उद्ध्वस्त कुटुंबियांना ३३ घरे बांधण्यासाठी सिडकोचा पुढाकार ! – पालकमंत्री उदय सामंत
तिवरे धरणग्रस्तांचे प्रकरण !
चिपळूण – तालुक्यातील तिवरे धरणफुटीनंतर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना ३३ नवीन घरे बांधून देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे. ३३ घरांसाठीची निविदा लवकरात लवकर काढून या घरांचे काम उत्तम दर्जाचे करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
तिवरे धरण बाधितांसाठी लवकरच सिडकोच्या माध्यमातून ३३ घरे : पालकमंत्री उदय सामंत (VIDEO) https://t.co/tw7GaH2Tqa
— ANN (@ANN35178142) August 26, 2023
येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील तिवरे (भेंदवाडी) धरणग्रस्त कुटुंबियांच्या घरासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता डी.आर्. हरताळकर, अन्य अधिकारी, अभियंता, जिल्हाप्रमुख शशिकांत चाळके आणि तिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
२ जुलै २०१९ या दिवशी तालुक्यातील तिवरे धरण अतीवृष्टीने फुटले होते. या धरणफुटीमुळे तेथील अनेक घरे आणि कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला आदेश देऊन येथील धरणग्रस्त तिवरेवासियांना घरे बांधून देण्यास सांगितले होते. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी येथील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने ५ कोटी रुपयांतून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी सिडकोने निधी संमत केला आहे. ३३ घरांपैकी १४ घरे धरणाकडे बांधण्यात येणार असून, त्यासाठी सी.एस्.आर्. मधून जागा देण्यात आली आहे. बाकीचे घरे ही अलोरे येथे बांधण्यात येणार आहेत. पूर्वी जी २४ घरे बांधण्यात आली, त्यासाठीची निविदा न्यून आल्याने रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम या घरांच्या नूतनीकरण, अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरावी.’’