साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधून आपले सर्व लिखाण प्रसिद्ध झाले नाही’, असे वाटून नापसंती न दर्शवता ‘आवश्यक ती सूत्रे प्रसिद्ध होत आहेत’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता बाळगा !
‘सनातनच्या साधकांसाठी ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून जणू ‘गुरुदेवांचे संदेशपत्र’च आहे. ‘सनातन प्रभात’मधून साधकांना साधनेची दिशा मिळते, त्यासमवेत साधनेतील अडथळ्यांवर उपाय, तसेच भाववृद्धीचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शनही मिळते. बर्याच साधकांना ‘सनातन प्रभात’मधील चैतन्यामुळे स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, अशी अनुभूती येते.
अनेक साधक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे लिखाण लिहून देतात. त्यामध्ये ‘शिकायला मिळालेली सूत्रे, साधनाप्रवास, बालसाधक आणि साधक यांची गुणवैशिष्ट्ये, गुरुदेवांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आदी अनेक विषय असतात. या सगळ्यांतून आवश्यक ते आणि सर्व साधकांसाठी उपयुक्त असलेले लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये जागेनुसार प्रसिद्ध केले जाते. सध्या साधकसंख्या पुष्कळ वाढली असल्याने लिखाण येण्याचा ओघही वाढला आहे. त्यामुळे साधकांनी दिलेले सर्व लिखाण ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करता येत नाही. काही वेळा ते संक्षिप्त करावे लागते. वाचकांचा विचार करून आणि साधकांनी शिकण्याच्या दृष्टीने लिखाणात काही पालट करावे लागतात. व्याकरणदृष्ट्याही भाषेत पालट करावे लागतात. साधकांनी पाठवलेल्या लिखाणावर संकलनाची प्रक्रिया झाल्यानंतर ते लिखाण ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्यास योग्य होते.
ही सर्व प्रक्रिया समजून न घेताच काही साधकांनी त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाल्यावर नापसंती दर्शवली. त्यांचे अपेक्षांचे विचार आणि त्यांवरील योग्य दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
१. एका साधिकेने तिचे लिखाण प्रसिद्ध केल्यावर सांगितले, ‘बरीच सूत्रे ‘ज्या भावाने किंवा जे शिकायला मिळाले आहे’, अशा दृष्टीने लिहून दिली होती. ती तशा स्वरूपात लेखामध्ये मांडली गेली नाहीत. बरीच सूत्रे वगळण्यात आली आहेत.
योग्य दृष्टीकोन : नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे दैनिकातील जागेनुसार प्राधान्याने छापली जातात. ‘सर्व लिखाण प्रसिद्ध व्हायला हवे’, असे वाटणे, ही स्वेच्छा झाली. साधकांना स्वेच्छेतून परेच्छेकडे जाता यायला हवे.
२. काही साधिका म्हणतात, ‘या लिखाणातून आमच्या भावना व्यक्त झाल्या नाहीत !’
योग्य दृष्टीकोन : अध्यात्मात भावनेला महत्त्व नाही. साधकांनी भावनेच्या स्तरावर न रहाता पुढच्या स्तरावर, म्हणजे भावाच्या स्तरावर जाण्यासाठी स्वयंसूचना द्याव्यात. ‘आपण दिलेल्या लिखाणातून समष्टीला शिकायला मिळाले’, हे महत्त्वाचे आहे.
३. एका साधिकेने तिचे लिखाण प्रसिद्ध झाल्यावर समन्वयक-साधकाला पुढील लघुसंदेश पाठवला, ‘माझ्या नातेवाइकांची धारिका अंतिम झाल्यावर त्या धारिकेत मला जे सांगायचे होते, तो गोडवा, ते मर्म, असे काही आले नाही. मला ही धारिका अजिबात आवडली नाही. त्यापेक्षा ‘मी लिहून दिले नसते, तर बरे झाले असते’, असा विचार माझ्या मनात आला. ‘धारिका अंतिम करणार्यांनी त्या धारिकेतील सूत्रे कशीतरीच संकलित केली आहेत’, असा माझा निरोप धारिका संकलित करणार्यांना कळवशील का ?’
योग्य दृष्टीकोन : ‘स्वतः लिहिलेल्या सर्व सूत्रांत गोडवा आणि मर्म होते’, असे वाटणे’, हा विचार अहंभाव दर्शवतो. ‘मला जसे हवे होते, तसे धारिकेत आले नाही’, असा विचार करणे, ही अपेक्षाच आहे. अपेक्षेमुळे दुःखच मिळते. ‘मी लिहून दिले नसते, तर बरे झाले असते’, असा विचार करणे, यातून नकारात्मक मानसिकता व्यक्त होते. यासाठी स्वयंसूचना द्याव्यात.
४. एका साधिकेच्या कवितेत यमक जुळण्याच्या दृष्टीने थोडासा पालट केला होता. कविता प्रसिद्ध झाल्यावर तिला तो पालट मुळीच आवडला नाही आणि तिने तीव्र शब्दांत याविषयी संबंधित साधिकेला सांगितले. ‘पालट करण्याविषयी मला विचारायला हवे होते’, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
योग्य दृष्टीकोन : ‘संकलक का पालट करतात ?’, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पालट करतांना प्रत्येक व्यक्तीला विचारणे शक्य नसते. संतांच्या धारिकेत काही पालट करायचे असल्यास त्याविषयी त्यांना विचारून पालट करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘अपेक्षा करणे’, हा अहंचा पैलू, तसेच अहंचे अन्य पैलू न्यून होण्यासाठीच आपण साधना करत आहोत. अहंच्या पैलूंची तीव्रता न्यून होण्यासाठी स्वयंसूचना घ्याव्यात.
५. एका साधिकेने तिच्या मुलाविषयी (बालसाधकाविषयी) सविस्तर लिखाण लिहून दिले होते. त्यातील निवडक आणि महत्त्वपूर्ण लिखाण प्रसिद्ध झाल्यानंतर ‘सर्व लिखाण प्रसिद्ध का केले नाही ? सगळे लिखाण वैशिष्ट्यपूर्णच होते’, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.
योग्य दृष्टीकोन : बालसाधकांचे १८ ते २० के.बी.चे (दैनिकाचे साधारण पाव पान) लिखाण निवडून ते प्रसिद्ध केले जाते. जागेच्या मर्यादेमुळे निवडक लिखाण दैनिकात, तर अन्य थोडे लिखाण सनातनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाते. ‘सर्व लिखाण प्रसिद्ध व्हायला हवे होते’, असे वाटणे, ही स्वेच्छा झाली. साधकांनी स्वेच्छा त्यागायला हवी.
६. एका साधिकेने तिच्या कुटुंबियांविषयी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाल्यावर तिने पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘मी कुटुंबियांविषयी लिहिलेला लेख पूर्ण घेतलाच नाही. उन्नत साधक आणि मोठे समष्टी कार्य करणारे साधक यांचे पूर्ण लेख छापले जातात. आम्ही साधारण साधक आहोत, विशेष मोठे कार्यही करत नाही. त्यामुळे आमच्या लिखाणाला अल्प प्रसिद्धी देतात.
योग्य दृष्टीकोन : ‘सनातन प्रभात’मधून लिखाण प्रसिद्ध करतांना साधका-साधकांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. ‘लिखाण कुणी लिहून दिले आहे’, यापेक्षा ‘त्यामागील विचार किंवा दृष्टीकोन काय आहे’, याला प्राधान्य दिले जाते.
साधकांनो, ‘सनातन प्रभात’साठी लिखाण लिहून देणे’, ही समष्टी साधना असून, ही सेवा निरपेक्षतेने आणि कृतज्ञताभावाने झाली, तरच त्यातून आपली साधना होईल. ‘लिखाणाचे संकलन आणि ते छापून येणे’, याविषयी साधकांच्या मनात अपेक्षांचे एवढे तीव्र विचार आले, तर ते त्यांच्या साधनेला घातक आहेत. यातून त्यांच्या साधनेची हानी होणार आहे. ‘सनातन प्रभात’ साधकांना साधनेसाठी दिशादर्शक आणि साहाय्यक व्हावे’, हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा उदात्त हेतू आहे. साधकांनी ‘सनातन प्रभात’चा उचित लाभ करून घेण्यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया’ गांभीर्याने राबवावी. अनेक अडथळ्यांवर मात करून अविरत जनजागृती करणार्या ‘सनातन प्रभात’प्रती, तसेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी अखंड कृतज्ञ रहावे !’
(वाचकांना विनंती आणि साधकांना सूचना : साधकांचे लेख वाचल्यावर त्याविषयी काही महत्त्वाचा दृष्टीकोन घालणे आवश्यक वाटल्यास समष्टीच्या हितासाठी आणि आम्हाला साहाय्य म्हणून sankalak.goa@gmail.com या इ-मेल पत्त्यावर कळवावे. आम्ही पुढच्या लेखांच्या वेळी ते लक्षात ठेवू.)
– पू. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.७.२०२३)