मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये चोरी करणार्या तिघांना अटक
८ लाख ५८ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
रत्नागिरी – मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये चोरी करणार्या आंतरराज्य टोळीतील तिघांना लोहमार्ग पोलिसांच्या भायखळा विशेष कृती दलाने (STF) अटक केली आहे. रामईश्वर कुमार साहानी, खुबलाल महतो आणि बिनोद महतो अशी या तिघांची नावे आहेत. ते मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करून झोपलेल्या प्रवाशांच्या पर्स, भ्रमणभाष आणि अन्य किमती वस्तू चोरून नेत असल्याचे अन्वेषणात आढळून आले आहे. या चोरांनी केलेले ७ गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यातील सुमारे ८ लाख ५८ सहस्र रुपये किमतीचा मुद्देमाल लोहमार्ग पोलिसांनी हस्तगत केला आहे.
हे संशयित फेरीवाले रत्नागिरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष कृती दलाने तिघांना कह्यात घेतले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. त्यानंतर या पथकाने चोरीस गेलेल्या मालाव्यतिरिक्त ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २१ सहस्र रुपये किमतीचे घड्याळ, ३ लाख २७ सहस्र रुपये किमतीचे १७ भ्रमणभाष, ५२ सहस्र रुपये किमतीचा टीव्ही आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला.