्वाची असते. पूर्वी आपले शूरवीर युद्धावर जाण्यासाठी निघत होते. त्या वेळी त्यांच्या पत्नी चांगल्या प्रकारे साजशृंगाराने सिद्ध होऊन त्यांच्या पतीचे कुंकूमतिलक लावून ओवाळायच्या. तेव्हा त्या म्हणायच्या, ‘आपण युद्धावर जा आणि विजयी होऊनच परत या, अन्यथा परत येऊ नका.’ ती पत्नी अशा प्रकारे निरोप देऊन त्या विरांना घरातून युद्धावर पाठवत होती; म्हणून पत्नीचेही पुष्कळ मोठे महत्त्व असते. पत्नीची एक महिला म्हणून जी भूमिका आपण घरात पहातो, तीही पुष्कळ महत्त्वाची आहे. अनेक महिला पैशांची बचत करत असतात. घराचे व्यवहार पहात असतात. त्याही एक प्रकारे चांगल्या खजिनदार असतात. जागतिक आर्थिक मंदीची लाट आली होती; परंतु भारतात आर्थिक मंदी आली नाही. त्याचे श्रेय भारतीय नारीलाच दिले जाते; कारण की, जेव्हा त्यांच्या कुटुंबावर एखादे संकट येते, तेव्हा त्याच आर्थिक साहाय्य करतात.
मी गांधीजींसमवेत ‘वेदशी-व्यारा’ (मध्यप्रदेशातील वेदशी ते गुजरातमधील व्यारापर्यंत) या यात्रेला गेले होते. त्या वेळी मला तेथील आदिवासी महिला भेटल्या होत्या. त्यातील काही वयस्कर होत्या. त्यांनी सांगितले की, गांधीजी सर्वप्रथम व्यारा दौर्यावर आले होते, तेव्हा आंदोलनासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावरील अलंकार काढून गांधीजींना दिले होते. तेव्हा तर गांधीजींच्या आंदोलनाचा केवळ आरंभच झाला होता. जेव्हाही घराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते, तेव्हा आम्ही भगिनी स्वतःचे सोन्याचे दागिने काढून पुरुषांना देतो आणि त्यांना व्यापार-व्यवसायामध्ये साहाय्य करतो. आपल्या देशावर जेव्हाही आपत्ती आली, तेव्हा तेव्हा आम्ही भगिनींनी आपले सोन्याचे दागिने काढून दिले आहेत.
५. श्रीरामजन्मभूमी आंदोलनामध्ये महिलांचे योगदान
प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीचे योगदान आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई याही एक स्त्रीच ! अंतराळवीर कल्पना चावला होऊन गेली. राजकारणात हरियाणाच्या कन्या ‘सुषमा स्वराज’ होऊन गेल्या. श्रीरामजन्मभूमीचे आंदोलन, तर महिलांविना अशक्यच होते. जर राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी त्यांचे योगदान आर्थिक पाठबळाच्या रूपात दिले नसते, तर आपले आंदोलन बारगळले असते. या राजमातेने त्यामध्ये पुष्कळच सहकार्य केले आहे. त्यानंतर सुषमा स्वराज यांच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी भाषणामुळे आंदोलकर्त्यांना संघटित ठेवले. साध्वी ऋतंभरा यांनी अकस्मात् त्यांचे आंदोलन आणखी सजीव केले. उमा भारती यांच्याविनाही ते आंदोलन अशक्यच होते. या सर्वांची भूमिका पाहिली, तर त्याची परतफेड म्हणून एकाही नारीने कधीच काही मागितले नाही.
६. स्त्रीविना हिंदु राष्ट्राची स्थापना अशक्य !
आम्ही उत्तरप्रदेशमध्ये अयोध्येच्या आंदोलनाच्या वेळी साडेतीन मास काढले आणि आम्ही महिला शक्तींनी या हिंदु राष्ट्रासाठी योगदान मागितले. हिंदु राष्ट्राची स्थापना महिलांविना अपुरी आहे. महिलांविना आम्ही हिंदुत्व टिकवू शकत नाही. आपल्या परंपरेमध्ये आज आपण वटसावित्रीचे व्रत आणि तुलसी विवाह साजरा करतो. अशा सर्व प्रथा-परंपरा स्त्रिया त्यांच्या मुलांकडे संस्कृतीचा वारसा म्हणून सोपवतात.
त्या पद्धतींमध्ये आपले हिंदुत्व दडलेले आहे. आपल्याला आपल्या प्रथा आणि परंपरा यांना पुनरुज्जीवित करावे लागेल.
७. आदर्श नागरिक घडवण्यामध्ये महिलांचा महत्त्वाचा वाटा !
आपल्या मुलांवर जे संस्कार आहेत, ते या माता-भगिनी करत असतात. हे सत्य आहे की, सध्या आपण ते संस्कार आपल्या मुलांवर करत नाही. खरे पहाता आपल्याकडे रामायणातील ‘सुंदरकांड’ कायमस्वरूपी म्हणत राहिले पाहिजे. जेणेकरून ते आपल्या मुलांना तोंडपाठच झाले पाहिजे. मी माझ्या भ्रमणभाषवर गायत्री मंत्राचीच धून लावून ठेवली आहे. आपल्या उठण्यापासून ते झोपेपर्यंत वेदांचे ज्ञान आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांच्या मनात बिंबवले गेले पाहिजे. आपल्या मुलांमध्ये आधुनिकता असली पाहिजे. आधुनिकता आणि आपल्या प्रथा-परंपरा, आपले संस्कार आपण त्यांना एकाच वेळी देऊ शकू. या दोन्ही गोष्टी माता आपल्या मुलांना पुष्कळ चांगल्या प्रकारे देऊ शकते; कारण की ती त्या मुलाची केवळ माताच नसून शिक्षिकाही असते. ज्या काळात मुलांच्या मेंदूची अधिकांश वाढ होत असते, त्या काळात त्यांचा मेंदू अपरिपक्व, म्हणजे ओल्या मातीचा घडा असतो. त्या वेळी ते मूल मातेचेच अनुकरण करत असते. ते मूल आपल्या गर्भावस्थेपासून आईलाच पहातेे आणि तिचेच बोलणे अधिक वेळ ऐकत असते. त्यामुळे जेव्हा बाळ गर्भात असते. तेव्हा त्याला चांगले संगीत, स्तोत्र ऐकवावे आणि त्याला चांगली चित्रे दाखवून चांगले वातावरण उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून एक पुष्कळ चांगले अपत्य होते आणि ते सहजतेने आपल्या हिंदु जीवन पद्धतीचा अवलंब करू शकते. अशा आपल्या सुसंस्कारी मुलांमुळे आम्हा पालकांना कधी दुःख झेलावे लागणार नाही. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार करण्यात आपण कधीही उणे राहू नये.
८. धर्मांध शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी हिंदुत्वाला कणखर व्हावे लागेल !
या देशाची फाळणी धर्माच्या नावाखाली झाली होती. त्यामुळे हा आपल्या हिंदुत्वाचा मोठेपणा आहे की, धर्माच्या नावाने देशाची फाळणी झाल्यानंतरही आम्ही हिंदूंनी अन्य धर्मातील लोकांना आश्रय दिला. ज्या लोकांनी म्हटले होते की, धर्माच्या नावावर देशाची फाळणी व्हायला पाहिजे, त्यांना त्यांचा देश मिळाला आहे. त्यानंतरही जर ते लोक आपल्या घरात केवळ अतिथीच बनून राहिले असतेे, तर योग्य होते; परंतु जर तेे आपल्या परिवारातील आपल्या आपापसांमधील संबंधांमध्ये ढवळाढवळ करत असतील, तर हिंदुत्वाला तेवढेच कणखर होऊन त्यांचा जोरदारपणे प्रतिकार करता आला पाहिजे.’
– श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य आणि भाजप महिला मोर्चा, हरियाणा.