पुणे येथील ‘कबीर कला मंच’शी संबंधित कार्यकर्ती ज्योती जगताप हिचा जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज !

पुण्यातील एल्गार परिषद प्रकरण !

‘कबीर कला मंच’शी संबंधित कार्यकर्ती ज्योती जगताप

पुणे – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पुणे येथील ‘कबीर कला मंच’शी संबंधित कार्यकर्ती ज्योती जगताप हिने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. तिच्या विरोधातील पुरावे पुरेसे असून ती भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेने रचलेल्या मोठ्या कटाचा भाग असल्याचे मानले जात होते. त्यामुळे ज्योती जगताप हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.

३१ डिसेंबर २०१७ या दिवशी पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. ३ वर्षांपूर्वी तिला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या जामीन याचिकेवर २१ सप्टेंबरला सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी याच एल्गार परिषद प्रकरणात वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा या २ अन्य आरोपींना जामीन संमत केला होता. त्यांना जामीन देण्याचा न्यायालयाचा निर्णय एका विशिष्ट सूत्रावर आधारित होता आणि हे सूत्र ज्योती जगताप यांच्या खटल्याला लागू होते कि नाही ? हेही आगामी सुनावणीच्या दरम्यान पडताळले जाणार आहे.