भारताची प्रचंड मोठी उन्नती साधनेच्या बळावरच झाली ! – ह.भ.प. चारूदत्त आफळे
नारदीय कीर्तन महोत्सवाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता
नगर – भारताची प्रचंड मोठी उन्नती साधनेच्या बळावरच झाली. भारतियांनी साधकांना परमोच्च मानले. स्वामी विवेकांदांनी रामकृष्ण परमहंस यांच्या दिव्य सान्निध्यात ४ वर्षे श्रद्धेने साधना केल्यानेच त्यांना देवीच्या दर्शनाचा अद्भूत आनंद मिळाला, असे ह.भ.प. डॉ. चारूदत्त आफळे यांनी सांगितले. सावेडीतील नारदीय कीर्तन प्रसारक मंडळाने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता करतांना ते बोलत होते. वैद्य अनिकेत घोटणकर यांनी स्वागत केले. श्री. योगेश कुलकर्णी यांनी ह.भ.प. आफळेबुवांना सन्मानित केले. सनदी लेखापाल (सीए) हृषीकेश धर्माधिकारी यांनी आभार मानले.
ह.भ.प. आफळेबुवा पुढे म्हणाले, ‘‘नित्य नियमाने केलेली साधना परिपक्व अवस्थेकडे वाटचाल करते तेव्हा संकटे अधिक येतात, हा ऑलिंपिक खेळाडूंचाही अनुभव आहे. विश्वात जे मूलतत्व आहे त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ गिर्यारोहणासारखा अवघड आहे. त्यातील परमअर्थ समजण्यासाठी साधना करावीच लागते. परमार्थ आपोआप होत नसतो. संसारात खांदेपालट होवू शकतो. ‘परमार्थ माझ्याऐवजी तुम्ही करा’, असे होत नाही. रोज ध्यानाला बसण्याचा नियम सांभाळत समाधी अवस्थेपर्यंत पोचण्याची वाटचाल केली पाहिजे.’’