नाशिक येथे आजपासून कांदा लिलाव चालू होणार !

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्‍याशी चर्चेनंतर व्‍यापार्‍यांकडून बंद मागे !

प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक –  कांद्यावर निर्यात शुल्‍क लावल्‍याप्रकरणी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्‍या उपस्‍थितीत येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात २३ ऑगस्‍ट या दिवशी व्‍यापारी असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्‍मक तोडगा निघाला असून २४ ऑगस्‍टपासून कांद्याचे लिलाव चालू होणार आहेत. या बैठकीनंतर कांदा व्‍यापारी असोसिएशनचे पदाधिकारी खंडू देवरे यांनी ‘आपण आंदोलन मागे घेत आहे’, असे येथे घेण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत घोषित केले.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्‍के शुल्‍क आकारणीच्‍या निर्णयाच्‍या निषेधार्थ राज्‍यात ठिकठिकाणी विविध पक्षांच्‍या वतीने आंदोलने करण्‍यात येत आहेत. त्‍याअनुषंगाने नाशिक जिल्‍ह्यातील व्‍यापार्‍यांनी कांद्याची लिलाव प्रक्रिया थांबवली होती. या प्रश्‍नावरून तणावाचे वातावरण वाढत होते. कांदा व्‍यापारी असोसिएशनचे देवरे म्‍हणाले की, कांद्यावर निर्यात शुल्‍क लावण्‍यासारखा कोणताही निर्णय घेण्‍याआधी व्‍यापार्‍यांचा विचार करावा, अशी मागणी आम्‍ही केली आहे. व्‍यापारी कधीही शेतकर्‍यांची अडवणूक करत नाहीत. व्‍यापार्‍यांनी मागील २ दिवस कांदा लिलाव बंद केला असला, तरी शेतकर्‍यांकडून आम्‍ही कांदा खरेदी करत आहोत. डॉ. भारती पवार यांनी व्‍यापार्‍यांच्‍या मागण्‍याविषयी विचार करण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. त्‍यामुळे आम्‍ही आंदोलन मागे घेत असून २४ ऑगस्‍टपासून शहरातील बाजार समित्‍यांमध्‍ये कांदा लिलाव चालू करत आहोत.