हिंदु, हिंदुत्व आणि ‘अवसरवादी (संधीसाधू) हिंदु’ राहुल गांधी !
१. भारतीय जनतेला किती दिवस मूर्ख समजणार ?
राजस्थानमधील जयपूर येथे भाषण करतांना काँग्रेसचे राहुल गांधी म्हणाले होते, ‘‘या देशात वर्ष २०१४ पासून हिंदुत्वनिष्ठांची सत्ता आहे. हिंदूंची नाही. या हिंदुत्वनिष्ठांना सत्तेवरून खाली खेचा आणि या देशात पुन्हा हिंदूंची सत्ता आणा. मी स्वतः हिंदु आहे; पण हिंदुत्वनिष्ठ नाही.’’ मला राहुल गांधी यांना विचारायचे आहे, ‘‘खरेच ! तुम्ही हिंदु आहात का ? तुमचा जन्म हिंदु आई-वडिलांच्या पोटी झाला आहे का ? फिरोजखान हे तुमचे आजोबा मुसलमान होते. त्यामुळे तुमचे वडील राजीव गांधी हे नैसर्गिकपणे मुसलमानच होतात. तुमची आई सोनिया गांधी या कट्टर कॅथॉलिक पंथाच्या ख्रिस्ती आहेत. तुमच्या भगिनी प्रियंका यांनी रॉबर्ट वॉड्रा या ख्रिस्ती व्यक्तीशी विवाह केला आहे. महात्मा गांधी यांचा किंवा त्यांच्या गांधी या आडनावाशी तुमचा दुरान्वयानेही संबंध नाही, तरीही तुम्ही स्वतःला हिंदु म्हणवून घेत ‘गांधी’ आडनाव लावता. भारतीय जनतेला तुम्ही आणखी किती दिवस मूर्ख समजणार आहात ?’’
२. कुणी केवळ धोतर नेसून दिखावा केल्याने हिंदु होत नाही !
बरे, तुमचा हा ढोंगीपणा एक वेळ दुर्लक्षितही करू; कारण कुणी कोणत्या धर्मातील आई-बापाच्या पोटी जन्म घ्यायचा, हे कुणाच्याच हातात नसते. तुम्ही जन्माने हिंदु नाही, हे तर निश्चित आहे; पण तुम्ही आचार-विचाराने, तरी हिंदु आहात का ? तुम्ही स्वतःला हिंदु म्हणवून घेता, तर मग सांगा, ‘तुम्ही हिंदूंच्या किती धर्मग्रंथांचा अभ्यास सोडा; पण ते वाचले आहेत तरी का ?’ बरे, वाचन जाऊ द्या, त्यांची नावे तरी तुम्ही सांगू शकाल का ? हिंदूंच्या ४ वेदांची नावे तुम्हाला सांगता येतील का ? किती हिंदु सणांची नावे आपणास ठाऊक आहेत ? आपण नियमितपणे हिंदु देवीदेवतांपैकी एखाद्या तरी देवतेच्या मंदिरात जाता का ? आपल्या घरात देवघर आणि त्यात हिंदु देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत का ? बरे, हे सारे जाऊ द्या. तुम्ही जन्माने ख्रिस्ती किंवा मुसलमान असला, तरी काही अडचण नाही. तुम्ही मनाने, तरी पक्के भारतीय आहात का ? कारण जन्माने ख्रिस्ती आणि मुसलमान असूनही भारतभूमीवर मातृवत प्रेम करणारे तिच्यासाठी प्राणार्पण करणारे अनेक ख्रिस्ती अन् मुसलमान देशभक्त या देशात होऊन गेले आहेत. अशी तुमची येथील भूमी, मूळ धर्म, संस्कृती, सभ्यता, इतिहास इत्यादींवर निष्ठा आहे का ? कुणी केवळ धोतर नेसून, कपाळावर गंध लावून, कोटावरून जानवे घालून, दिखाव्यासाठी मंदिरात जाऊन हिंदु होत नाही.
३. हिंदूंच्या मानबिंदूंचा अपमान करणारा हिंदु कसा ?
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केवळ स्वतःचीच नव्हे, तर आपल्या २ भावांची, आपल्या संपूर्ण कुटुंबाची, घरादाराची देशाच्या स्वातंत्र्यासाठी राखरांगोळी होऊ दिली; पण देशाकडून कशाचीही अपेक्षा ठेवली नाही, त्यांना तुम्ही ‘माफीवीर’ म्हणून हिणवता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जीवनगाथा, त्यांचे साहित्य न वाचताच तुम्ही असे अनर्गल (बेलगाम) आरोप करता. तुम्ही खरे हिंदु असता, तर एका हिंदुहृदयसम्राटांचा असा अवमान करण्यास तुमची जीभ धजावली नसती. त्याच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु आणि हिंदुत्वाची जी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येच्या निकषात तरी तुम्ही बसता का ? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ।’’ या व्याख्येप्रमाणे भारतभूमीला तुम्ही आपली पितृभूमी, पुण्यभूमी मानता का ? येथील सनातन धर्म आणि या धर्मातील देवीदेवता, धर्मग्रंथ, साधू-संत, थोर पुरुष, सणवार, चालीरिती, येथील जीवनमूल्ये या सर्वांना आपण आपले मानता का ? या मानबिंदूंचा सदैव सन्मान होईल, त्यांचा कधी अपमान होऊ देणार नाही, त्यांचा कुणी अपमान केल्यास त्याचा प्रतिवाद करण्याची काळजी आपण कधी घेता का ?
४. जन्म आणि कर्म हिंदुही नव्हे, तर ‘अवसरवादी’ (संधीसाधू) हिंदु !
वरीलप्रमाणे काही तुमच्या आचार-विचारांमधून कधीच दिसून आले नाही. असे काही तुमच्या आचार-विचारांतून दिसून आले असते, तर तुम्ही जन्माने हिंदु नसला, तरी कर्माने हिंदु आहात, असे आम्ही मानले असते. तुम्ही तर नेहमी हिंदू आणि हिंदु धर्म यांचा अपमान करून एका विशिष्ट पंथियांच्या दाढ्या कुरवाळत असता. मागे तुमच्या पक्षाचे (काँग्रेसचे) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह म्हणाले होते, ‘‘या देशातील सर्व साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’’ तुमच्या पंतप्रधानांनी हिंदु या देशाचे मूळ रहिवासी असतांना त्यांना उपरे आणि दुसर्या श्रेणीचे नागरिक ठरवले अन् जे आक्रमक, लुटारू आहेत, त्यांना प्रथम श्रेणीचे नागरिकत्व बहाल केले होते; पण तुम्ही त्या प्रत्यक्षात धादांत खोट्या असणार्या, अपमानास्पद आणि निर्लज्ज विधानाचा एका शब्दानेही प्रतिवाद केला नाही. असे आपण ‘अवसरवादी’ हिंदु आहात.
५. भारताच्या शत्रूशी सलगी आणि भारतियांचा अवमान करणारे !
भारताचा परंपरागत शत्रू असलेल्या चीनशी तुमचे सख्य आहे. ‘तुम्ही स्वतःला हिंदु म्हणवून घेता, तर मग आपली मातृभूमी असलेल्या भारताची परदेशात जाऊन नेहमी अपकीर्ती का करता ?’ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातून लोकशाही मार्गाने प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानेच पंतप्रधानपदावर विराजमान झाले आहेत. तुम्ही त्यांचा अपमानजनक शब्दाने उल्लेख करता, तो भारतातील सर्व हिंदूंचा अपमानच असतो, असे तुम्हाला वाटत नाही का ? कर्नाटकात तुमचा पक्ष निवडून येताच तुमच्या शासनाने सर्वांत प्रथम कोणते काम केले असेल, तर ते धर्मांतरबंदी आणि गोहत्या बंदीचे दंड विधान (कायदे) रहित केले. इफ्तारच्या पाहुणचारात (पार्टी) जाळीदार टोपी घालून तुम्ही जेवढ्या उत्साहाने सहभागी होता, तेवढ्याच उत्साहाने हिंदूंच्या सणात सहभागी झाल्याचे तुम्ही कधी दिसत नाही.
६. देशहितकारक गोष्टींना विरोध करणारे !
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीसाठी हिंदूंचा प्राणपणाने लढा चालू असतांना तुमच्या पक्षाने प्रभु श्रीराम एक काल्पनिक पात्र असल्याचा युक्तीवाद केला. श्रीरामाच्या जन्मतिथीचे प्रमाणपत्र मागितले. बाबरी ढाचा कोसळला, तेव्हा त्या स्थानावर तुमच्या पक्षातील काही लोकांनी ‘रुग्णालये, शौचालये बांधा’, अशा घृणास्पद (वाह्यात) सूचना केल्या. तुमच्या पक्षाने सदैव श्रीराम मंदिराला विरोधच केला. त्या वेळेस ‘आपण स्वतः हिंदु आहोत’, याचे तुम्हाला स्मरण झाले नाही का ? काश्मीरमधून साडेचार लाख हिंदू विस्थापित झाले. सहस्रो हिंदूंच्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्या. सहस्रो हिंदु स्त्रियांवर अमानुष बलात्कार करण्यात आले. याविषयी तुम्ही कधी खंत व्यक्त केली का ? अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर असो, काश्मीरचे अनुच्छेद (कलम) ३७० रहित करणे असो, भारतीय नागरिकता, समान नागरी, लोकसंख्या नियंत्रण, तोंडी तलाकबंदी इत्यादी कुठलेही अधिनियम (कायदा) असोत कि नवीन संसद भवनाचे निर्माण कार्य असो ? प्रत्येक वेळी अशा देशहितकारक गोष्टींना तुमचा विरोधच असतो.
७. देशद्रोह्यांशी जवळीक करणारे !
‘‘भारत तेरे टुकडे होंगे, भारत तेरी बर्बादीतक जंग रहेगी, इन्शाअल्ला इन्शाअल्ला’’, अशा देशद्रोही घोषणा उघडपणे देणार्या आणि कट्टर हिंदुद्वेष्ट्या कन्हैयाकुमारला तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानाने प्रवेश दिला, अशी तुमची हिंदु आणि पर्यायाने देशविरोधी कुकृत्ये किती म्हणून सांगावीत. सर्व कुकृत्ये सांगतो म्हटले, तर प्रचंड मोठा ग्रंथ होईल. तुम्ही आणि तुमच्या पक्षाने कधीही न्याय्य असूनही, हिंदूंचा कैवार (बाजू) घेतल्याचे चुकूनही एखादे उदाहरण तुमच्या पक्षाच्या इतिहासात दिसून येत नाही. मग तुम्ही स्वतःला कोणत्या अर्थाने ‘हिंदु’ म्हणवून घेता ?
८. व्यापक हिंदु धर्म !
अन्य पंथियांनी (गैरहिंदू) हिंदू आणि हिंदु धर्मावर टीका करण्यापूर्वी एक वास्तव लक्षात घेतले पाहिजे की, हिंदु धर्म हा ख्रिस्ती अथवा इस्लाम धर्माप्रमाणे एका साचेबद्ध उपासनापद्धतीचे नाव नाही. हिंदु धर्म म्हणजे जीवन जगण्याची एक पद्धत आहे. एका उदात्त आणि सर्वसमावेशक जीवनपद्धतीचे नाव आहे. व्यष्टी (व्यक्ती), समष्टी (समाज), सृष्टी (निसर्ग) आणि परमेष्टी (मोक्ष/ईश्वर) या सर्वांचे रक्षण अन् संवर्धन करणारी, या सर्वांसंबंधी प्रत्येकाचे कर्तव्य काय आहे, हे सांगणारी जीवनपद्धत म्हणजे हिंदु धर्म ! ही कर्तव्ये आचरणात आणणारा तो हिंदु ! पूजापद्धत आणि कर्मकांड हा हिंदु धर्मातील एक छोटासा भाग आहे. कोणतीही पूजापद्धत न आचरणारा, कोणतेही कर्मकांड न करणारासुद्धा व्यक्ती, समाज, निसर्ग आणि ईश्वरप्राप्ती या सर्वांसाठीची आपली विहीत (धर्मसंमत) कर्तव्ये पार पाडतो. तोही हिंदूच होय. मूर्तीपूजा करणारा जसा हिंदु असतो तसाच निराकार, निर्गुण परमेश्वराची उपासना करणाराही हिंदूच असतो. देव मानणारा आस्तिक असो कि देव न मानणारा; परंतु नीतीमान असणारा नास्तिकही हिंदूच असतो. देवत्व कुठे वसते ? हे सांगतांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘तीर्थे धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।’ असा सज्जनही हिंदूच होय. हिंदु धर्मात बाह्यरूपापेक्षा अंतरंगाच्या निर्मळतेला अधिक महत्त्व दिले गेले आहे.
आपल्यापेक्षा निराळी पूजा आणि उपासनापद्धत आचरणार्यांचा हिंदू कधीच द्वेष करत नाहीत; कारण ‘आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥’ म्हणजे ‘ जसे आकाशातून पडलेले पाणी (ओढे, नद्या, नाले या माध्यमातून) शेवटी समुद्राला मिळते, तसा सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एकाच विष्णूला (ईश्वराला) मिळतो.’ हिंदु असा विशाल दृष्टीकोन ठेवतो. ‘केवळ मी, माझे कुटुंबीय आणि माझे धर्मबंधु यांनाच जगण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही, आम्ही मानतो तोच आचार-विचार खरा, इतरांचे आचार-विचार खोटे, आम्ही मानतो तोच धर्म आणि धर्मग्रंथ सर्वांनी मानावा’, अशी एकांगी अन् हट्टाग्रही भूमिका हिंदूंना कधीच मान्य होणारी नाही. ‘जगा आणि जगू द्या’, अशी सर्व हितकारक हिंदु धर्माची शिकवण आहे आणि जगभरातील सर्व हिंदू हीच शिकवण आचरणात आणत असतात.
९. काळानुसार सुसंगत असणारा हिंदु धर्म !
आपली संस्कृती, आपला धर्म इतरांवर अत्याचाराने लादणे, हे हिंदुत्वाला मान्य नाही. हिंदु धर्माला ताठरता मान्य नाही. कालमानाप्रमाणे आवश्यक ते पालट हिंदूंनी नेहमीच मान्य केले आहेत; म्हणूनच हा धर्म प्राचीन असूनही नेहमी नित्य, नूतन राहिला आहे. ‘सदा तनोति इति सनातनः ।’ म्हणजे जो सतत योग्य पालट स्वीकारतो, तोच हा सनातन म्हणजे हिंदु धर्म होय. हिंदु धर्म हा पूर्वीपासूनच काळाशी सुसंगत होता आणि भविष्यातही तो तसाच रहाणार आहे. एक कवी म्हणतो, ‘‘झुकता वही है जिसमें कुछ जान है । अकड तो खास मुर्देकी पहचान है ।’’ (ज्याच्याकडे काही जीव आहे तोच नतमस्तक होतो. अहंकार ही मृत व्यक्तीची ओळख आहे.) जो पालटासाठी सिद्ध नसतो त्याच्यामध्ये आणि प्रेतामध्ये वेगळेपण ते कोणते ? जगातील काळानुसार न पालटणार्या पंथांची अवस्था अशीच प्रेतासारखी आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.