उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आयुक्तांना आदेश
|
पुणे – नागरिकांचा विरोध असेल, तर काम थांबवा, कोणतेही निर्णय एकतर्फी घेऊ नका, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहेत. बोर्हाडेवाडी, मोशी येथे महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थलांतर केंद्राला येथील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. उद्यानाच्या आरक्षित जागेवर एक कचरा स्थलांतर केंद्र उभारण्यात येत असल्याने येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आतिश बारणे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी अजित पवार यांनी आयुक्तांना दूरभाष करून नागरिकांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आदेश दिले आहेत.
या आधीच मोशीमध्ये कचरा डेपो आहे. ‘रिव्हर रेसिडेन्सी’ येथील रहित करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प त्याच्याच खाली २०० मीटरवर चालू असून त्याचे काम वेगाने चालू आहे. आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी २ कचरा स्थलांतर केंद्रे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावित केंद्राला नागरिकांचा विरोध होत आहे.
संपादकीय भूमिकाअसा आदेश आयुक्तांना का द्यावा लागतो ? नागरिकांचा विरोध समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना काढायला हवी, असा विचार का केला जात नाही ? हेही त्यांना विचारायला हवे ! |