शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर बांधा ! – स्थानिकांची मागणी
|
वास्को, २४ ऑगस्ट (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळचे प्रवेशद्वार) या वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली. या वेळी पूजण्यात आलेली मूर्ती ही देवीच्या भक्तांना चालू वर्षी मे मासात याच परिसरात नदीच्या काठी सापडली होती. वारसा स्थळी भक्तांनी केलेली कृती अनधिकृत आहे आणि त्यामुळे धार्मिक कलह निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे. पोर्तुगिजांनी वर्ष १५०६ मध्ये तोडलेल्या श्री विजयादुर्गा मंदिराचे अवशेष आजही शिल्लक आहेत. पुरातत्व खात्याने येथील सत्य समोर आणणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवीच्या भक्तांवर श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती ठेवली म्हणून कारवाई करण्यापूर्वी सरकारने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून सत्य जाणून घ्यावे आणि तेथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते असे दिसून आल्यास तेथे श्री विजयादुर्गादेवीच्या भव्य मंदिराची उभारणी करावी.
देवीच्या स्थानिक भक्तांनुसार पोर्तुगीज येण्यापूर्वी त्या ठिकाणी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते. पोर्तुगिजांनी मंदिराची तोडफोड केल्यानंतर देवीच्या भक्तांनी देवीची मूर्ती उचलून ती होडीतून झुवारी नदी पार करून केरी, फोंडा येथे नेली. शंखवाळ येथे मंदिर पाडल्यानंतर तेथे चर्च उभारण्याचा प्रयत्न झाला; मात्र आदिदेवीच्या शक्तीमुळे तो यशस्वी झाला नाही. आजही तेथे देवळाचे भग्न अवशेष आहेत. तेथे असलेली कमान ही जुन्या मंदिराचीच आहे. आता तिच्यावर अवैधपणे ‘क्रॉस’ उभारण्यात आला आहे. तेथील जुने वडाचे झाड काही वर्षांपूर्वी कापून टाकण्यात आले, तर पुरातन मंदिराचे दगड भूमीत गाडून टाकण्यात आले. देवळाच्या अस्तित्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले आणि याला गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याचा पाठिंबा लाभला. या ठिकाणी पुरातत्व खात्याने उत्खनन केल्यास त्या ठिकाणी पुरातन मंदिराचे अवशेष सापडतील. त्या ठिकाणी चर्च नाही आणि अलीकडेच तेथे अनधिकृतपणे लहान चॅपेल बांधले आहे. तेथे अनधिकृतपणे क्रॉस उभारण्यात आले आहेत. पाद्रीच्या अनधिकृत धार्मिक कृत्यांना आणि प्रक्षोभक भाषणांना पुरातत्व खात्याने यापूर्वी कधीही आक्षेप घेतला नाही. चर्चकडे भूमीच्या मालकीची कागदपत्रे नाहीत. चॅपलसाठी निराळ्याच नावाने वीज आणि पाणी जोडणी घेण्यात आली आहे. शंखवाळ हे श्री विजयादुर्गादेवीचे मूळ स्थान आहे आणि देवीची स्थापना केल्यास ते अनधिकृत ठरवले जात आहे.