२३ ऑगस्टला साजरा होणार ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी साधला इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद !
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरले, त्या दिवशी पंतप्रधान मोदी ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने दक्षिण आफिक्रेत होते. त्यांचा विदेश दौरा आटोपून ते भारतात परतल्यावर त्यांनी ‘इस्रो’चे बेंगळुरू येथील कार्यालय गाठले. या वेळी त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधतांना म्हटले की, २३ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाली होती. आपल्या युवा पिढीला कायम प्रेरणा मिळावी, याकरता २३ ऑगस्ट या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा केला जाईल.
Interacting with our @isro scientists in Bengaluru. The success of Chandrayaan-3 mission is an extraordinary moment in the history of India’s space programme. https://t.co/PHUY3DQuzb
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताची युवा पिढी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी भारलेली आहे. त्यामागे आपल्या अंतराळ मोहिमेचे यश आहे. मंगलयान आणि चंद्रयान या मोहिमांचे यश, तसेच आगामी गगनयानामुळे देशाच्या युवा पिढीला नवा उत्साह मिळाला आहे. भारतातील प्रत्येक लहान मूल वैज्ञानिकाच्या रूपात स्वत:चे भविष्य पहात आहे. त्यामुळे तुम्ही (वैज्ञानिकांनी) केवळ चंद्रावर राष्ट्रध्वज फडकवला नसून एक मोठे यश प्राप्त केले आहे. यामुळे भारताची संपूर्ण पिढी जागृत झाली असून त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. आज तुम्ही भारतीय मुलांमध्ये आकांक्षेचे बीज रोवले आहे, ते उद्या वटवृक्ष बनणार आहे, असा विश्वासही मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.