सनातनच्या ७१ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी (वय ९४ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे
१. सौ. राजश्री संतोष कुलकर्णी (पू. दर्भेआजींच्या बहिणीची सून), कोल्हापूर
१ अ. पू. दर्भेआजींचा चेहरा शांत आणि समाधानी दिसणे : ‘पू. मावशींनी (पू. दर्भेआजींनी) देहत्याग केल्यानंतर त्यांच्याकडे पाहून शांत वाटले. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ समाधान दिसत होते. ‘घरात काही दु:खद प्रसंग घडला आहे’, असे वाटत नव्हते.’
२. सौ. मनीषा नितीन वाडीकर, कोल्हापूर
२ अ. ‘पू. दर्भेआजी पुष्कळ शक्ती देत आहेत’, असे जाणवणे : ‘पू. दर्भेआजींनी देहत्याग केल्याचे कळल्यानंतर मी श्रीमती कुलकर्णीकाकूंच्या घरी गेले. तिथे मला शांती आणि शक्ती यांची पुष्कळ स्पंदने जाणवली. ‘पू. आजी सूक्ष्मातून मला पुष्कळ शक्ती देत आहेत’, असे मला जाणवले. मी पू. आजींना नमस्कार केला. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना माझी भावजागृती झाली.’
२ आ. साधिकेच्या आईचे निधन होणार असल्याने ‘पू. दर्भेआजी शक्ती देत होत्या’, हे लक्षात येऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे : त्यानंतर तिसर्याच दिवशी माझी आई (श्रीमती शुभांगी विनायक दामले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८४ वर्षे)) हिचे कुडाळ येथे निधन झाले. तेव्हा ‘पू. आजी मला सूक्ष्मातून एवढी शक्ती का देत होत्या ?’, ते समजले. ‘संतांना आपली किती काळजी असते ?’, या विचाराने मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.’
३. सौ. मीना देशमाने, कोल्हापूर
३ अ. घरातील वातावरणात चैतन्य जाणवणे : ‘पू. आजींच्या देहत्यागानंतर मी श्रीमती कुलकर्णीकाकूंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तिथे मला पुष्कळ चैतन्य जाणवले. त्यांच्या वास्तूतील वातावरणात चैतन्य जाणवत होते. तिथे दाब नव्हता किंवा ‘घरात काही दु:खद प्रसंग घडला आहे’, असेही जाणवत नव्हते. ‘श्रीमती कुलकर्णीकाकू आणि त्यांची मुलगी अश्विनी दोघीही स्थिर आहेत’, असे मला जाणवले.’
४. श्रीमती इंदुबाई भुकन (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), फोंडा, गोवा
४ अ. पू. दर्भेआजींच्या गोव्यातील मुलीच्या (श्रीमती अंजली कुलकर्णी यांच्या) सदनिकेतही आनंदाची स्पंदने जाणवणे : ‘पू. आजींच्या देहत्यागानंतर १५ दिवसांनी श्रीमती अंजली कुलकर्णीकाकू कोल्हापूरहून गोव्याला परत आल्या. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेले. ‘श्रीमती कुलकर्णीकाकूंकडे पाहून त्या स्थिर आणि आनंदी असून त्यांच्यामधील स्थिरता वाढली आहे’, असे मला जाणवले. ‘अशा प्रसंगात आपण कसे असायला हवे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकता आले. त्यांच्या सदनिकेत मला पुष्कळ आनंद जाणवत होता.’
५. सौ. जयश्री कडोलकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), कोल्हापूर
५ अ. पू. (कै.) दर्भेआजींच्या घरात हवीहवीशी वाटणारी शांतता आणि चैतन्य जाणवणे : ‘पू. आजींनी देहत्याग केल्याचे कळल्यानंतर मी श्रीमती कुलकर्णीकाकूंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. मला त्यांच्या घरी पू. आजींचे अस्तित्व जाणवत होते आणि घरात पुष्कळ हवीहवीशी वाटणारी शांतता जाणवत होती. ‘त्या शांततेचा आनंद घ्यावा’, असे मला वाटले. ‘आम्हाला चैतन्य देण्यासाठी पू. आजींनी घरात चैतन्य पसरवले आहे’, असे मला जाणवले. घरात दु:खाचा लवलेशही जाणवला नाही. ‘श्रीमती कुलकर्णीकाकू आणि अश्विनी शांत अन् स्थिर आहेत’, असे मला जाणवलेे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १२.८.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |