कास पठारावरील फुले पहाण्यासाठी पर्यटकांना मोजावे लागणार १५० रुपये !
कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीतील निर्णय
सातारा, २३ ऑगस्ट (वार्ता.) – जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समाविष्ट झालेले कास पठार वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी बहरू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. फुलांचा हंगाम १ सप्टेंबरपासून चालू होत आहे; मात्र यावर्षी पर्यटकांना फुले पहाण्यासाठी प्रतिमाणसी १५० रुपये मोजावे लागणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘कास पठार कार्यकारी समिती’च्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
कास पठारावरील फुले पहाण्यासाठी गेल्या वर्षी १०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. पर्यटकांकडून वाहनतळावर वाहन लावण्यासाठी आणि बसने पठारावर येण्यासाठी वेगळे ५० रुपये शुल्क घेण्यात येत होते. यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग उद्भवले होते. याचाच विचार करून पर्यटन शुल्क आणि बसचे शुल्क असे मिळून १५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.