शिक्षक नसल्याने मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय
मालवण – तालुक्यातील ‘जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडवली क्रमांक १’ या शाळेत शिक्षक द्यावा, या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पालकांनी २४ ऑगस्ट या दिवशी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. सध्या जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांत ‘एकही शिक्षक नाही’, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळांतर्गत शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या आडवली शाळेत एकूण ५० विद्यार्थी आहेत. या शाळेतील शिक्षकाला तात्पुरत्या स्वरूपात जून मासात अन्य शाळेत पाठवले होते. वारंवार मागणी करूनही आता २ मासांनंतरही त्या शिक्षकाला पुन्हा या शाळेत नियुक्ती दिली नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. त्यामुळे संतप्त पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला.
संपादकीय भूमिका
|