भक्तीसत्संग म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना दिलेला अनमोल ठेवा !
१. भक्तीसत्संगामुळे साधकात झालेले पालट
१ अ. भक्तीसत्संगामुळे भाववृद्धीसाठी प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘भक्तीसत्संग’ ही साधक आणि समाजातील जिज्ञासू यांना दिलेली एक सुंदर भावभेट आहे. आपल्या स्वभावातील ‘स्व’ अहंकारातून काढून टाकला की, जो शेष रहातो, तो भाव ! ‘भाव तेथे देव’, असे एक सुवचन असून हे सूत्र भक्तीसत्संगामुळे माझ्या मनावर बिंबले गेले. त्यामुळे माझे भाववृद्धीसाठी तळमळीने प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढले.
१ आ. भक्तीसत्संगामुळे व्यष्टी साधनेत नियमितता येऊन आनंद मिळणे : आपण सतत कार्याचा विचार करून व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अहंचे पैलू वाढतात. सेवेतून आनंद मिळण्याचे प्रमाण उणावते. माझे ‘ताण येणे आणि अपेक्षा ठेवणे’ इत्यादी स्वभावदोष उफाळून यायचे. भक्तीसत्संगामुळे व्यष्टी साधनेत नियमितता येऊन प्रार्थना आणि कृतज्ञता भावपूर्ण होते. सेवा करतांना मनात येणारे विचार अल्प झाल्यामुळे सकारात्मकता अन् एकाग्रता साधण्यास साहाय्य झाले. ताण उणावून आनंद मिळाला आणि उत्साहात वाढ झाली.
१ इ. ‘गुरुच सर्व अडचणी सोडवतात’, अशी श्रद्धा निर्माण होणे : ‘अडचणींवर बुद्धीने विचार करणे’, हा माझा स्वभावदोष होता; पण देवाचे साहाय्य घेतल्याने सर्व आपोआप होत असल्याची अनुभूती आली. माझ्या सेवेची फलनिष्पत्ती (‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार वाढण्याचे प्रमाण) वाढली. मला गुरुमाऊलीच्या अनुसंधानात रहाता येऊ लागले. माझा कृतज्ञतेचा भाव वाढून अपेक्षा न्यून झाली. ‘गुरुच सर्व अडचणी सोडवतात’, अशी श्रद्धा निर्माण झाली.
१ ई. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झोकून देऊन सेवा करणे : गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष भाववृद्धी सत्संगाचा मला लाभ झाला. मला सेवेच्या माध्यमातून गुरुसेवेत सहभागी होऊन स्वतःचा उद्धार करून घेण्याची आणि गुरूंची कृपा संपादन करण्याची अमूल्य संधी प्राप्त झाली. त्यासाठी मी झोकून देऊन सेवा करण्याचा निश्चय केला आणि गुरूंनीच तो करून घेतला. वर्ष २०१७ मध्ये डॉ. नरेंद्र दाते मला म्हणाले, ‘‘पाटीलकाकांची प्रतिदिन गुरुपौर्णिमा असते; कारण ते आठवड्याला ३ – ४ ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करतात.’’ हे गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) करून घेत होती.
१ उ. गुरुकृपेने अनुसंधानात राहिल्यामुळे अपघातातून वाचणे आणि पत्नी बेशुद्धावस्थेतून बाहेर येणे : गुरुमाऊलीने दोन प्रसंगांत माझ्या प्रारब्धात लिहिल्याप्रमाणे झालेल्या अपघातात (सायकलवरून संपर्कासाठी जात असतांना) जीव वाचवला. तसेच माझी पत्नी कै. अपर्णा पाटील हिला वर्ष २०१७ मध्ये मंद असा अर्धांगवायूचा झटका (माईल्ड पॅरालिसिसचा अॅटॅक) आला होता आणि ती बेशुद्धावस्थेत (कोमात) होती. त्यामुळे तिचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा थोड्या प्रमाणात वाकडा झाला होता. त्या वेळी ‘आधुनिक वैद्यांनी ती बेशुद्धावस्थेतून कधी बाहेर येईल’, याची शाश्वती नसल्याचे सांगितले होते. मग तिला अतीदक्षता विभागातून बाहेर वेगळ्या खोलीमध्ये ठेवले होतेे. त्या वेळी मी तिच्या समवेत रुग्णालयात राहिलो होतो; परंतु अखंड अनुसंधान, नामजप आणि गुरुकृपा यांमुळेच अवघ्या २ दिवसांत तिचा वाकडा झालेला हात अन् चेहरा पूर्ववत् झाला. ती बेशुद्धावस्थेतून बाहेर आली. ही मोठी अनुभूती आली. तेव्हा अनुसंधानात रहाता आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त झाली.
१ ऊ. गुरुकृपेमुळे जन्मोजन्मीचे प्रारब्ध सोसण्याची क्षमता निर्माण होणे : माझी पत्नी (कै. अपर्णा पाटील) ४ – ५ वर्षे अंथरुणाला खिळून असल्याने तिचे प्रदीर्घ आजारपण होते. त्या काळात ‘मायेत अडकायचे नाही’ असे मी ठरवले आणि गुरुप्राप्तीची तळमळ अन् भक्तीसत्संग यांमुळे माझ्यात भाववृद्धी होऊन, तन अन् मनाचा त्याग सहज शक्य झाला. गुरुकृपेमुळे जन्मोजन्मीचे प्रारब्ध सोसण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली. (माझी हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे.) सेवा करतांना माझ्याकडून ‘प्रत्येक कृती आणि विचार तुला अपेक्षित असे होऊ दे’, अशा प्रार्थना देवाला होऊ लागल्या आणि कृतज्ञताभाव जागृत झाला.
१ ए. भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर सेवेची फलनिष्पत्ती वाढणे : भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर देव साहाय्याला धावून येतो, हे मला अनुभवता आले. वय (७६ वर्षे) आणि शारीरिक व्याधी यांमुळे मी एकटा प्रसाराला किंवा संपर्काला जाऊ शकत नाही. तेव्हा उत्तरदायी साधकांनी माझ्याशी साधकाला जोडून दिल्यावर प्रतिदिन ४ – ५ घंट्यांत ७ – ८ नूतनीकरण, वस्तू वितरण, अर्पण आणणे इत्यादी सेवा होऊन फलनिष्पत्ती मिळू लागली. गुरुमाऊलीने मला माध्यम बनवल्याचा आनंद मिळू लागला. एका जिज्ञासूकडे गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिकेसाठी प्रायोजक मिळण्यासाठी गेलो होतो. अंक बघितल्यावर ते एकदम प्रभावित झाले आणि ‘समाजात याची पुष्कळ आवश्यकता आहे’, असे सांगून ५०० अंकांचे मूल्य त्यांनी दिले. केवळ ५ मिनिटांत आम्ही कृतज्ञता व्यक्त करून बाहेर पडलो. तेव्हा गुरुमाऊलीची कृपा अनुभवता आली.
१ ऐ. अपेक्षा न्यून होणे : कधीकधी सेवेसाठी मला साधक जोडून देण्यास उत्तरदायी साधकांना जमत नसे. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ‘मला फलनिष्पत्ती गुरुमाऊलीमुळे मिळत आहे; पण उत्तरदायी साधकांनाही अडचण येत असेल’, असा इतरांचा विचार मला करता येऊ लागला आणि अपेक्षा न ठेवता मला स्थिर रहाता आले. व्यष्टी साधना नियमित होऊन दिवसाला ७ – ८ घंटे नामजप गुरुमाऊली करून घेते.
१ ओ. मोठ्या मुलीविषयी काळजी दूर होणे : माझी मोठी मुलगी (श्रीमती अनघा मंदार पितळे) माझ्याकडे आहे. ‘माझे आजारपण आणि वय यांमुळे माझ्यानंतर मुलीचे कसे होईल ?’, ही चिंता मला वाटत होती. गुरुमाऊलीने ती चिंताही दूर केली; ‘माझ्यानंतर माझे सेवानिवृती वेतन माझ्या मुलीला मिळेल’, अशी सोय झाली. श्री प्रशांत कुलकर्णी नाशिकचे साधक यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून १५ दिवसांत तिच्यासाठी माझ्या निवृत्तीवेतनाची सोय केली आणि तिला वैद्यकीय लाभही प्राप्त झाला. ही गुरुमाऊलीची कृपा मला अनुभवता आली. त्यामुळे मुलगीही निश्चिंत मनाने सेवा करू शकत आहे. हे सर्व भक्तीसत्संगातील सहभागाने अन् ती सूत्रे कृतीत आणल्यामुळे शक्य झाले.
१ औ. भक्तीसत्संग हा गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांनी दिलेला अनमोल ठेवाच असल्याने त्यातील सूत्रे कृतीत आणू शकलो. ‘कठीण परिस्थिती असली, तरी भावाची जोड दिल्यावर त्यावर मात करता येते’, हे मला अनुभवायला मिळाले.
२. ‘या सत्संगामुळे जिज्ञासू आणि वाचक यांना आनंद मिळतो’, असे त्यांनी बोलून दाखवले.
३. भक्तीसत्संगातून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भक्तीसत्संगात विविध ऋषी आणि शिष्य यांच्या कथा सांगून मनावर भक्तीचे महत्त्व बिंबवतात.
आ. आज्ञाधारकपणा, चित्तशुद्धी, मन आणि बुद्धी यांचे समर्पण, तसेच प्रेमभाव (प्रेम म्हणजे भक्ती) तसेच गुरूंचे महत्त्व समाजात जाऊन सांगणे इत्यादी विचार मनावर बिंबतात.
इ. साधकांना आनंदी, भावावस्थेत रहाणे अन् शांतता अनुभवणे याची शिकवण देतात. भगवंताच्या अनुसंधानात रहाण्यासाठी भक्तीच आवश्यक असते. भाव १०० टक्के वाढला की, अहंचा नाश होतो आणि जीव भक्तीच्या स्तरावर पोचतो; म्हणून भावसत्संगानंतर भक्तीसत्संग चालू केले.
ई. भक्तीची अवस्था म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची अवस्था. हे सूत्र श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेल्या विविध कथांतून शिकायला मिळाले. त्यामुळे साधकांची गुरुमाऊलीप्रती श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य झाले. साधकांच्या शरणागतभावात वाढ झाली.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आपले तारणहार आहेत !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच आपले तारणहार आहेत आणि तेच आपला योगक्षेम सांभाळतात’, हे मला अनुभवता आले. ‘आपण भक्तीच्या माध्यमातून गुरुमाऊलीवर श्रद्धा आणि निष्ठा ठेवली की, ते आपल्या अडचणींच्या वेळी धावून येतात अन् अडचणी सत्वर दूर करतात’, हे माझ्या लक्षात आले.
‘हनुमंताने जशी श्रीरामाची दास्यभक्ती केली आणि गोपींनी जशी श्रीकृष्णभक्ती करून त्या श्रीकृष्णाशी एकरूप झाल्या, तशीच आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भावभक्ती करण्यासाठी सदैव त्यांच्या चरणांशी रहाता येऊ दे. आम्हा पामरांना शक्ती, ऊर्जा आणि चैतन्य प्रदान करा’, अशी आर्ततेने अन् शरणागतभावाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो!’
– श्री. अनिल पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७६ वर्षे), नाशिक (८.७.२०२३)