मेवात दंगलीतील आरोपींना कठोर शिक्षा करून वक्फ बोर्ड कायदा लवकर रहित करण्यात यावा ! – रामेश्वर भुकन, हिंदु जनजागृती समिती
अहिल्यानगर, २६ ऑगस्ट (वार्ता.) – मणीपूर, देहली आणि मेवात (हरियाणा) येथील दंगलींत सहभागी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, देशभरात अनेक ठिकाणी अशी हिंसक आक्रमणे होत आहेत. या माध्यमातून देशाची सुरक्षा, एकता, अखंडता आणि शांतता नष्ट करण्याचे एक षड्यंत्र चालू आहे, असे लक्षात येते. या दंगलीचे सर्व व्हिडिओ एकत्रित करून संवेदनशील क्षेत्रांत ‘कोंबिंग ऑपरेशन’ (गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी राबवलेली मोहीम) करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी केली. ते येथील हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात बोलत होते. सावरकर चौकात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ‘मेवात, मणीपूर, देहली या ठिकाणी झालेल्या दंगलीतील आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वक्फ बोर्ड कायदा रहित करण्यात यावा’, या मागणीसाठी आंदोलन केले.
वर्ष १९९५ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने वक्फ कायदा केला. त्या आधारे वक्फ मंडळाने कोणत्याही संपत्तीवर दावा केल्यानंतर त्या संपत्तीचा सर्व्हे केला जातो. त्याद्वारे वक्फ मंडळाला त्या संपत्तीचा वक्फ संपत्ती म्हणून थेट नोंद करण्याचा अधिकार आहे. असे करतांना त्या भूमीच्या मालकाला कळवण्याचेही प्रावधान त्यात नाही. असा हा कायदा हिंदूंसाठी घातक असून हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
या आंदोलनाला बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तोफखाना मंडळ, तसेच अरणगाव, जखणगाव, दरेवाडी या ठिकाणचे वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनाचा उद्देश श्री. बापू ठाणगे यांनी सांगितला आणि सूत्रसंचालन श्री. राहुल दळवी यांनी केले.