समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचा प्रयत्न योग्य कि अयोग्य ?
वाढत्या मुंबईची पाण्याची आवश्यकता म्हणून महाराष्ट्र सरकार समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या प्रयत्नात आहे. वरवर पहाता ही संकल्पना पुष्कळच छान आहे, अशी जरी वाटत असली, तरी तिचा पर्यावरणावर काहीच प्रभाव पडणार नाही का ? तर याचे उत्तर आहे ‘हो’; कारण समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी जेवढे घेतले जाईल त्याच्या निम्मेच पाणी पिण्यायोग्य होऊन निम्मे पाणी अतीक्षारयुक्त बनेल की, जे कदाचित पुन्हा समुद्रात सोडले जाईल. तब्बल २०० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन प्रक्रिया केले जाईल, ज्यातून १०० दशलक्ष लिटर पाणी पिण्यायोग्य, तर १०० दशलक्ष लिटर पाणी हे अतीक्षारयुक्त होणार आहे, जे कदाचित मढ (मुंबई) येथील समुद्रात पुन्हा सोडले जाईल.
१. कवचवर्गीय सागरी जीव आणि प्रवाळ यांचे अतीक्षारतेमुळे समुद्राचे आरोग्य बिघडण्याची शक्यता !
असे झाल्यास मुंबईची वाढती पाण्याची आवश्यकता कदाचित पूर्ण होईल; पण त्याची खरी किंमत येथील समुद्रातील मासे आणि त्यावर अवलंबून असलेले मासेमार यांना भोगावी लागेल; कारण हे १०० दशलक्ष लिटर अतीक्षारयुक्त पाणी जेव्हा समुद्रात जाईल, तेव्हा तेथील पाण्याची क्षारता वाढवेल, ज्यामुळे येथील परिसरातील विद्राव्य प्राणवायूचे प्रमाण न्यून होऊ शकते. परिणामी मोठ्या प्रमाणत मासे मरू शकतात. याखेरीज खेकडे, कोळंबी इत्यादी कवचवर्गीय प्राण्यांना त्यांची वाढ झाल्यावर कवच पालटावे लागते ज्यासाठी विविध जीवनाच्या टप्प्यात विविध क्षारता हवी असते. जसे की, जीवनाच्या प्रारंभीच्या टप्प्यात खेकड्यांना ३५ ‘पीपीटी’चे (क्षारता मोजण्याचे एकक) शुद्ध खारे पाणी लागते. या खेकड्यांची पिल्ले जेव्हा विकसित होतात, त्या वेळी ते किनारी भागातील खाडी समुद्रात जिथे १५ ‘पीपीटी’चे निमखारे पाणी मिळेल तिथे पहिली कात टाकतात. अशा वेळी क्षारता अधिक असेल, तर कात पालट न झाल्याने पिल्ले मरून जातात. हेच इतर कवचवर्गीय सागरी जीवांचे होते.
कित्येक सागरी प्रवाळही पालटलेल्या क्षारतेमुळे प्रभावित होतात. त्यासह समुद्रात सोडल्या जाणार्या अतिरिक्त क्षारयुक्त पाण्यामुळे सागरी परिसंस्थेला घातक असलेले गुलाबी लाल रंगाचे ‘डायनोफ्लाजेलेट’ प्रजातीचे शेवाळे वाढण्याचाही संभाव्यता अधिक असते. तसे झाल्यास पुष्कळ मोठ्या प्रमाणात मासे मरू शकतात. मुंबईच्या समुद्राचा विचार केल्यास आधीच अधूनमधून हे लाल शेवाळे मुंबईतील प्रदूषण आणि सागराचे वाढते तापमान यांमुळे वाढत आहे, ज्यामुळे कधी कधी मुंबईत रात्री चमकणार्या लाटा दिसतात. त्यामुळे कदाचित हे प्रकार अधिक वाढीस लागतील, असे वाटते. जे आपल्याला दिसायला जरी विलोभनीय वाटत असले, तरी ते समुद्राचे बिघडलेले आरोग्य दर्शवते.
वरील सर्व गोष्टी विचारात घेतल्यास सागरी पाणी गोडे करणे मुंबईकरांसाठी जरी सोयीचे वाटत असले, तरी येथील पाण्यात रहाणारे खरेखुरे आद्य मुंबईकर मात्र फार मोठी किंमत मोजणार हेच खरे !
२. पाणी काटकसरीने वापरण्यासाठी उत्तरदायी नागरिक घडवणारी शिक्षणप्रणाली प्रभावीपणे राबवणे आवश्यक !
खरेतर शासनाने असे प्रकल्प राबवत असतांना अतीक्षारयुक्त पाणी समुद्रात न सोडता त्याचे मीठ बनवता येईल का ? याचा विचार आधी केला पाहिजे. त्यानंतर मुंबईमध्ये प्रतिवर्षी पाण्याची आवश्यकता वाढतच जाते, यावर अजिबात नियंत्रण नाही; कारण मुंबई अमर्याद वाढत राहिली आहे. १०० हून अधिक माळ्याच्या इमारती उभ्या होत आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी लाखो लोक मुंबईत रहायला येत आहेत. ज्यामुळे मुंबईची पाण्याची हाव वाढतच चालली आहे. तरी मुंबईतील बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण न ठेवल्यास संपूर्ण समुद्र नष्ट झाला, तरी मुंबईची हाव पूर्ण होणार नाही. मुंबईची लोकसंख्या अधिकाधिक वाढती ठेवणे, हे पर्यावरणीयदृष्ट्या परवडणारे नाही. तसेच आजवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक निवासी संकुलात रिकाम्या जागा उपलब्ध असल्यास तिथे ‘पर्जन्य जलसंकलन प्रणाली’ (रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम) बसवणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. यासह संपूर्ण मुंबईत प्रत्येक नळावर पाण्याची बचत करणारी तोटी लावणे अनिवार्य केल्यास पुष्कळ मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल. ज्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये तर वाचतील, तसेच पुढे जाऊन खारे पाणी गोडे करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि सागरी पर्यावरणही शाबूत राहील. शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे पाणी, वीज इत्यादी संसाधनांचा न्यूनतम वापर करणे, शाळा-महाविद्यालय यांतून प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवणे अन् उत्तरदायी नागरिक घडवणारी शिक्षणप्रणाली प्रभावीपणे राबवणे, ही काळाची आवश्यकता आहे.
– प्रा. भूषण भोईर, एम्.एस्सी (समुद्रशास्त्र), पालघर.