सातारा येथे १५० हून अधिक बसचालकांची आरोग्य आणि नेत्र तपासणी !
प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम
सातारा, २३ ऑगस्ट (वार्ता.) – येथील प्रादेशिक परिवहन विभाग आणि क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १५० हून अधिक बसचालकांची आरोग्य आणि नेत्र तपासणी करण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला बसचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी बसचालकांची आरोग्य, नेत्र तसेच मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. ९३ बसचालकांना दृष्टीदोष आढळून आला असून या बसचालकांना चष्म्यांचेही विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. ज्या बसचालकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.