शेरीनाल्यातील दूषित पाणी पुन्हा कृष्णानदीत !
दायित्वशून्य महापालिका प्रशासन !
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ‘शेरीनाल्याची समस्या’ ही सुटलेल्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. प्रत्येक वेळी ठराविक दिवसांनी शेरीनाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळते. २२ ऑगस्टपासून सध्या परत एकदा महापालिका क्षेत्रात असलेले शेरीनाल्याचे सहस्रो लिटर दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. अगोदरच डेंग्यू, मुदतीचा ताप, मलेरिया यांसह विविध तापांची साथ शहरात जोरात असतांना दूषित पाणी नदीत मिसळल्याने नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेले आहे.
४ वर्षांपूर्वी याच प्रश्नावरून हरित न्यायालयात सांगली महापालिकेला ३ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता; मात्र यानंतरही महापालिकेला काहीही फरक पडलेला नाही.