शांत, आनंदी, सेवेची ओढ असलेली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेली वर्धा येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अवंती सुनील कलोडे (वय १३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अवंती सुनील कलोडे ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. अवंती कलोडे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१४.७.२०२३) |
उद्या श्रावण शुक्ल एकादशी (२७.८.२०२३) या दिवशी कु. अवंती सुनील कलोडे हिचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. अवंती सुनील कलोडे हिला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. शांत, स्थिर आणि आनंदी
‘कु. अवंती सर्वांशी प्रेमाने बोलते. ती नेहमीच पुष्कळ शांत आणि स्थिर असते. ती नेहमी सकारात्मक आणि आनंदी रहाते.
२. समंजस
ती शाळेतही सर्वांना समजून घेऊन सर्वांशी प्रेमाने बोलते. त्यामुळे तिचे शिक्षकही ‘अवंती पुष्कळ समजूतदार आहे’, असे सांगतात. तिच्या समंजसपणामुळे ती नातेवाइकांनाही पुष्कळ आवडते.
३. सहनशील
एकदा तिच्या अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे तिला भाजून जखम झाली. जखम पुष्कळ खोल असल्यामुळे ती भरायलाही पुष्कळ दिवस लागले; पण तेव्हाही ती स्थिर आणि आनंदी होती.
४. इतरांचा विचार करणे
मी सेवेला बाहेर गेल्यावर ‘आईला त्रास होऊ नये’, या विचाराने अवंती घरातील कामे करते. एरव्हीही ती मला घरकामात साहाय्य करते.
५. सात्त्विकतेची ओढ
अवंतीला सात्त्विक कपडेच घालायला आवडतात. ती प्रतिदिन कपाळावर कुंकू लावते.
६. आज्ञापालन करणे
अवंतीमध्ये ‘आज्ञापालन करणे’, हा गुण आहे. तिला कुठलीही सेवा सांगितली, तरी ती कधीच ‘नाही’, म्हणत नाही.
७. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अवंती नियमितपणे प्रार्थना, नामजप आणि सारणी लिखाण करते. ती नियमितपणे तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा देते.
८. सेवेची ओढ
अ. बालसाधकांचा आढावा घेणार्या ताईला कधी आढावा घेण्यास अडचण असेल, तेव्हा ती पुढाकार घेऊन इतर बालसाधकांचा आढावा घेते.
आ. ग्रंथसाठा मोजण्याची सेवा असते, तेव्हा अवंती माझ्या समवेत सेवेला येते. तिला नवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे.
इ. ती काही जिज्ञासूंना त्यांच्या मागणीनुसार सनातनची सात्त्विक उत्पादने पोचवते.
९. भाव
अवंतीमध्ये प.पू. गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) पुष्कळ भाव आहे. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ती प्रत्येक वेळी भावप्रयोग घेते.
१०. जाणवलेला पालट
आता अवंतीचा ‘राग येणे’ हा स्वभावदोष न्यून झाला असून ती सांगितलेली गोष्ट स्वीकारून शांत रहाते.’
– सौ. वंदना कलोडे (अवंतीची आई), वर्धा. (१५.३.२०२३)