रिक्शा भाडे, वजनमापे आणि खाद्यपदार्थांच्या तपासणीचे जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांचे निर्देश !
ग्राहकांची फसवणूक होता कामा नये, हा उद्देश !
रत्नागिरी – येणारे दिवस सणासुदीचे आहेत. त्या निमित्ताने जिल्ह्यात येणार्या नागरिकांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता सर्वच विभागांनी घ्यावी. रेल्वेस्थानकापासून शहरात येण्यासाठी रिक्शा भाड्याची योग्य आकारणी होते का ? वजनमापे, तसेच मिठाई, खाद्यपदार्थ याविषयी संबंधित विभागांनी अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज २५ ऑगस्ट बैठक झाली. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी सूचना दिल्या. त्या वेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह पुढे म्हणाले,
१. रिक्शा भाड्याची योग्य आकारणी होते कि नाही ? हे उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासावे. त्याचसमवेत अशा सूचनाही सर्व तालुक्यांना द्याव्यात.
२. अन्न आणि औषध विभागाने येणार्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची तपासणी करावी. विशेषत: मिठाई, खवा अशा पदार्थांची तपासणी आणि त्या पदार्थांची मुदत दिनांक याविषयी विशेष दक्षता घ्यावी.
३. मिठाई वजन करतांना ‘बॉक्स’सह होणार नाही, याविषयीही जनजागृती करून तपासणी करावी.
४. महावितरणने नादुरुस्त वीजमीटर पालटून द्यावेत. सरासरी देयक पाठवतांना योग्य मध्यम देयकाची आकारणी व्हावी.
५. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. या ग्राहकाची फसवणूक होणार नाही, याचे दायित्व सर्वच विभागांचे आहे. त्याविषयी दक्ष आणि जागृत राहून कार्यवाही करावी.
तांदूळ ‘प्लास्टिक’चा नसून ‘फोर्टीफाईड’ – जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत
जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रजपूत यांनी रेशन दुकानामधून वितरित करण्यात येणार्या तांदुळाविषयी माहिती दिली. रेशनवरून विक्री करण्यात येणारा तांदुळ हा प्लास्टिकचा नसून तो ‘फोर्टीफाईड’ तांदुळ आहे. हा तांदूळ पाण्यावर तरंगतो. अन्य तांदुळापेक्षा वेगळा दिसतो; मात्र तो पोषक तत्त्वांची कमतरता दूर करणारा आहे. हा तांदूळ शिजायला वेळ लागत नाही. चवीलाही नेहमीच्या तांदुळासारखा आहे. १०० किलो मध्ये १ किलो ‘फोर्टीफाईड’ तांदुळाचे प्रमाण असते. याविषयी जनजागृती व्हावी.