येत्या ७ दिवसात पिकांचे पंचनामे पूर्ण करा ! – कृषीमंत्र्यांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत काही भागांत अतीवृष्टी असून उर्वरित मराठवाड्यामध्ये पाऊस अल्प झाल्यामुळे खरीप पिकांची हानी होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळे आणि गावनिहाय पंचनामे चालू करा. या पंचनाम्यांसाठी कृषी, महसूल त्याचसमवेत पीक विमा आस्थापनालाही समवेत घेऊन ७ दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत. मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने कृषीमंत्री मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते.
मराठवाड्यातील सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या जलप्रकल्पांचे जलसाठे तपासून आगामी काळात आवश्यकता भासल्यास पिण्याचे पाणी राखून ठेवण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. जनावरांच्या चार्याचीही सोय करून ठेवावी, असेही निर्देश संबंधितांना या बैठकीत मुंडेंनी दिले आहेत.
मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा ‘कंटिन्जन्सी प्लॅन’ सिद्ध करा !
मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पिके संकटात असल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वच वरिष्ठ अधिकार्यांनी तालुका स्तरापर्यंत जाऊन मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा ‘कंटिन्जन्सी प्लॅन’ (अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीचे पूर्वनियोजन) येत्या ८ दिवसांच्या आत सिद्ध करून सादर करावा, असा आदेश धनंजय मुंडे यांनी दिला आहे.