नम्रता, प्रेमभाव असणारे आणि साधकांना दंत उपचारासाठी साहाय्य करणारे वारणानगर, जिल्हा कोल्हापूर येथील आधुनिक दंतवैद्य कौशल कोठावळे (वय २५ वर्षे)!
वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालय आणि रिसर्च सेंटर’ आहे. आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे (M.D. Medicine) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. आधुनिक वैद्य कौशल कोठावळे (BDS) (श्रीमती शिल्पा कोठावळे यांचा मुलगा) हे ‘तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालयात’ उपचारासाठी येणार्या सनातनच्या साधकांशी समन्वय साधण्याची सेवा करतात. मी काही मास दातांच्या उपचारांसाठी ‘तात्यासाहेब कोरे दंतमहाविद्यालय’ येथे जात होते. त्या वेळी माझा कौशलदादा यांच्याशी अनेक वेळा संपर्क आला. त्या कालावधीत मला आधुनिक वैद्य कौशलदादा यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. नम्रता आणि प्रेमभाव
कौशलदादा नेहमी नम्रतेने आणि प्रेमाने बोलतात. त्यांच्या बोलण्यात कुठेही चढउतार नसतो.
२. इतरांचा विचार करणे
अ. साधकांना दातांच्या उपचारांच्या कालावधीत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी कौशलदादा सर्वतोपरी काळजी घेतात. प्रसंगी ते त्यांच्या कामाच्या व्यस्ततेतून साधकांच्या उपचारांतील अडचणी सोडवण्यासाठी स्वतः येतात.
आ. माझी दाताची शस्त्रक्रिया झाल्यावर तेथील एका आधुनिक वैद्यांनी मला रुग्णालयाच्या बाहेर असणार्या औषधालयातून एक औषध आणण्यास सांगितले होते. त्या वेळी माझी नुकतीच दाताची शस्त्रक्रिया झाली असल्याने कौशलदादा यांनी ते औषध आणण्याचे नियोजन केले. त्यामुळे मला बाहेर जावे लागले नाही.
इ. कौशलदादा एक दिवस मला एक निरोप देण्यास विसरले होते. हा भाग त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच माझी क्षमा मागितली.
३. इतरांशी जवळीक असणे
कौशलदादांची महाविद्यालयातील अन्य विद्यार्थी आणि आधुनिक वैद्य यांच्याशी छान जवळीक आहे.
कौशलदादांचे मन निर्मळ असल्याने त्यांच्याशी बोलतांना किंवा त्यांच्या सहवासात असतांना पुष्कळ चांगले वाटते.’
– वर्षा कुलकर्णी (वय ३४ वर्षे), सोलापूर (१६.४.२०२२)