…आहारी जाऊ नका !
लहान मुलांना भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळण्याची सवय लागल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात झालेले दुष्परिणाम आपण पहातो. सध्याच्या काळात भ्रमणभाष जितका महत्त्वाचा घटक बनला आहे; तितकाच तो हानीकारकही आहे. आपण त्याचा वापर कशासाठी आणि किती प्रमाणात करतो, त्यावर हे सर्व अवलंबून आहे. अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्येच भ्रमणभाषचे आकर्षण असते. त्यामुळे भ्रमणभाषचा अतीवापर ही एक गंभीर समस्या बनली आहे. केवळ लहान मुलेच नाहीत, तर वयोवृद्धांमध्येही भ्रमणभाषच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिक प्रत्येक वेळी भ्रमणभाषवर गेम खेळतात असे नाही; मात्र भक्तीगीते ऐकणे, कीर्तन किंवा जुनी गाणी ऐकणे, मालिका किंवा बातम्या पहाणे या आणि अशा प्रकारच्या गोष्टी पाहून स्वत:ची करमणूक करून घेतात; मात्र बर्याचदा तेही याच्या आहारी गेलेले आढळतात.
भ्रमणभाषचा वापर अयोग्य नाही; मात्र आपण त्याच्या अधीन गेलो नाही ना ? हे पहाणेही आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. अनेक वेळा सामाजिक किंवा प्रसार माध्यमांवर आपल्याला हवे ते पहातांना पुढील ‘व्हिडिओ’ आपोआप लागत जातात आणि ते पहाण्यात काही घंटे कसे निघून गेले, ते कळतही नाही. अशा वेळी स्वत:च्या मनावर नियंत्रण रहात नाही आणि त्यातही ‘इंटरनेट’ न्यून पडल्यास किंवा कुणी काही विचारल्यास चिडचिडही होते. त्याचा राग कुटुंबियांवरही काढला जातो. त्यामुळे कुटुंबातील वातावरण कलुषित होते. भ्रमणभाषमुळे दूरच्या लोकांशी संभाषण सोपे झाले आहे; मात्र घरातील व्यक्तींशी संभाषण दुरावले आहे. अशा माध्यमांचा काय उपयोग ? सामाजिक माध्यमांचा वापर करतांना त्याच्या किती आहारी जायचे ? हे कुठेतरी निश्चित करता यायला हवे. अन्यथा भ्रमणभाषच्या मायाजाळात आपला बहुमूल्य वेळ आणि माणसे आपण कधी गमावू, ते आपल्यालाही कळणार नाही. प्राचीन हिंदु समाजव्यवस्थेनुसार गृहस्थाश्रम झाल्यानंतर आयुष्य वानप्रस्थाश्रमात जीवन व्यतीत केले जात होते. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने संसारातून लक्ष न्यून करून समाजोपयोगी कामे करणे अपेक्षित होते. वानप्रस्थाश्रमाचे जीवन आसक्ती न्यून करून निवृत्तीमार्गाकडे नेत होते. आधुनिक जगात कुणी वनात जायला सांगत नसले, तरी निदान आधुनिक माध्यमांच्या आहारी जात नाहीत ना ? याचे आत्मपरीक्षण करणे मात्र क्रमप्राप्त !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर