मुंबईतील पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या अध्‍यक्षपदी ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’चे दीपक कैतके यांची निवड !

मुंबई – पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या मुंबई विभागाच्‍या अध्‍यक्षपदी ज्‍येष्‍ठ पत्रकार दीपक कैतके यांची निवड करण्‍यात आली आहे. २४ ऑगस्‍ट या दिवशी मंत्रालयात आयोजित समितीच्‍या बैठकीत ही निवड करण्‍यात आली. या बैठकीला समितीचे सदस्‍य विभव बिरवटकर, राजू सोनवणे, चंदन शिरवाळे, विनया देशपांडे उपस्‍थित होत्‍या.

प्रसारमाध्‍यमांशी संबंधित व्‍यक्‍तींना अधिस्‍वीकृती देण्‍यासंबंधी महाराष्‍ट्र राज्‍य वृत्तपत्र आणि प्रसारमाध्‍यम अधिस्‍वीकृती नियम २००७ नुसार ही समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. दीपक कैतके हे ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’ हे ‘न्‍यूज पोर्टल’ आणि दैनिक ‘महासागर’चे मुंबई प्रतिनिधी म्‍हणून काम पहातात. ते बीड जिह्यातील गेवराई तालुक्‍यातील देवपिंप्री येथील रहिवासी आहेत. पत्रकारक्षेत्रासह आरोग्‍यक्षेत्रात आर्थिकदृष्‍ट्या गरीब, गरजू नागरिक यांच्‍यासाठी दीपक कैतके आवश्‍यक ते सहकार्य निरपेक्ष भावनेने करतात.

मंत्रालयात वार्तांकनाला येण्‍यापूर्वी मुंबईतील जे.जे. रुग्‍णालयात जाऊन दीपक कैतके गरजू रुग्‍णांना सर्वतोपरी सहकार्य करतात. आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांना शासकीय निधीतून साहाय्‍य मिळवून देणे, प्रसंगी सामाजिक संस्‍था, सधन व्‍यक्‍ती यांच्‍याकडून गरजूंना आर्थिक साहाय्‍य मिळवून देणे, विलंब होत असल्‍यास संबंधित डॉक्‍टरांशी बोलून रुग्‍णांना तातडीने उपचार मिळवून देणे, आरोग्‍यविषयक मार्गदर्शन करणे आदी साहाय्‍य ते निरपेक्ष भावनेने करतात. विशेष म्‍हणजे रुग्‍णाईतांची विचारसरणी वेगळी असली, तरीही दीपक कैतके साहाय्‍य करतांना त्‍यामध्‍ये वैचारिक मतभेद आणत नाहीत. कोणत्‍याही वेळी कोणत्‍याही रुग्‍णाला वैद्यकीय साहाय्‍य मिळवून देण्‍यास ते सदैव सिद्ध असतात. विविध शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये जाऊन वैद्यकीय उपचारांसाठी साहाय्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या नागरिकांना साहाय्‍य करणे हा दीपक कैतके यांचा नियमितचा दिनक्रम आहे. मागील अनेक वर्षांपासून यांची अशा प्रकारची सामाजिक सेवा नियमितपणे चालू आहे. पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या अध्‍यक्षपदी निवड झाल्‍याप्रकरणी दीपक कैतके यांचे सर्व स्‍तरावरून अभिनंदन करण्‍यात येत आहे. माहिती आणि जनसंचालनालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी या प्रसंगी अध्‍यक्षपदी निवड झाल्‍याविषयी दीपक कैतके यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन अभिनंदन केले.