हिंदूंनो, धर्मशास्त्र जाणा !
नुकतीच नागपंचमी साजरी झाली. एका गावातील तरुणांनी नागाच्या समोर टाळ्या वाजवत आणि ‘हॅपी बर्थडे टू यू’ असे म्हणत नागाला नागपंचमीच्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने वाढदिवसाच्या (?) शुभेच्छा दिल्या. याविषयीचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. हिंदु सणांच्या दिवशीच आजच्या तरुणाईकडून सण-उत्सवांची अशा प्रकारे खिल्ली उडवली जाते. व्हिडिओ पहाणारेही अशा कृतींना हसून दाद देतात किंवा ‘लाईक’ करतात. ‘हे चुकीचे आहे, याविषयी प्रबोधन करायला हवे’, असे कुणालाही वाटत नाही. एखाद्या लहान मुलाने हा व्हिडिओ पाहिला, तर त्याला वाटेल की, नागपंचमी अशीच साजरी करायची असते. उद्या तो मोठा झाल्यावर त्याने नागपंचमीच्या दिवशी नागाला समोर ठेवून त्याने केक कापून नागाचा वाढदिवस म्हणून तो साजरा केला, नागासमवेत छायाचित्रे काढली, तसेच मित्र-मैत्रिणींना मेजवानी (पार्टी) दिली, तर त्यात आश्चर्य ते काय ?
‘नागपंचमी कशी साजरी करावी ? या दिवशी नागाकडे एक सरपटणारा प्राणी म्हणून न पहाता ‘ती नागदेवता असते’, या भावाने तिची पूजा कशी करावी ?’, हेच अनेकांना ठाऊक नसल्याने ती धर्मशास्त्रानुसार साजरी करणारे अल्पच असतील. नागपंचमी हा खरेतर सणांचा राजा असणार्या श्रावण मासातील पहिला सण आहे. ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, याचे महत्त्व हा सण आपल्याला शिकवतो; पण सणांमागील धर्मशास्त्र न जाणता त्यांचे पाश्चात्त्यीकरण करण्यातच सध्याच्या पिढीला प्रौढी वाटते. ‘आम्ही बुरसटलेल्या विचारांचे नसून पाश्चात्त्य किंवा आधुनिक विचारांचे आहोत, आम्हाला अधिक कळते’, अशा आविर्भावात ते वावरत असतात. हिंदूंचा प्रत्येक सण किंवा उत्सव असो, ते साजरे करण्यातून केवळ आनंदच नव्हे, तर ते शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभदायी आहेत. प्रत्येक जिवाचा असा विचार केवळ न केवळ हिंदु धर्मातच केलेला आहे. त्यामुळे सण-उत्सव साजरे करतांना त्यातील पद्धतींची खिल्ली उडवून किंवा त्यांची पायमल्ली करून होणार्या लाभांपासून वंचित राहू नका !
‘तुज आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी’, अशी आजच्या हिंदूंची अवस्था झाली आहे. ‘हिंदु’ जीव जन्मतःच चैतन्यमय असतो; पण नंतर आपल्या अयोग्य कृत्यांमुळे चैतन्य गमावून तो तेजोहीन होऊ लागतो. त्यामुळे ‘हिंदु धर्मातील सण-उत्सव आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी आहेत’, हे समजून धर्माचरण करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.