कृत्रिम मांजा बनवणार्या कारखान्यांचा शोध घेऊन कारवाई करणार !
कृत्रिम मांजामुळे होणारे वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यशासनाचा निर्णय !
मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणार्या कृत्रिम मांजामुळे राज्यात काही नागरिकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मांजामुळे प्रतिवर्षी राज्यात शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो. या घटना रोखण्यासाठी प्लास्टिक आणि सिंथेटिक धाग्यांची निर्मिती करणार्या कारखान्यांचा शोध घेऊन कारवाई करणारी कार्यप्रणाली राज्यशासनाने सिद्ध केली आहे. याविषयी २५ ऑगस्ट या दिवशी शासन आदेश काढण्यात आला आहे.
कृत्रिम धाग्यांवर बंदी घालण्यासाठी राज्यशासनाने यापूर्वी परिपत्रक काढून त्यांवर कारवाई करण्याची सूचना प्रशासनाला दिली आहे; मात्र त्यावर गांभीर्याने कार्यवाही व्हावी, यासाठी राज्यशासनाने कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या कार्यप्रणालीनुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांतील विद्यार्थ्यांमध्ये पतंग उडवण्यासाठी कृत्रिम धाग्यांचा उपयोग न करण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यासह राज्याबाहेर येणारे कृत्रिम धागे रोखण्यासाठी तपासणी नाक्यांना आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांनाही याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला आहे.