रस्ता सुरक्षिततेसाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त आवश्यक !
रत्नागिरी येथील वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम !
रत्नागिरी – केवळ शिक्षा करून किंवा कारवाई करून वाहतूक शिस्तीचा प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे, लोकांनी स्वतःहून स्वत:ची आणि इतरांचीही सुरक्षितता सांभाळली पाहिजे. या दृष्टीने त्यांच्यात जागृती होणे आवश्यक आहे, या आशयाचे मत वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक आणि रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य न्याय दंडाधिकारी राहुल चौत्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्राधिकरणचे सचिव निखिल गोसावी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीचे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे केवळ आणि केवळ शिरस्त्राण (हेल्मेट) न घातल्याने होत असल्याचे दिसून येते. युवा पिढी ही देशाचे भवितव्य असल्याने या पिढीने ‘हेल्मेट’ घातलेच पाहिजे.
साहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हनकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध जागृतीचे उपक्रम राबवत असल्याने अपघातांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत न्यून झाल्याचे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी न्यायाधीशांनीच महत्त्वाचे काम हाती घेतल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला धन्यवाद दिले. ते म्हणाले, ‘‘केवळ, दंड, चलन भरून, कारवाया करून प्रतिवर्षी प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांमध्ये स्वयंशिस्त-जागृती होणे आवश्यक आहे.’’
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी वाहन चालवतांना शरीर गाडीवर आणि मन मात्र दुसरीकडे भरकटत असते, हे स्पष्ट केले. नागरिकांमध्ये सामान्य ज्ञान (कॉमन सेन्स) असणे आवश्यक आहेत. वाहतुकीच्या नियमांविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात समाजातील सर्वच घटकांकडून याविषयी जागृती होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सह दिवाणी न्यायाधीश आर्. बी. यादव यांनी आभारप्रदर्शन केले.