होमिओपॅथी उपचाराचे लाभ आणि ‘स्वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, अम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
१८ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘होमिओपॅथी चिकित्सापद्धतीची मूलभूत तत्त्वे’, याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ३)
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे
४. होमिओपॅथी उपचाराचे लाभ
अ. होमिओपॅथी औषधे सर्व वयोगटांतील रुग्णांसाठी निर्धोक (safe) आहेत, अगदी नवजात बालक आणि अत्यंत वृद्ध, या दोन्ही टोकांच्या वयोगटांतही निर्धोक आहेत.
आ. होमिओपॅथी उपचारपद्धत ही सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे.
इ. ही औषधे बहुतांशी साखरेच्या गोळ्यांवर घातलेली असल्यामुळे सर्वजण ही औषधे आवडीने घेतात.
ई. ही औषधे घेण्यामध्ये रुग्णाला कोणत्याही प्रकारची क्लिष्टता नाही.
उ. गरोदरपणात अनेक औषधे वर्ज्य असतात; परंतु होमिओपॅथी औषधे गरोदरपणातही घेता येतात.
ऊ. बद्धकोष्ठता, वेदना, निद्रानाश यांसाठीच्या अन्य पॅथीच्या औषधांची रुग्णांना सवय लागते; पण होमिओपॅथी औषधांची सवय लागत नाही. (ती addictive नाहीत.)
ए. संधीवात, दमा, मधुमेह, आकडी/फेफरे (epilepsy), मूत्रपिंडाचे आजार, अशा जुनाट (दीर्घकालीन) आजारांमध्ये औषधे प्रदीर्घ काळ घ्यावी लागतात. ती औषधे दीर्घकाळ घ्यावी लागल्यामुळे त्यांचे प्रतिकूल परिणाम होतात; पण होमिओपॅथी औषधांचे प्रतिकूल परिणाम होत नाहीत.
ऐ. अंगावर गांधी उठणे (Urticaria), संधीवात, स्वयं रोगप्रतिकारक आजार (autoimmune diseases) यांसारख्या पूर्ण बरे (cure) न होणार्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषध घ्यावे लागते. या आजारांवरही होमिओपॅथीनुसार कायमस्वरूपी बरे करणारी औषधे आहेत.
ओ. स्त्रियांच्या जीवनातील वयात येणे (puberty), पौगुंडावस्था (adolescence), मासिक पाळी येणे, रजोनिवृत्ती (मासिक पाळी बंद होणे menopause) या कालखंडांत शरिरातील संप्रेरकांच्या (hormones च्या) प्रमाणात पुष्कळ उतार-चढाव होत असतात. त्यामुळे होणार्या शारीरिक आणि विशेषतः मनाच्या स्तरावरील त्रासांवर होमिओपॅथी औषधे उपयुक्त आहेत. मुख्य म्हणजे होमिओपॅथी औषधांमुळे संप्रेरक उपचार (Hormonal treatment) देण्याची आवश्यकता रहात नाही. त्यामुळे संप्रेरकांच्या अन्य प्रतिकूल परिणामांना सहन करावे लागत नाही.
औ. काही आजार जिथे शल्यकर्म अनिवार्य आहे, उदा. टॉन्सिल (नाकामागे घशाजवळ असणार्या ग्रंथी), चामखीळ (warts), कुरुप (corns) काढणे, हे होमिओपॅथीचा औषधाने शल्यकर्म न करता बरे होऊ शकतात.
अं. ज्या आजारांमध्ये शल्यकर्म करणे अपरिहार्य असते, तेथेही शल्यकर्म झाल्यावर होमिओपॅथी औषधाने रुग्ण पुष्कळ लवकर बरे होतात.
क. या पद्धतीमध्ये उपचारांच्या दृष्टीने रुग्णाच्या निदानाला महत्त्व नसून त्याच्या लक्षणांना महत्त्व दिले जाते. लक्षणांनुसार रुग्णाला औषध दिले जाते. त्यामुळे निदान करण्यासाठी तज्ञ डॉक्टर किंवा रक्ताच्या आणि अन्य प्रगत चाचण्या उपलब्ध नसतांनाही आजारावर होमिओपॅथी औषधांनी यशस्वी उपाययोजना करता येते.
५. होमिओपॅथी ‘स्वउपचारा’बद्दल मार्गदर्शक सूत्रे
आपण याआधीच्या ११ आणि १८ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘होमिओपॅथी म्हणजे काय ?’, ‘होमिओपॅथी उपचारपद्धतीची मूलभूत तत्त्वे’ इत्यादी सूत्रे समजून घेतली. ती अद्याप वाचली नसल्यास ती आधी अवश्य वाचून, समजून घ्यावी. ती समजून घेतल्याने स्वतःवर, तसेच आपल्या जीवलगांवर उपचार करण्यामागील मूल तत्त्वे समजायला सोपे जाईल.
५ अ. कोणत्या आजारांवर आपण होमिओपॅथी स्वउपचार करू शकतो ? : होमिओपॅथीचा सखोल अभ्यास नसतांनाही छोट्या कालावधीच्या आजारांवर (acute illnesses वर), उदा. सर्दी, खोकला, डोळे येणे, ताप येणे, जुलाब होणे, प्रवासात उलटी होणे, इत्यादी आजारांवर आपण स्वउपचार करू शकतो. अर्थात् जेव्हा वैद्यकीय साहाय्य उपलब्ध असेल, तेव्हा आपण तिचा लाभ अवश्य घ्यावा. गंभीर दुखापत (serious injury) आणि गंभीर आजार यांवर तज्ञांच्या सल्ल्याविना उपचार करू नये; मात्र जेव्हा वैद्यकीय साहाय्य उपलब्ध नसेल किंवा पोचायला पुष्कळ कालावधी लागणार असेल, तेव्हा तज्ञांचे साहाय्य मागून घेऊन ती पोचेपर्यंत योग्य होमिओपॅथी औषधाची १ मात्रा (डोस) घ्यावी.
५ आ. होमिओपॅथी स्वउपचार नेमका कसा करायचा ? : आता आपण आजार झाला असतांना या लेखमालेच्या साहाय्याने प्रत्यक्ष स्वउपचार कसा करायचा ? ते क्रमवार समजून घेऊया.
५ आ १. आजार झाल्यावर निर्माण झालेली लक्षणे, तसेच त्यांच्याशी संबंधित सूत्रे यांचे बारकाईने निरीक्षण करून ती लिहून काढणे : आपल्याला काहीही त्रास होऊ लागला (उदा. ताप आला), तर ‘दुखापत झाल्यानंतर, बाहेर थंड हवेत गेल्यानंतर, भिजल्यानंतर इत्यादी’ आजार व्हायचे (उदा. ताप यायचे) कारण, आपल्या तब्येतीत टप्प्याटप्प्याने झालेले पालट, तसेच आपल्याला तापासह जाणवणारी ‘चिडचिड वाढली आहे का ? तहान अधिक लागते का ? विशिष्ट काही खावे-प्यावेसे वाटते का ?’, इत्यादी अन्य सर्व लक्षणे, तसेच आपल्याला होणारा त्रास कशाने न्यून होतो ? कशामुळे वाढतो ? इत्यादी आपल्या आजाराशी संबंधित सर्व सूत्रे ‘सर्वांत महत्त्वाची आणि सर्वांत तीव्र, सर्वांत आधी’ या क्रमाने लिहून काढावी.
५ आ २. आपल्या आजारावरील प्रकरण वाचणे : त्यानंतर लेखमालेतील आपल्या आजाराचे (उदा. ताप) प्रकरण उघडून पूर्ण वाचावे. त्यात आपल्या आजाराची (उदा. तापाची) देण्यात येणारी माहिती वाचून, तसेच दिलेली अन्य सूत्रे वाचून, उदा. ‘थर्मोमीटर’ लावून ताप नेमका किती आला आहे ? याची खात्री करून घ्यावी. जर ताप केवळ १०० अंश फॅरन्हाइट एवढा आहे, तर लगेच औषध घ्यायची आवश्यकता नाही. त्याहून अधिक असेल, तर औषध घेणे आवश्यक आहे.
आगामी ‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत. |