युगपुरुषांची अपकीर्ती करणार्या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप
सातारा, २३ ऑगस्ट (वार्ता.) – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्या प्रवृत्ती ठेचून काढायला हव्यात. अशा प्रवृत्तींवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी समीर शेख यांची भेट घेऊन याविषयी त्यांच्याशी चर्चा केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘युगपुरुष छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एका मुलाला कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचे सूत्रधार शोधून काढले जातील, गुन्हे अन्वेषणद्वारे याचे सखोल अन्वेषण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. हे कृत्य लांच्छनास्पद असून क्षमेला पात्र नाही. सामाजिक सलोखा ठेवण्यात अग्रेसर असणार्या सातारा शहरात असे दुर्दैवी प्रकार होत असतील, तर ते क्लेशदायक आहेत.
सामाजिक स्वास्थ्य बिघडवून मोठे कारस्थान करण्याचा या घटनेचा उद्देश असून या प्रकरणाचे उच्चस्तरीय अन्वेषण करणे आवश्यक आहे. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जिल्ह्याच्या सामाजिक आणि धार्मिक एकात्मतेला धक्का लागू नये, यासाठी तत्पर आहोत. या घटनेनंतर लगेच दुसर्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी आलेल्या युवकांना पाकिस्तानमधून धमकीचे संदेश आले. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये काय लागेबांधे आहेत, याचेही अन्वेषण होणे महत्त्वाचे असून या घटनेच्या मुळाशी असणार्या प्रवृत्तींवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत. विलासपूर भागात ज्यांनी अशा पोस्ट केल्या, त्यांच्यासाठी संरक्षणासाठी गाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत; परंतु पाकिस्तानमधून धमकीचे संदेश ज्यांना आले, त्यांना कसलेही संरक्षण दिलेले नाही. हा मोठा विरोधाभास आहे. त्याविषयीचे अन्वेषण कोणत्या पद्धतीने होत आहे, याचा खुलासा तात्काळ व्हावा.’’